सामना अग्रलेख – पुणे हादरले, पुणेकर थंड!

खून, बलात्कार, कोयता गँग हीच आता पुण्याची संस्कृती झाली. विद्येचे माहेरघर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही ओळख त्यामुळे पुसली गेली याचे दुःख कोणालाच नाही. स्वारगेटच्या निर्भया कांडाने पुणे हादरले, तरी पुणेकर थंड पडले ते त्यामुळेच. पुणेकर थंड आणिलाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन त्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणारे सध्याचे राज्यकर्ते त्यापेक्षा जास्त थंड. मग राज्यात खून, गुन्हेगारी आणि स्त्री अत्याचारांची बेबंदशाहीमाजणार नाही तर काय होणार?

पुण्यात कायदा-सुव्यवस्था आणि संस्कृतीचे धिंडवडे निघाले आहेत. राज्य शासनाच्या ‘शिवशाही’ बसमध्येच लाडक्या बहिणीवर बलात्कार केला आणि नराधम पसार झाला. बुधवारी पहाटे साडेपाच वाजता हा अतिप्रसंग घडला तेव्हा महाराष्ट्राचे सरकार नेहमीप्रमाणे झोपेतच होते. काही वर्षांपूर्वी दिल्लीत चालत्या बसमध्ये असेच निर्भया कांड घडले तेव्हा भारतीय जनता पक्षाने संसद ठप्प केली होती. दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलन सुरू केले होते. आज महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत, पण लाडक्या बहिणींना संरक्षण नाही. कारण राज्यात गुंडांना राजकीय संरक्षण लाभले आहे. पुण्यात खून, अपहरण, खंडणी, महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढले आहेत. भररस्त्यात हाती कोयते व तलवारी नाचवत गुंड टोळ्या थैमान घालतात, हे कसले चित्र आहे? स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये हे भयंकर कृत्य घडले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते तेथे जमले व त्यांनी स्वारगेट बस स्थानकावर हल्ला केला. तेथे अनेक बस उभ्या होत्या. त्यात काय आढळावे? दारूच्या बाटल्या, महिला-पुरुषांचे कपडे, कंडोम्स आणि इतर बरेच काही. याचा काय अर्थ घ्यायचा? एस.टी. व सरकारी परिवहन उपक्रम तोट्यात असल्याने या गाड्यांचे ‘कोठे’ बनवून चालवायला दिले आहेत काय व या अशा धंद्यांतून कोणी कमाई करीत आहे काय? महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांनी तडकाफडकी 23 सुरक्षा रक्षकांचे निलंबन केले. हे

सुरक्षा रक्षक खासगी कंपनीचे

होते व ही खासगी कंपनी भाजपशी संबंधित नेत्याचीच असायला हवी. प्रत्येक कामात पैसे खायचे म्हणजे खायचेच हे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे. त्याचाच परिणाम स्वारगेट बलात्कार प्रकरणात दिसला. बदलापूर, अंबरनाथ, ठाणे आणि आता पुण्यात स्वारगेटला मुलींवर हे असे अत्याचार झाले. लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिल्याने हे महिला अत्याचाराचे पाप धुऊन निघणार नाही. फडणवीसांचे सरकार महिला अत्याचाराबाबतीत गंभीर नाही. पूजा चव्हाण या महिलेचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला तेव्हा मृत्यूस जबाबदार असलेल्या मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मागण्यात तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आघाडीवर होते. आज फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात तेच संजय राठोड सन्मानाने विराजमान झाले. फडणवीस यांचा महिलांसंदर्भातला आदर व चिंता खरी असती तर राठोडसारख्यांना त्यांनी मंत्रिमंडळात येऊच दिले नसते. त्यामुळे जे देवेंद्र फडणवीस पूजा चव्हाणला न्याय देऊ शकले नाहीत, ते इतर पीडित महिलांना काय न्याय देणार? स्वारगेट बलात्कार प्रकरणात ‘पुणे हादरले’ असे म्हणतात, पण पुणेकर हादरले असे काही दिसले नाही. त्यांचे जीवन आरामात चालले आहे. पुण्याची संवेदना, मानवता व लढाऊ बाणा संपला आहे. पुण्यावर गेल्या काळात जे बाह्य लोकसंख्येचे सांस्कृतिक आक्रमण झाले, त्यामुळे पुण्याचा सामाजिक लढवय्या आत्मा जवळ जवळ मृत झाला. स्वारगेट कांडातील आरोपी दत्ता गाडे याचे कोणत्या पक्षाशी लागेबांधे आहेत हे शोधून आता त्यावर

चिखलफेक सुरू

झाली. असा आरोपी कोणत्याही पक्षाचा, पंथाचा आणि धर्माचा असेल, तो काय कुणाची परवानगी घेऊन असे विकृत कृत्य करतो? त्यास बेड्या ठोकणे व कठोर शिक्षा ठोठावणे हेच कायद्याचे काम आहे, पण या अशा प्रकरणातही राजकीय पक्षांना बदनाम करण्यातच धन्यता मानली जात असेल तर महाराष्ट्रात प्रत्यक्ष देव उतरले तरी महिलांवरील अत्याचार थांबणार नाहीत. बीडच्या संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे व आता स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेसुद्धा पळून गेला. पक्षांतर केलेले आमदार पोलीस बंदोबस्तात सुरतला पोहोचवले तसे कडेकोट संरक्षण या गुन्हेगारांनाही लाभले आहे काय? असा प्रश्न पडतो. सरकारची संवेदना मेली आहे आणि पुणेकर आपला बाणेदार पूर्वेतिहास विसरून खून, बलात्कार पचवून अजगरासारखे निपचित पडले आहेत. खून, बलात्कार, कोयता गँग हीच आता पुण्याची संस्कृती झाली. विद्येचे माहेरघर व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही ओळख त्यामुळे पुसली गेली याचे दुःख कोणालाच नाही. स्वारगेटच्या निर्भया कांडाने पुणे हादरले, तरी पुणेकर थंड पडले ते त्यामुळेच. पुणेकर थंड आणि ‘लाडक्या बहिणीं’ना 1500 रुपये देऊन त्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणारे सध्याचे राज्यकर्ते त्यापेक्षा जास्त थंड. मग राज्यात खून, गुन्हेगारी आणि स्त्री अत्याचारांची ‘बेबंदशाही’ माजणार नाही तर काय होणार?