सामना अग्रलेख – श्रीमंतांची देशांतरे! देश बदल रहा है…

देशातील उच्चशिक्षित, अतिश्रीमंत आणि मजूर व कामगार अशा सर्वच स्तरांतील लोकांच्या मनात देश सोडून जाण्याची भावना वाढीस का लागली आहे? हे राज्यकर्त्यांचे अपयश नव्हे काय? ताज्या बातमीनुसार देशातील 22 टक्के अतिश्रीमंत देश सोडून जाण्याच्या तयारीत असतील तर ती राष्ट्रीय शरमेची गोष्ट आहे व श्रीमंतांच्या या देशांतरालाच आपण ‘मेरा देश बदल रहा है’, असे म्हणायचे काय? देशातील जनतेला स्वप्नाळू, मायावी व आभासी दुनियेत घुमवणाऱ्या राज्यकर्त्यांकडे या प्रश्नाचे उत्तर आहे काय?

‘मेरा देश बदल रहा है,’ अशी टिमकी 2014 पासून आपल्या देशात सातत्याने वाजवली जाते. केंद्रातील राज्यकर्ते व त्यांचे आंधळे समर्थक देश बदलत असल्याच्या पिपाण्या कायमच वाजवत असतात. पुन्हा हा तथाकथित बदल सरकारची भाटगिरी करणाऱ्या मंडळींनाच कसा दिसतो व या देशातील सर्वसामान्य जनतेला तो का दिसत नाही? हेदेखील एक कोडेच आहे. देशात घडणारे वा दिसणारे सकारात्मक बदल कोणते? हा संशोधनाचा विषय असला तरी देशात 2014 नंतर दिसणारे नकारात्मक बदल मात्र पायलीचे पन्नास सांगता येतील. हे सगळे विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे ‘बदलत्या’ देशातील एक नकारात्मक बातमी. हिंदुस्थानातील श्रीमंत व्यक्ती मोठ्या प्रमाणावर देश सोडून विदेशात स्थायिक होत आहेत. हे प्रमाण दरवर्षी वाढते आहे व हिंदुस्थानातील श्रीमंतांपैकी तब्बल 22 टक्के लोक देशांतर करून विदेशात स्थायिक होण्याची योजना आखत आहेत. कोटक महिंद्रा बँकेच्या ‘टॉप ऑफ द पिरॅमिड’ या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंदुस्थानातील एकंदर 12 शहरांमध्ये कोटक बँकेने हे सर्वेक्षण केले व 25 कोटींहून अधिक मिळकत असलेल्या गर्भश्रीमंतांची मते जाणून घेतली. त्यानुसार दर पाचपैकी एका श्रीमंत व्यक्तीने हिंदुस्थान सोडून विदेशात स्थायिक होण्याचे मनसुबे बोलून दाखवले. विदेशातील उत्तम राहणीमान, चांगली जीवनशैली आणि व्यवसायासाठी असलेले पोषक व सुलभ वातावरण या व इतर कारणांमुळे देशातील 22 टक्के अतिश्रीमंत लोक हिंदुस्थान सोडून जाण्याच्या तयारीत आहेत, हा या अहवालाचा

धक्कादायक निष्कर्ष

आहे. विदेशातील सुटसुटीत कर पद्धती, तेथील शैक्षणिक वातावरण व दर्जेदार आरोग्य व्यवस्था हीदेखील देशांतराची कारणे आहेतच. देश सोडून जाण्याची जी कारणे अतिश्रीमंत वर्गाने दिली आहेत त्यांचा दुसरा अर्थ काय निघतो? हिंदुस्थानातील राहणीमान उत्तम दर्जाचे नाही, विदेशातील जीवनशैली चांगली आहे. म्हणजेच येथील जीवनशैली बरोबर नाही, असे देश सोडून जाण्याच्या विचारात असलेल्या श्रीमंतांना वाटते. शिवाय, व्यवसायासाठी विदेशात जे अनुकूल वातावरण आहे, तसे सुलभ वा पोषक वातावरण आपल्या देशात उपलब्ध नाही. देश सोडून जाण्याच्या मानसिकतेत असलेल्या अतिश्रीमंतांनी दिलेल्या कारणांच्या योग्य-अयोग्यतेवर चर्चा होऊ शकते; पण या श्रीमंतांना आता या देशात राहण्याची इच्छा उरलेली दिसत नाही, हे सत्य आहे. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि संयुक्त अरब अमिरात यांसारख्या देशांत स्थायिक होण्यास इच्छुक असलेला हा अतिश्रीमंत वर्ग आज केवळ अनिच्छेनेच हिंदुस्थानात राहतो आहे, असा अर्थ कोणी काढला तर तो चुकीचा म्हणता येणार नाही. मुळात ऐषोरामी, चंगळवादी व राजेशाही जीवन जगण्याचा पिंड गर्भश्रीमंतांमध्ये असतोच, हे कितीही मान्य केले तरी देशातील श्रीमंतांनी देश सोडून जाणे हे हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेसाठी मारक नाही काय? शिवाय आर्थिकदृष्ट्या अतिसंपन्न असलेल्या वर्गाला आपला देश सोडून जावे, असे वाटावेच का?

आर्थिक महासत्तेच्या दिशेने

घोडदौड करणारा देश म्हणून देशातील राज्यकर्ते आपली पाठ थोपटून घेत असताना देशातील श्रीमंतांना विदेशात घोडदौड करावी, असे का वाटत असावे? एक राष्ट्र म्हणून हे आपल्यासाठी अपमानास्पद नाही काय? आपल्या देशातील श्रीमंत कुटुंबे विदेशात स्थलांतरे करीत सुटली आहेत. दरवर्षी स्थलांतराचे हे प्रमाण वाढते आहे. हिंदुस्थानातील श्रीमंतांची संख्या वाढते आहे, असे सरकार अभिमानाने सांगते, पण हे वाढते श्रीमंत कोट्यधीश हिंदुस्थानला कायमचा रामराम ठोकून इतर देशांत का जात आहेत? मागच्या 2024 या वर्षात हिंदुस्थानातील तब्बल 4 हजार 300 श्रीमंत कोट्यधीशांनी हिंदुस्थान सोडण्याचा निर्णय घेतला होता. केवळ श्रीमंतच नव्हे, तर सामान्य व मध्यमवर्गीय जनतेलाही विदेशी भूमीचे आकर्षण वाटू लागले आहे. 2023 व 2024 या दोन वर्षांत दोन लाखांहून अधिक लोकांनी हिंदुस्थानचे नागरिकत्व सोडल्याची माहिती खुद्द सरकारनेच संसदेत दिली होती. देशातील उच्चशिक्षित, अतिश्रीमंत आणि मजूर व कामगार अशा सर्वच स्तरांतील लोकांच्या मनात देश सोडून जाण्याची भावना वाढीस का लागली आहे? हे राज्यकर्त्यांचे अपयश नव्हे काय? ताज्या बातमीनुसार देशातील 22 टक्के अतिश्रीमंत देश सोडून जाण्याच्या तयारीत असतील तर ती राष्ट्रीय शरमेची गोष्ट आहे व श्रीमंतांच्या या देशांतरालाच आपण ‘मेरा देश बदल रहा है’, असे म्हणायचे काय? देशातील जनतेला स्वप्नाळू, मायावी व आभासी दुनियेत घुमवणाऱ्या राज्यकर्त्यांकडे या प्रश्नाचे उत्तर आहे काय?