लौकिक अर्थाने भलेही तबलानवाज झाकीर हुसेन यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी तबल्याच्या ठेक्यांतून तालांचा जो अद्भुत ठेवा त्यांनी जगभरातील रसिकांच्या हवाली केला आहे, तो कसा शांत होईल? पृथ्वी, चंद्र, सूर्य असेतोवर उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबल्याचे बोल आलम दुनियेच्या कानात सदैव रुंजी घालतील. गायक आणि वादकांसोबतच तबल्याच्या तालावर आपली मान व केसांशीही जुगलबंदी रंगवणारा तबल्याचा हा जादूगार इंद्राच्या दरबारातील मैफली रंगवण्यासाठी आता स्वर्गलोकी निघाला आहे. ‘‘आईए उस्ताद…’’ म्हणून साक्षात सरस्वती स्वर्गाच्या प्रवेशद्वारी त्यांचे स्वागत करील!
झाकीर हुसेन नावाचा जादुई बोटांचा दैवी ताल शांत झाला आहे. थेट स्वर्गातूनच पृथ्वीवर अवतरलेला तबल्याचा हा तालसम्राट आल्या पावलाने पुन्हा स्वर्गस्थ झाला, असेच म्हणावे लागेल. स्वर्गाच्या दरबारात संगीत कलेची सेवा देणाऱ्या पंडित रविशंकर यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांसोबत साथसंगत करण्यासाठीच जणू हा विलक्षण कलावंत मनुष्यलोकात अवतरला होता. येथील अवतारकार्य संपवून पुन्हा देवादिकांसमोर संगीत कलेची सेवा रुजू करण्यासाठी या अनोख्या कलावंताने स्वर्गलोकी प्रयाण केले आहे. अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को येथे त्यांच्यावर फुप्फुसाशी निगडित असाध्य आजारावर उपचार सुरू होते. आधी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी आली व त्यापाठोपाठ निधनाची. स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्याची संधीही रसिकांना न देता तबलानवाज झाकीर हुसेन यांनी जगाचा निरोप घेतला. केवळ हिंदुस्थानच नव्हे तर पृथ्वीतलावरील समस्त देशांतील संगीतप्रेमी रसिक जनांचे कान तब्बल सहा दशके तृप्त करणारे उस्ताद झाकीर हुसेन हे साक्षात सरस्वतीपुत्र होते, असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. तबल्यावरील त्यांची थाप आणि विजेच्या चपळाईने फिरणारी त्यांची बोटे व त्यातून उत्पन्न होणारी अद्भुत तालनिर्मिती… सारेच अलौकिक होते. तबला वादनातील बारीक जागा घेत असताना डोळे, भुवया आणि ओठांच्या हालचालींनी बदलत जाणाऱ्या त्यांच्या भावमुद्रांकडे रसिक स्तंभित होऊन पाहत असत. झाकीर हुसेन हे नाव कानी पडल्यावर डोळ्यांसमोर यायचा तो त्यांचा गौरवर्णीय तेजस्वी चेहरा. झब्बा-पायजमा हा पोशाख. भव्य कपाळ आणि मानेवर रेंगाळणारे काळेशार व लांबलचक केस. झाकीर हुसेन यांची बोटे तबल्यावरून फिरू लागताच
कानांत प्राण आणून
