सामना अग्रलेख – सीरियाचे काय होणार?

अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांचे सीरियातील ‘इंटरेस्ट’ वेगवेगळे आहेत. त्यानुसार त्यांनी त्यांच्या चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. बदलत्या परिस्थितीत सीरियामध्ये हात-पाय पसरविण्याचा ‘इसिस’चाही प्रयत्न आहेच. इस्रायलने तर गोलान टेकड्यांकडील सीरियाच्या 10 किलोमीटरच्या परिसरावर ‘इस्रायली नागरिकांची सुरक्षा’ असे कारण देत कब्जा केला आहे. तुर्कीये, इराणसारखे देशदेखील सीरियावर ‘लक्ष’ वगैरे ठेवून आहेतच. तेव्हा सीरियामधील सत्तांतर तेथे शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करते की तेथील अशांतता मागील पानावरून पुढे सुरूच राहते, हे आताच सांगता येणार नाही.  पाच दशकांच्या एका हुकूमशाहीतून सीरियन नागरिकांची मुक्तता झाली असली तरी सीरियाचे काय होणार? तो एकसंध राहणार की त्याचे लचके तोडले जाणार या प्रश्नांची उत्तरे भविष्यातच मिळतील.  

सीरियातील बशर-अल-असद कुटुंबाचा पाच दशकांचा एकछत्री अंमल संपुष्टात येऊन आता चार दिवस झाले आहेत. खुद्द सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद यांना त्यांच्या कुटुंबीयांसह देश सोडून पळून जावे लागले आहे. ‘हयात तहरीर अल-शाद’ या संघटनेच्या बंडखोरांनी हे सत्तांतर घडवून आणले आहे. या संघटनेचा म्होरक्या अबू मोहम्मद अल जोलानी हा आहे. सीरियाच्या काही प्रांतांवर आधीच कब्जा मिळविलेल्या जोलानीने मुसंडी मारत थेट दमास्कसवर कब्जा केला आणि तेथील बशर-अल-असद यांचा पाच दशकांचा अंमल संपुष्टात आणला. अर्थात, त्यामुळे त्या देशातील गृहकलह किंवा अशांतता, हिंसाचार संपुष्टात येईल, याची शक्यता कमीच आहे. हे सत्तांतर घडवून आणणारा अबू मोहम्मद अल जोलानी हा स्वतःला जिहादी पुरस्कर्ता म्हणवून घेत नाही. तालिबान किंवा इसिसप्रमाणे सीरियामध्ये ‘धर्मसत्ता’ स्थापन करण्याची आपली महत्त्वाकांक्षा नाही, असाही दावा त्याची ‘हयात तहरीर अल-शाद’ (एचटीएस) ही संघटना करीत असते. मात्र प्रत्यक्षात काय घडते हे येणारा काळच सांगेल. पुन्हा येथेही नेहमीच्या ‘शिया-सुन्नी’ रक्तरंजित संघर्षाचा शाप आहेच. त्यामुळे तेथील सुन्नी समुदायाला

बदल्याची भीती

सतावत आहे. नव्या राजवटीचा म्होरक्या जोलानी हा जरी सीरियात जिहादी राजवटीऐवजी ‘रीतसर प्रशासकीय’ व्यवस्था लागू करण्याचे आश्वासन देत असला तरी त्यावर विश्वास कोण ठेवणार? पुन्हा जोलानीची संघटना सुन्नी पंथीय असल्याने त्याला ‘मदत’ करणारे सुन्नी समर्थक देश त्याच्या ‘मधल्या मार्गा’ला मान्यता देणार का? हा प्रश्नही आहेच. किंबहुना, ही भूमिका ते अमान्यच करतील आणि त्यातून नवी राजवटही अस्थिर होईल. सीरियातील सत्तांतरासाठी जोलानी याच्या ‘एचटीएस’ संघटनेसोबत जे इतर गट सध्या आहेत, ते किती काळ जोलानीशी जुळवून घेतात हेदेखील आहेच. त्यामुळे सीरियाची वाटचाल आता तरी शांतता आणि स्थैर्याकडे होणार का हा प्रश्न कायमच आहे. नवीन सत्ताधारी बंडखोरांचा म्होरक्या जोलानी याने सीरियात ‘धर्मसत्ता’ स्थापन करणार नाही, असा दावा केला असला तरी इस्लामी देशांमधील पूर्वानुभव वेगळेच सांगतो. या सत्तांतरात प्रत्यक्ष भाग घेणारी जोलानी याची ‘एचटीएस’ आणि इतर संघटना तसेच त्या प्रत्येकाची सूत्रे हलविणारे पडद्यामागील देश भविष्यात त्यांचा स्वार्थ कसा साधतात, यावरही सीरियाचे भवितव्य अवलंबून असेल.

अमेरिका आणि रशिया

या दोन महासत्तांचे सीरियातील ‘इंटरेस्ट’ वेगवेगळे आहेत. त्यानुसार त्यांनी त्यांच्या चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने सीरियातील ‘इसिस’चे 75 अड्डे हवाई हल्ले करून नष्ट केले आहेत. कारण बदलत्या परिस्थितीत सीरियामध्ये हात-पाय पसरविण्याचा ‘इसिस’चाही प्रयत्न आहेच. इस्रायलने तर गोलान टेकड्यांकडील सीरियाच्या 10 किलोमीटरच्या परिसरावर ‘इस्रायली नागरिकांची सुरक्षा’ असे कारण देत कब्जा केला आहे. हा कब्जा ‘काही काळापुरताच’ असेल असे इस्रायल सांगत असला तरी या बनवाबनवीची कालमर्यादा किती याचे उत्तर कोणीच देऊ शकणार नाही. तिकडे रशिया युक्रेन युद्धात अडकला असला तरी असद कुटुंबाला राजकीय आश्रय देण्याची घोषणा करून त्या देशाने सीरियातील हस्तक्षेप पुढेही सुरूच राहणार हे स्पष्ट केले आहे. तुर्कीये, इराणसारखे देशदेखील सीरियावर ‘लक्ष’ वगैरे ठेवून आहेतच. तेव्हा सीरियामधील सत्तांतर तेथे शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करते की तेथील अशांतता मागील पानावरून पुढे सुरूच राहते, हे आताच सांगता येणार नाही. पाच दशकांच्या एका हुकूमशाहीतून सीरियन नागरिकांची मुक्तता झाली असली तरी सीरियाचे काय होणार? तो एकसंध राहणार की त्याचे लचके तोडले जाणार या प्रश्नांची उत्तरे भविष्यातच मिळतील.