सामना अग्रलेख – एक अकेला मोदी-शहा पर भारी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, किरेन रिजिजू, रविशंकर प्रसाद, भूपेंद्र यादव हे एका बाजूला दुसऱ्या बाजूलाएक अकेलाराहुल गांधी या सगळय़ांवर भारी पडले. मोदीशहांचा अहंकार संसदेत चूर करण्याचे काम गांधी यांनी केले. ईडी, सीबीआयचा दुरुपयोग करून संपूर्ण विरोधी पक्षाला मोदीशहा घाबरवत राहिले. आता विरोधी पक्षनेते झालेल्या राहुल गांधींना रोखा, त्यांच्यापासून संरक्षण द्या, अशी याचिका लोकसभा अध्यक्षांकडे करण्याची वेळ या अहंकाऱ्यांवर आली. काळाने घेतलेला हा सूड आहे. मोदीशहांना यापेक्षा वाईट दिवस भविष्यात पाहावे लागणार आहेत. गांधी यांना थांबवणे आता सोपे नाही. ईडी, सीबीआयला हा संदेश एव्हाना गेलाच असेल!

भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचा आणि हिंदूंचा ठेका घेतलेला नाही, असा जोरदार हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. भर संसदेत मोदी, शहा व त्यांच्या भाजपचा मुखवटा गांधी यांनी ओरबाडून काढला व एकच गोंधळ झाला. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण मागण्याची वेळ अमित शहांवर आली. याबद्दल गांधी यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना राहुल गांधी यांनी मोदी यांच्या देवत्वाचा शेंदूर खरवडून काढला. राहुल गांधी यांनी सांगितले, ‘‘हे लोक हिंदुत्वाच्या नावावर दंगली घडवत आहेत. मत्सर, द्वेष पसरवत आहेत. खरे हिंदुत्व संयमी आणि सत्याची कास निर्भयपणे धरणारे आहे.’’ यावर पंतप्रधान मोदी हे तगमगत उठले व गांधी हे हिंदू समाजाचा अपमान करीत असल्याचे बोलले. यावर गांधी यांनी ताडकन उत्तर दिले, ‘‘महाशय, तुम्हाला हिंदुत्व कळलेच नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही.’’ यावर मोदी यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. मोदी-शहांच्या मैदानात शिरून त्यांना अशा पद्धतीने कोणीच सुनावले नव्हते. दहशत व पाशवी बहुमताच्या बळावर या जोडगोळीने संसद आपल्या टाचेखाली ठेवण्याचा प्रयत्न केला, पण गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत विरोधी पक्ष लोकसभेत अवतरताच हिंदुत्वाच्या नावावर मनमानी करणाऱ्यांचा टांगा पलटी झाला आहे. मोदी व शहा यांनी धर्माच्या नावावर लोकांना दहा वर्षे खेळवत व भांडत ठेवले.  गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष बिर्ला

यांनाही आरसा

दाखवला. ‘‘विरोधी पक्षनेते म्हणून मी तुमच्याशी हस्तांदोलन केले, तेव्हा तुम्ही भलत्याच ताठ कण्याने उभे होता, पण मोदींशी हात मिळवताना तुम्ही सपशेल वाकलात. म्हणजे लोकशाहीच वाकली असे म्हणावे लागेल.’’ गांधी यांच्या हल्ल्यामुळे संसदेतील प्रतिष्ठित चमचे व अंधभक्त उताणेच पडले. एकाच फटक्यात शंभरावर खासदारांचे निलंबन करून मोकळय़ा सभागृहात महत्त्वाचे कायदे मंजूर करून घेणाऱ्या लोकसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेत्याने जे खडे बोल सुनावले, त्यामुळे गेली दहा वर्षे मरगळलेल्या संसदेच्या भिंतींनाही जाग आली. ‘आपण बायोलॉजिकल नसून परमेश्वराचे पुत्र आहोत. आपला थेट संवाद परमेश्वराशी आहे’, असे मोदी सांगतात. गांधी यांनी या अवताराची चांगलीच खिल्ली उडवली. ते म्हणाले की, ‘मोदीजी, नोटाबंदी करण्याचा संदेश थेट वरून देवाकडून आला काय? मुंबई विमानतळ अदानी यांना देण्यासाठीसुद्धा वरूनच ऑर्डर आली असेल खटाखट खटाखट.’ यावर मोदी-शहांना लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण मागण्याशिवाय पर्याय राहिला नाही. संसदेत नरेंद्र मोदी हे स्वतःच्या कर्माने चेष्टेचा विषय झाले. मोदी हे जोडतोड करून पंतप्रधान झाले असले तरी त्यांच्या नेतृत्वास उतरती कळा लागली आहे. गांधी यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, ‘‘मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढायची होती. त्यांनी तीन कंपन्यांना सर्व्हेचे काम दिले. तिघांनीही मोदींना निर्णय दिला की, मोदीजी तुम्ही रामाच्या वाटेला जाऊ नका. अयोध्येतील जनता हरवेल. तेव्हा मोदी पुन्हा वाराणसीत गेले व कसेबसे जिंकले!’’ मोदी यांच्या तोंडावर

इतकी फजिती

कोणीच केली नसेल. मोदी यांचे हिंदुत्व हे नफरत आणि हिंसा फैलावणारे आहे. हिंदू-मुसलमानांत भांडणे लावणारे आहे, पण पंतप्रधान मोदी एकदाही हिंसाचारग्रस्त मणिपुरात गेले नाहीत. भाजप भय आणि द्वेषाचे विष पसरवतो. हा राष्ट्रवाद नाही आणि हिंदुत्व तर नाहीच. हिंदुत्व हे संस्कारी आणि सुसंस्कृत आहे. हा संस्कार भाजपमध्ये नाही. मोदी यांना निवडणूक प्रचारात ‘मुजरा’ आठवला. मुसलमान तुमच्या बायकांच्या गळय़ातील मंगळसूत्रे खेचतील. तुमच्याच दारात दोन म्हशी असतील तर एक म्हैस घेऊन जातील, अशी उटपटांग भाषणे करूनही मोदी यांना हिंदूंची मते मिळाली नाहीत. महाराष्ट्र, प. बंगाल, केरळ, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत त्यांचा सपशेल पराभव झाला. मोदी यांचे नकली हिंदुत्वाचे नाणे अजिबात चालले नाही व सोमवारी संसदेत राहुल गांधी यांनी मोदी-शहांना नामोहरम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, किरेन रिजिजू, रविशंकर प्रसाद, भूपेंद्र यादव हे एका बाजूला व दुसऱ्या बाजूला ‘एक अकेला’ राहुल गांधी या सगळय़ांवर भारी पडले. मोदी-शहांचा अहंकार संसदेत चूर करण्याचे काम गांधी यांनी केले. ईडी, सीबीआयचा दुरुपयोग करून संपूर्ण विरोधी पक्षाला मोदी-शहा घाबरवत राहिले. आता विरोधी पक्षनेते झालेल्या राहुल गांधींना रोखा, त्यांच्यापासून संरक्षण द्या, अशी याचिका लोकसभा अध्यक्षांकडे करण्याची वेळ या अहंकाऱ्यांवर आली. काळाने घेतलेला हा सूड आहे. मोदी-शहांना यापेक्षा वाईट दिवस भविष्यात पाहावे लागणार आहेत. गांधी यांना थांबवणे आता सोपे नाही. ईडी, सीबीआयला हा संदेश एव्हाना गेलाच असेल!