सामना अग्रलेख – चिंब चिंब होऊ दे..!

कोकणात दाखल झालेल्या मान्सूनने आता अवघ्या महाराष्ट्रातील शेतशिवारांवर मनसोक्त बरसावे व शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणावेत. महाराष्ट्रासाठी यंदाचा पाऊस उत्तम आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तो खरा ठरून महाराष्ट्र ‘चिंब चिंब होऊ दे!’ दिल्लीच्या सुल्तानी संकटाला लोकसभा निवडणुकीत मराठी मुलखाने जबर धक्का दिल्यानंतर अस्मानी शक्तीने प्रसन्न होत वेळेआधी मान्सून पाठवून महाराष्ट्राला सुखद धक्का दिला आहे. हा योगायोग विलक्षणच म्हणायला हवा!

लोकसभा निवडणुकांच्या दिलासादायक निकालानंतर महाराष्ट्रासाठी आणखी एक आनंदवार्ता आहे. उन्हाची काहिली व भयंकर उष्णता यामुळे गेले दोन महिने राज्यात अक्षरशः होरपळ सुरू असताना यंदाचा मान्सून महाराष्ट्रात अंमळ वेळेपूर्वीच दाखल झाला आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाचे महाराष्ट्रात आगमन झाले असून तळकोकणातील जिल्हय़ांमध्ये मान्सूनच्या सरी कोसळायलाही लागल्या आहेत, अशी अधिकृत घोषणा हवामान खात्याने केली आहे. मान्सूनचा गेल्या काही वर्षांतील ट्रेंड पाहता साधारण 10 जूनच्या आसपास मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होत असतो. मात्र यंदा तो दोन दिवस आधी म्हणजे 8 जूनला महाराष्ट्रात दाखल होईल, असे हवामान खात्याने आधी जाहीर केले होते. तथापि, सुदैवाने मान्सूनच्या वेगवान प्रवासासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने अंदमान, केरळ, कर्नाटकची किनारपट्टी ते महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी हा सगळाच प्रवास मान्सूनने यंदा झपाट्याने पार केला. एरवी अंदमानहून निघाल्यानंतर केरळपर्यंत पोहोचताना मध्येच काहीतरी बिनसते आणि मान्सूनचा प्रवास रेंगाळतो व महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यास अनेकदा 12 ते 15 दिवस लागतात, असा अनुभव आहे. मात्र निसर्गाने यंदा कृपा केली व 30 मे रोजी केरळात दाखल झालेला मान्सून अवघ्या आठवडाभरात

महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर

येऊन पोहोचला, हे नक्कीच शुभ वर्तमान आहे. कोकणापासून तेलंगणा-आंध्र प्रदेशातील मेदक, भद्राचल, विजयनगर ते बंगालच्या खाडीपर्यंत मान्सून सक्रिय झाला आहे. गोव्यात दोन दिवसांचा मुक्काम करणारा मान्सून येत्या 24 ते 48 तासांत म्हणजे शनिवारपर्यंत मुंबई, पुणे व दक्षिण महाराष्ट्रात पोहोचेल, असा कयास हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ‘रेमल’ या चक्रीवादळामुळे मान्सूनला गती मिळाली व त्यामुळेच हिंदुस्थानच्या ईशान्येकडील भाग त्याने अल्पावधीत व्यापला. तिथून पुढेही मान्सूनने हीच गती कायम ठेवली तर येत्या दोन-तीन दिवसांत मान्सूनचा पाऊस बरसू लागेल. एखाद्या व्यक्तीच्या अनुभवाविषयी बोलताना ‘त्याने बरेच उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत’, असा वाप्रचार बऱयाचदा वापरला जातो. मात्र यंदाची प्रचंड उष्णता, उच्चांकी पातळीवर पोहोचलेला पारा आणि उष्णतेच्या लाटेमुळे मागच्या महिनाभरात देशभरात गेलेले सुमारे 50 बळी पाहता, असा उन्हाळा आजवर कधीही पाहिला नाही, असे जुनेजाणते लोक सांगतात. उष्णतेच्या लाटेमुळे मध्य प्रदेशात 14, महाराष्ट्रात 11, आंध्र प्रदेशात 6, राजस्थानात 5 जण मृत्युमुखी पडले. मुंबई व पुण्यातही तापमानाचा उच्चांक नोंदवला गेला. तब्बल 2 महिने आग ओकणाऱ्या सूर्यामुळे राज्यातील जलाशयांत मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होऊन पाणीसाठे झपाट्याने घसरले.

विहिरी व तलाव कोरडेठाक

पडल्याने महाराष्ट्रातील व देशातील सुमारे शे-दीडशे जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. मराठवाड्यासह अनेक भागांत गेला महिनाभर पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला वणवण फिरावे लागत आहे. अनेक गावे केवळ टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत व अशा गावांची संख्या सातत्याने वाढत असताना मान्सूनने वेळेच्या आधी महाराष्ट्राचे दार ठोठावले आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भाचे काही जिल्हे आणि मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत येत्या 5 दिवसांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भयंकर उन्हाने होरपळून निघालेला महाराष्ट्र येत्या दोन-चार दिवसांत ओलाचिंब होणार असेल तर यापेक्षा अधिक आनंदाची बातमी काय असू शकते? कोकणात दाखल झालेल्या मान्सूनने आता अवघ्या महाराष्ट्रातील शेतशिवारांवर मनसोक्त बरसावे व शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणावेत. महाराष्ट्रासाठी यंदाचा पाऊस उत्तम आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तो खरा ठरून महाराष्ट्र ‘चिंब चिंब होऊ दे!’ दिल्लीच्या सुल्तानी संकटाला लोकसभा निवडणुकीत मराठी मुलखाने जबर धक्का दिल्यानंतर अस्मानी शक्तीने प्रसन्न होत वेळेआधी मान्सून पाठवून महाराष्ट्राला सुखद धक्का दिला आहे. हा योगायोग विलक्षणच म्हणायला हवा!