सामना अग्रलेख – कॅनडा नव्हे; पुण्यात बेकारांच्या रांगा!

काही महिन्यांपूर्वी कॅनडातील भारतीय तरुणांनी नोकरीसाठी रांगा लावल्याचे प्रसिद्ध झाले होते. आता हेच चित्र पुण्यात दिसले. अमेरिकेतूनही 17 लाख भारतीयांना परत पाठवून येथील बेरोजगारीत मोदीमित्र ट्रम्पदेखील भरच घालणार आहेत. पुण्यातील बेरोजगारांच्या रांगेचा व्हिडीओ मोदी सरकारचा भंपकपणा उघड करणारा आणि त्यांच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. अर्थात, बेरोजगारांनापकोडेतळायला सांगणारे आणि देशातील 81 कोटी जनतेला रोजगाराऐवजी मोफत धान्य देत असल्याबद्दल स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेणारे राज्यकर्ते असल्यावर दुसरे काय होणार!

केंद्रातील राज्यकर्ते देशाच्या तथाकथित विकासाचे ‘प्रगती पुस्तक’ येता-जाता जनतेसमोर फडकवत असतात. महाराष्ट्रातील त्यांचे वारसदारदेखील त्यांच्याप्रमाणेच ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ वगैरे नारेबाजी करीत असतात. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक परिषदेचा हवाला देत महाराष्ट्रात येऊ घातलेली काही लाख कोटींची परकीय गुंतवणूक आणि त्यातून होणारी हजारोंची रोजगार निर्मिती याचे डमरूदेखील मुख्यमंत्री व त्यांच्या चेल्यांनी अलीकडेच वाजवले. मात्र महाराष्ट्रातील बेरोजगारीचे वास्तव काय आहे? पुण्यातील एका ‘व्हिडीओ’ने हे जळजळीत वास्तव समोर आणले आहे आणि राज्यकर्त्यांचा खोटारडेपणाही उघड केला आहे. दोन दिवसांपूर्वीच्या या व्हिडीओने मोदी आणि फडणवीस सरकारच्या सर्वच दाव्यांची पोलखोल केली. पुण्यातील एका आयटी कंपनीने 100 जागांसाठी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ची जाहिरात दिली. मात्र त्यासाठी तब्बल तीन – चार हजारांवर तरुण आयटी इंजिनीअर्सची रांग लागली. भर उन्हात हे तरुण-तरुणी नोकरीच्या आशेने तासन्तास उभे असलेले महाराष्ट्राने, देशाने आणि जगानेही पाहिले. विद्येचे माहेरघर अशी कधीकाळी ओळख असलेल्या पुण्याची नवीन ओळख ‘आयटी हब’ अशी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे तरुण-तरुणी

नोकरीच्या आशेने

येत असतात. मात्र या व्हिडीओने पुण्यात नोकऱ्यांची कशी वानवा आहे, सरकारचे सर्व दावे कसे पोकळ आहेत हेच दाखवून दिले. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याच्या वल्गना मोदी सरकारने केल्या. मात्र त्याच्या चिंधड्याच पुण्यातील या व्हिडीओने उडविल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘दावोस पुराणा’तील वांगीही या व्हिडीओने सडकी ठरविली. आज देशात सर्वात मोठी समस्या बेरोजगारी हीच आहे. 10 पैकी 8 जणांना आज नोकरी हवी आहे. केंद्र सरकारच्या पोर्टलवर रोजगार इच्छुकांच्या नोंदणीच्या ज्या लाटा आदळत आहेत, त्यातूनही बेरोजगारीचा वणवा देशात कसा पसरत आहे, हेच दिसून येत आहे. महाराष्ट्रातील सुमारे 24 लाख 51 हजार तरुणांनी या पोर्टलवर नोकरीसाठी नोंदणी केल्याचे उघड झाले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2024 या काळात देशभरातील नोंदणीचा आकडा तब्बल 2 कोटी 39 लाख एवढा मोठा होता. त्यात महाराष्ट्रातील संख्या 19 लाख होती. आता हीच संख्या साडेचोवीस लाखांवर गेली आहे. म्हणजे रोजगार निर्मिती तर सोडा, नोंदणी करणाऱ्या बेरोजगारांची संख्या पाच लाखांनी वाढली आहे. म्हणजे नोंदणी न केलेल्या बेरोजगारांचा आकडा त्याच्या कित्येक पट जास्त असणार हे उघड आहे. मग गेले कुठे तुमचे तथाकथित रोजगार? कुठे विरले तुमचे रोजगार निर्मितीचे वादे आणि दावे? केंद्रात

मोदी सरकार आल्यापासून

महाराष्ट्रातील उद्योग पळवून नेले जात आहेत. त्यामुळे येथील लाखो तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घासदेखील हिरावून घेतला जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस परकीय गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीचे फुगे कितीही फुगवत असले तरी महाराष्ट्रातील सुमारे नऊ लाख कोटींचे प्रकल्प केंद्राने बाहेर पळवून नेले व राज्यातील काही लाख होतकरू तरुणांचा रोजगार हिरावून घेतला, ही वस्तुस्थिती आहे. पुण्यात  बेरोजगारांच्या रांगा लागल्या त्या यामुळेच. काही महिन्यांपूर्वी कॅनडातील भारतीय तरुणांनी नोकरीसाठी रांगा लावल्याचे प्रसिद्ध झाले होते. आता हेच चित्र पुण्यात दिसले. कॅनडातील भारतीयांच्या बेरोजगारीसाठी त्यावेळच्या ट्रुडो सरकारकडे बोट दाखविणारी भक्त मंडळी आता पुण्यातील रांगेबद्दल कोणाकडे बोट दाखविणार आहे? अमेरिकेतूनही 17 लाख भारतीयांना परत पाठवून येथील बेरोजगारीत मोदीमित्र ट्रम्पदेखील भरच घालणार आहेत. पुण्यातील बेरोजगारांच्या रांगेचा व्हिडीओ मोदी सरकारचा भंपकपणा उघड करणारा आणि त्यांच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. अर्थात, बेरोजगारांना ‘पकोडे’ तळायला सांगणारे आणि देशातील 81 कोटी जनतेला रोजगाराऐवजी मोफत धान्य देत असल्याबद्दल स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेणारे राज्यकर्ते असल्यावर दुसरे काय होणार!