सामना अग्रलेख – महाराष्ट्राला आणखी काय हवे?

भाजपचे राजकारण हे ‘वापरा आणि फेका’ या वृत्तीचे आहे. मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत, तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? राजकारणात विष पेरण्याचेच काम त्यांनी केले. महाराष्ट्रात कृष्णा-कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा व त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावे ही त्यांची भूमिका नाही. प्रयागराजच्या गढूळ, अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवले व धर्माचा धंदा केला. महाराष्ट्रातील मराठी जनतेने बोध घ्यावा व प्रत्येक पाऊल जपून टाकावे असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे. विषातून अमृत निघाले तर महाराष्ट्राला हवेच आहे!

राज आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्यास तयार आहेत या बातमीने देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या बातमीने अनेकांना आनंद झाला तसे अनेक जण पोटदुखीने बेजार झाले. राज ठाकरे यांचे आतापर्यंतचे राजकारण नागमोडी पद्धतीचेच होते व ते फारसे यशस्वी झाले नाही. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी ‘मनसे’ या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्या वेळी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना लोकांचे बऱ्यापैकी समर्थन मिळाले, पण पुढे त्यांच्या पक्षाला ओहोटी लागली. भारतीय जनता पक्ष, ‘एसंशिं’ वगैरे लोक ‘राज’ यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर हल्ले करीत राहिले. यात राज यांच्या पक्षाचा राजकीय लाभ झाला नाही, पण मराठी एकजुटीचे अतोनात नुकसान झाले. मोदी व शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका ही राज यांची भूमिका होती. शहा-मोदी हे महाराष्ट्र हिताचा विचार करत नाहीत अशी राज यांची भूमिका होती. त्या भूमिकेला ते चिकटून राहिले नाहीत. भाजपचे हिंदुत्व नकली व तकलादू आहे. या नकली हिंदुत्वाच्या जाळ्यात भाजपने राज यांना अडकवले व गाडे घसरत गेले. आता त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले की, ‘‘झाले ते झाले, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडण किरकोळ आहे. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे या मला फार कठीण गोष्टी वाटत नाहीत. विषय फक्त इच्छेचा आहे.’’ राज ज्यास आमच्यातील वाद म्हणतात ते उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहेत. हे वाद कसले? ते कधीच बाहेर आले नाही. राज मराठी माणसांविषयी बोलत राहिले व शिवसेनेचा जन्मच मराठी हितासाठी झाला आणि ते हित उद्धव ठाकरे यांनी सोडले नाही. मग वाद असले? राज यांच्या वतीने भाजप, मिंधे वगैरे लोकच बोलू लागले व तसे बोलण्याचे काहीच कारण नव्हते. या लोकांनी वाद सुरू केले. त्यामुळे भाजप, मिंधे या लोकांना दूर ठेवले तर वाद राहतोच कोठे? एकत्र येण्यासाठी इच्छा हवी. राज म्हणतात ते खरे आहे, पण कोणाच्या इच्छेविषयी ते बोलत आहेत? राज यांनी त्यांची इच्छा व्यक्त करताच उद्धव ठाकरेही मागे राहिले नाहीत व

महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी

त्यांनीही दमदारपणे एक पाऊल पुढे टाकले. काही किरकोळ वाद असलाच तर तो बाजूला ठेवून मीसुद्धा महाराष्ट्र हितासाठी एकत्र काम करायला तयार असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. ही महाराष्ट्राच्या लोकभावनेची फुंकलेली तुतारी आहे. मराठी माणसाचा स्वाभिमान व महाराष्ट्राचे कल्याण यापुढे मतभेद वगैरे शून्य आहेत, पण राज यांनी महाराष्ट्राच्या शत्रूंच्या पंगतीला यापुढे बसू नये व महाराष्ट्रद्रोह्यांना घराच्या उंबरठ्याबाहेरच ठेवावे ही माफक अपेक्षा श्री. उद्धव यांनी व्यक्त केली असेल तर त्यास कोणी अट किंवा शर्त मानू नये. महाराष्ट्राच्या शत्रूंना घरात थारा देऊ नये असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यामागे एक वेदना आहे. अमित शहा, मोदी, फडणवीस, एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर वार केले. याच शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या आईशी बेइमानी करणाऱ्यांना पंगतीला बसवून महाराष्ट्र हिताची बात एकत्र येऊन कशी पुढे नेणार? हा साधा सरळ प्रश्न आहे. शिंदे व त्यांचे लोक हे मोदी-शहांचे मिंधे आहेत. फडणवीस यांच्या महाराष्ट्रप्रेमाचे ढोंग वारंवार उघडे पडले आहे. मुंबई या लोकांनी विकायला काढली व महाराष्ट्र लुटीचे ‘टेंडर’ काढले ते अमराठी ठेकेदारांना दिले. धारावीच्या निमित्ताने संपूर्ण मुंबई गुजराती व्यापाऱ्यांच्या घशात घातली जात असताना मराठी माणूस मुंबईचा हा विस्कोट उघड्या डोळ्याने, एका हतबलतेने पाहत आहे. मुंबईत इतर समाज संकटकाळी एकवटून कडवटपणाने उभा राहतो, परंतु हाच एकजुटीचा मराठी बाणा आज खिळखिळा झाला आहे. विलेपार्ले हा एकेकाळी मराठी संस्कृतीचा अभेद्य गड, परंतू परवा तेथील एका जैन देरासरवर महापालिकेची कारवाई होताच काही क्षणांत हजारो जैन बांधव एकवटले व त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढून पालिकेच्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करायला भाग पाडले. मुंबईत इतर जातीय व धर्मीय बांधव एकजुटीने राहतात आणि भाजपसारख्या व्यापारी वृत्तीच्या पक्षांना पाठबळ देतात. हे महाराष्ट्राच्या पर्यायाने मराठी माणसांच्या मुळावर येणारे आहे.

मराठी माणसाची एकजूट

कमजोर केली की, महाराष्ट्रापासून मुंबईचा तुकडा पाडता येईल हे भाजप व त्यांच्या व्यापारी मंडळाचे सरळ गणित आहे. म्हणूनच त्यांनी मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहणाऱयांचे डोळे काढून हातात देणाऱया मराठी एकजुटीवर प्रहार करण्याचे सातत्याने प्रयत्न केले. मराठी एकजुटीची वज्रमूठ असलेल्या शिवसेनेवरही त्यांनी घाव घातला आणि त्यासाठी कुऱ्हाडीचा दांडाच वापरण्यात आला. चार वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. महाराष्ट्र विधानसभा भाजप व त्यांच्या व्यापारी मंडळाने कशा जिंकल्या त्याचे गणित वॉशिंग्टन मुक्कामी असलेल्या तुलसी गबार्ड यांनी सांगितलेच आहे. अर्थात, या सगळ्या महाराष्ट्रद्रोह्यांशी लढण्याची हिंमत आणि ताकद फक्त मराठी माणसात आहे. त्यामुळे मराठी माणसाने एकत्र यायलाच हवे. राज ठाकरे यांना या एकजुटीचे महत्त्व पटले आणि उद्धव ठाकरे यांनीही मनमोकळेपणाने प्रतिसाद दिला. महाराष्ट्रद्रोह्यांची दाणादाण उडवणारी ही राजकीय घडामोड आहे. दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा येऊन ते चिडचिडपणा करू लागले, तर काही जण चेहऱ्यावर खोटा आनंद आणून ‘‘व्वा, छान! दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आनंदच’’ असे सांगत आहेत, पण महाराष्ट्रद्रोह्यांचा हा आनंद खरा नाही. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच घडावे. वाद, भांडणे यात उभे आयुष्य गेले तर महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत. भाजपचे राजकारण हे ‘वापरा आणि फेका’ या वृत्तीचे आहे. मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत, तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? राजकारणात विष पेरण्याचेच काम त्यांनी केले. महाराष्ट्रात कृष्णा-कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा व त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावे ही त्यांची भूमिका नाही. प्रयागराजच्या गढूळ, अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवले व धर्माचा धंदा केला. महाराष्ट्रातील मराठी जनतेने बोध घ्यावा व प्रत्येक पाऊल जपून टाकावे असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे. विषातून अमृत निघाले तर महाराष्ट्राला हवेच आहे!