
‘26-11’च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणावर खटला चालवून त्याला लगेच फासावर लटकवायला हवे,पण त्याला फाशी देण्याचा मुहूर्त काढला जाईल तो बिहार-प. बंगाल निवडणुकीआधी.भारतीय जनतेला मूर्ख बनविले जात आहेच. मूर्खांना अतिमूर्ख बनविण्याची ही मुत्सद्देगिरी आहे. शेवटी आमचा प्रश्न कायम आहे. राणाला अमेरिकेने ताब्यात दिले. अफगाणिस्तानच्या भूमीवरून कुलभूषण जाधवांचे पाक सैन्याने अपहरण केले व पाकिस्तानात नेले. त्या जाधवांची सुटका कधी करणार? ‘राणा फेस्टिव्हल’चे नाटक नंतर पाहू.
पंतप्रधान मोदी यांच्या अस्तित्वामुळे देशात अनेक गोष्टी आपोआप घडत आहेत. म्हणजे घटना घडत जातात व त्यानंतर ‘हे मोदींमुळे घडले’ असे त्यांच्या भक्तांकडून जाहीर केले जाते. कंगना बेनने जाहीर केलेच आहे की, मोदी ही काही साधी असामी नाही. ते अवतारी पुरुष आहेत. त्यामुळे मोदी काहीही करू शकतात.‘26-11’च्या दहशतवादी हल्ल्याचा मार्गदर्शक अपराधी तहव्वूर राणा याचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण झाले आहे. भारताचे विशेष विमान त्याला घेऊन पोहोचले आहे. भारतात उतरल्यावर त्याला दिल्ली विमानतळावर ‘एनआयए’कडून अटक करण्यात आली आहे. राणाचे प्रत्यार्पण होत आहे याचा उत्सव साजरा करण्याच्या तयारीत भारतातले भक्त आणि भजनी मंडळ आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सांगून टाकले की, ‘‘राणाचे प्रत्यार्पण हे मोदी सरकारच्या मुत्सद्देगिरीचे मोठे यश आहे. भारताचा आत्मसन्मान, भूमी आणि लोकांवर हल्ला करणाऱ्यांना शिक्षा होण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे.’’ मोदी नसते तर राणा भारताच्या हवाली झालाच नसता असे एकंदरीत या लोकांना वाटते. राणाला भारतात आणण्याची लढाई मनमोहन सरकार असल्यापासून सुरूच आहे. त्या काळात भारताने राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली. भारताच्या मागणीला राणाने अमेरिकी न्यायालयात आव्हान दिले होते. हे सर्व प्रकरण 18 वर्षे अमेरिकेच्या न्यायालयात चालले. या दीर्घ न्यायालयीन लढ्यात प्रत्येक टप्प्यावर भारताने आपली बाजू मांडली व राणाचे अर्ज फेटाळण्यात आले आणि अखेर भारताच्या ताब्यात या गुन्हेगारास द्यावे लागले. ही दोन देशांतील कायदेशीर आणि राजनैतिक प्रक्रिया आहे. भारतात हे अनेकदा घडले आहे. 1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटात दाऊद इब्राहीमचा हस्तक अबू सालेमचा हात होता. पोर्तुगालमध्ये तो नाव बदलून वेषांतर करून राहत होता. भारतीय तपास यंत्रणांनी त्याचा शोध घेतला व पोर्तुगाल सरकारपुढे सालेमच्या दहशतवादी कृत्याचे पुरावे ठेवले. तेथील न्यायालयात वादविवाद झाले व अखेर नोव्हेंबर 2005 मध्ये पोर्तुगालला
सालेमला भारताच्या हवाली
करावे लागले. सालेमवर भारतात खटला चालवून दोन जन्मठेपांची शिक्षा ठोठावण्यात आली. मग या महत्त्वाच्या प्रत्यार्पणास मनमोहन सरकारच्या मुत्सद्देगिरीचेच यश म्हणावे लागेल. अर्थात सालेमला भारतात आणले म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘सालेम फेस्टिव्हल’ साजरा केला नाही, जो आज राणाच्या बाबतीत समाजमाध्यमांवर सुरू आहे. ‘26-11’च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका होतीच. कसाब व त्याची टोळी पाकिस्तानातून समुद्रमार्गे निघाली व मुंबईत पोहोचली. भारतावरील प्रत्येक हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहेच. मुंबईत हल्ला करण्याआधी त्या