रसिक त्यांचे तबला वादन ऐकत व पुनः पुन्हा दाद देत. आवडीची जागा घेण्यापूर्वी मान तिरपी करत आपला विपुल असा घुंगराळू केशसंभार हळूहळू भालप्रदेशावर आणून चेहरा झाकण्याची झाकीर हुसेन यांची अदाही अनोखी म्हणावी अशीच. पुन्हा याच तालाचा परमोच्च बिंदू गाठताना समेवर येताच चेहऱ्यासमोर आणलेला केशसंभार मानेच्या एका झटक्यात मागे सारण्याची त्यांची नजाकतही रसिकांना तेवढीच भुरळ घालायची. अद्वितीय तालनिर्मितीबरोबरच प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत फुलत जाणारे त्यांचे साभिनय तबला वादन प्रत्यक्ष पाहायला मिळणे म्हणजे पर्वणीच. आवडीची जागा घेऊन झाकीर हुसेन जेव्हा केसांना झटका देत रसिकांकडे बघून स्मितहास्य करीत त्या क्षणी प्रेक्षागृहातून टाळ्यांचा आपसूकच कडकडाट व्हायचा. वर्षाकाठी दीडशेहून अधिक संगीत समारोहांत सहभागी होणाऱ्या झाकीर हुसेन यांनी असे किती टाळ्यांचे कडकडाट वसूल केले असतील, याची मोजदादच होऊ शकत नाही. प्रख्यात तबला वादक अल्लारख्खा हे झाकीर हुसेन यांचे पिताश्री व गुरूदेखील. कलेच्या प्रांतात त्या काळी असलेल्या तोकडय़ा उत्पन्नामुळे झाकीर यांनी संगीत कलेत न रमता उच्च शिक्षण घेऊन उत्तम करीअर करावे व पैसा मिळवावा, असे त्यांच्या आईला वाटे. मात्र अल्लारख्खा यांनी झाकीर यांची तालवाद्यातील कमालीची समज ओळखून रात्रंदिवस त्यांच्याकडून तबल्याचा रियाज करून घेतला. रियाज संपल्यावरही घरातील भांडीपुंडी व जेवणाच्या ताटापासून तव्यापर्यंत प्रत्येक वस्तूवर बोटे फिरवून ते नाद निर्माण करीत. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी ते मृदुंग वाजवायला शिकले आणि बाराव्या वर्षी तर
जाहीर कार्यक्रमात
पं. रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, शहनाई वादक बिस्मिल्ला खान, पं. शांताप्रसाद व पं. किशन महाराज यांना वडिलांच्या सोबतीने साथसंगत केली. त्या वेळी मिळालेले पाच रुपयांचे बक्षीस माझ्यासाठी सर्वात मौल्यवान होते, असे झाकीर हुसेन यांनी अनेकदा आपल्या मुलाखतीतून सांगितले. स्वभावाने अत्यंत विनम्र असलेले झाकीर हुसेन कुठल्याही समारोहात सहभागी होताना आपले तबला वाद्य ते स्वतःच मंचावर आणत. दुसऱ्या कोणी मदत म्हणून तबला उचलण्याचा प्रयत्न केला तर ‘‘माँ सरस्वती हम पर नाराज हो जाएगी,’’ असे ते म्हणत. केवढे ते प्रेम कलेवर आणि आपल्या वाद्यांवर. वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला. सर्वात कमी वयाचे पद्म पुरस्काराचे मानकरी म्हणून त्यांची नोंद झाली. नंतर पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत अकादमी याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्रॅमी पुरस्काराचेही ते अनेकदा मानकरी ठरले. लौकिक अर्थाने भलेही तबलानवाज झाकीर हुसेन यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी तबल्याच्या ठेक्यांतून तालांचा जो अद्भुत ठेवा त्यांनी जगभरातील रसिकांच्या हवाली केला आहे, तो कसा शांत होईल? पृथ्वी, चंद्र, सूर्य असेतोवर उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबल्याचे बोल आलम दुनियेच्या कानात सदैव रुंजी घालतील. गायक आणि वादकांसोबतच तबल्याच्या तालावर आपली मान व केसांशीही जुगलबंदी रंगवणारा तबल्याचा हा जादूगार इंद्राच्या दरबारातील मैफली रंगवण्यासाठी आता स्वर्गलोकी निघाला आहे. ‘‘आईए उस्ताद…’’ म्हणून साक्षात सरस्वती स्वर्गाच्या प्रवेशद्वारी त्यांचे स्वागत करील!