संभाव्य ठिकाणांची रेकी करण्याची जबाबदारी या राणावर सोपविण्यात आली होती. राणाने त्यासाठी डेव्हिड हेडलीचा पद्धतशीर वापर केला. राणाला आणल्यामुळे ‘26-11’ च्या हल्ल्यामागे पाकिस्तानची भूमिका उघड होण्यास मदत मिळेल असे सांगितले जाते. राणाच्या सांगण्यावरून शिवसेना भवनाची रेकीही हेडली याने केली होती. म्हणजे पाकड्यांना शिवसेना भवनही बॉम्बने उडवायचे होते. हेडलीने भारतात रेकी केल्यानंतर थेट पाकिस्तानात दूरध्वनी करण्याऐवजी तो राणाशी संपर्क साधायचा. हेडलीने दिलेली माहिती राणा पुढे पाकिस्तानी हस्तकांना पुरवीत असे व हे काम पूर्ण झाल्यावर कसाब आणि त्याची टोळी भारतात मोहिमेवर निघाली. या तपासात मुंबई पोलिसांचे योगदान मोठे आहे. ‘26/11’मागचा कट त्यांनी खणून काढला नसता तर हेडली व राणा ही नावे कधीच समोर आली नसती. 26 नोव्हेंबर 2008 ला रात्री दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. त्यात 164 निरपराधी नागरिक ठार झाले. नऊ दहशतवादी मेले. अजमल कसाब जिवंत सापडला. त्याच्यावर रीतसर खटला चालवून त्यालाही फासावर लटकवले गेले. कसाबला फासावर लटकवले तेव्हा महाराष्ट्रात आणि देशात मोदींचे राज्य नव्हते. कसाबला फासावर लटकवून झाल्यावर हे वृत्त जगाला कळले. इतकी गुप्तता पाळण्यात आली. मोदी काळात कसाबला फाशी दिली असती तर भक्तांनी उत्सवच साजरा केला असता व त्याचे
श्रेय घेऊन मौज
केली असती. कसाबवरील खटला ज्या पद्धतीने चालवला गेला त्याचा अभ्यास आजच्या राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. राजकारण कशाचे करायचे, याचे धडे द्यायची वेळ आली आहे. राणाला भारतात अमेरिकेतून आणले तीच मुत्सद्देगिरी वापरून नीरव मोदी, मेहुल चोक्सी, ललित मोदी यांना भारतात का आणू नये? दाऊद इब्राहीम, टायगर मेमनला फरफटत आणायची भाषा केली गेलीच होती. ‘पाकिस्तानात घुसून मारू’ वगैरे वल्गनादेखील केल्या गेल्या. त्या दाऊद, मेमनच्या बाबतीत खऱ्या करून दाखवा. माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडले आहेत. त्यांचे नक्की काय झाले ते कळायला मार्ग नाही. मोदी-शहा वगैरे लोकांची मुत्सद्देगिरी किंवा ‘दादागिरी’ या प्रकरणात का चालत नाही? कुलभूषण जाधवांना परत आणले तर भारताची जनता उत्सव साजरा करेल व मोदी-शहांना पुढची दोनेक वर्षे कार्यकाल वाढवून देईल. राणाला आणणे सोपे होते, पण कुलभूषण जाधवांना आणणे साहसी काम आहे. ते जमेल काय? पुलवामा हल्ल्यात 40 जवानांच्या चिंधड्या झाल्या. त्या हल्ल्याचे खरे गुन्हेगार सापडले नाहीत. राणा भारतात आला तो अमेरिकेला त्याची आवश्यकता नसल्याने. भारत काय ते बघून घेईल. मुळात राणा हवा आहे तो बिहार, प. बंगाल निवडणुकीत मोदींच्या मुत्सद्देगिरीच्या तुताऱ्या फुंकण्यासाठी. त्याचा खटला उभा करून निवडणूक काळात रोज स्पह्टक माहिती बाहेर आणायची व मीडियाला त्यात अडकवून ठेवायचे हा जुनाच खेळ आहे. ‘26-11’च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणावर खटला चालवून त्याला लगेच फासावर लटकवायला हवे, पण त्याला फाशी देण्याचा मुहूर्त काढला जाईल तो बिहार-प. बंगाल निवडणुकीआधी. भारतीय जनतेला मूर्ख बनविले जात आहेच. मूर्खांना अतिमूर्ख बनविण्याची ही मुत्सद्देगिरी आहे. शेवटी आमचा प्रश्न कायम आहे. राणाला अमेरिकेने ताब्यात दिले. अफगाणिस्तानच्या भूमीवरून कुलभूषण जाधवांचे पाक सैन्याने अपहरण केले व पाकिस्तानात नेले. त्या जाधवांची सुटका कधी करणार? ‘राणा फेस्टिव्हल’चे नाटक नंतर पाहू.