
मोदी–ट्रम्प भेटीतून 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणा याचे मार्गी लागलेले प्रत्यार्पण तसेच व्यापारी, संरक्षण आणि इतर करारांचा नेहमीचा सोपस्कार हे सगळे ठीक असले तरी या करारांमध्ये भारतासाठी ‘घेवाण’ किती आणि ‘देवाण’ किती? ट्रम्प यांच्या ‘टेरिफ’च्या दणक्याने भारतीय अर्थव्यवस्थेला आलेले टेंगूळ कमी करण्यासाठी एखादे ‘मलम’ ट्रम्प यांनी त्यांचे ‘टफ निगोशिएटर मित्र’ मोदी यांना दिले आहे काय? मोदींच्या या ‘टफ निगोशिएशन’चा देशाला किती फायदा झाला आणि त्यांच्या उद्योगपती मित्राला किती झाला? हा दौरा कोणासाठी होता? मोदीजी, तुमच्या अमेरिका दौऱ्याने निर्माण केलेले हे असंख्य प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे भारतीय जनतेला हवी आहेत. ती देण्याचे धाडस तुम्ही दाखविणार आहात का?
पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मोदींनी आलिंगन देताच ट्रम्प यांना म्हणे खूपच गहिवरून आले. ते मोदींना म्हणाले की, ‘‘मिस्टर प्राईम मिनिस्टर, वुई मिस यू अ लॉट!’’ त्यावर मोदी यांनी काय उत्तर दिले ते ट्रम्प यांनाच माहीत. परंतु मोदी आणि ट्रम्प हे ‘मित्र’ आहेत आणि मागील चार-पाच वर्षे ट्रम्प सत्तेत नसल्याने ते एकमेकांना मिस करू शकतात. ट्रम्प यांच्यासाठी मोदी हे ‘हाऊडी मोदी’ आहेत आणि मोदींसाठी ट्रम्प हे ‘केम छो’ आहेत. ट्रम्प यांच्या पहिल्या कारकीर्दीत या संबंधांचा प्रत्यय आला होता. आता मोदी यांच्या तिसऱ्या आणि ट्रम्प यांच्या दुसऱ्या कारकीर्दीतील त्या दोघांची ही पहिलीच गळाभेट होती. साहजिकच ट्रम्प यांनी मोदी यांचे उत्कट स्वागत केले, तर मोदी यांनीही ‘‘तुम्हाला पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये पाहून मला खूप बरे वाटले,’’ अशी स्तुतीसुमने ट्रम्प यांच्यावर उधळली. मोदी हे अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांच्या मुलांमध्येही रमले. ट्रम्प यांनी मोदी यांना ‘मि. प्राईम मिनिस्टर, यू आर ग्रेट’ असे स्वतःच्या स्वाक्षरीसह लिहिलेले एक खास पुस्तक भेट देऊन आपल्या मोदीप्रेमाची साक्ष पुन्हा दिली. मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील या
मुद्द्यांचे भांडवल
मोदीभक्त नक्कीच करतील. मोदींचा हा दौरा भारतासाठी कसा फायदेशीर ठरला, मोदी-ट्रम्प मैत्रीमुळे भारताच्या पारड्यात कसे अनेक लाभ पडले याचा ढिंढोरा मोदीभक्त नक्कीच पिटतील. त्यासाठी ते ट्रम्प महाशयांच्या ‘मोदी इज टफ निगोशिएटर’ या वक्तव्याचा हवाला द्यायलाही कमी करणार नाहीत. प्रश्न इतकाच आहे की, मोदींच्या ‘टफ निगोशिएशन’ वगैरेमुळे देशाला खरोखर किती फायदा झाला? त्या बदल्यात भारताला अमेरिकेच्या तिजोरीत काय काय टाकावे लागणार आहे? पुन्हा मोदींचे हे टफ निगोशिएशन नेमके कोणासाठी होते? देशासाठी की उद्योगपती मित्रासाठी? कारण मोदीमित्र अदानी यांना या दौऱ्याआधीच अमेरिकेतील लाचखोरीच्या खटल्याबाबत दिलासा मिळाला होता. तसा निर्णयच ट्रम्प यांनी घेतला. ‘फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्ट – 1977’ (एफसीपीए) ला ट्रम्प यांनी सोमवारीच स्थगिती दिली. हे सगळे मोदींच्या दौऱ्याआधी घडले असे दिसत असले तरी दौऱ्याच्या पूर्वसंध्येला घडले, हा निव्वळ योगायोग कसा म्हणता येईल? ट्रम्प यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत यासंदर्भातील प्रश्नाला मोदी यांनी बगल दिली. देशात असताना तुम्ही ज्या प्रश्नावर मौन बाळगतात, त्या प्रश्नाला परदेशात तुम्ही वैयक्तिक, खासगी संबोधून बगल देता!
मोदींच्या याच बनवाबनवीवर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही नेमके बोट ठेवले आहे आणि मोदींच्या ‘टफ निगोशिएशन’ला उघडे पाडले आहे. मोदींचे अमेरिकेतील पत्रकार परिषदेतील हे उत्तर म्हणजे अमेरिकेतील अदानी लाचखोरी प्रकरणावर पडलेला पडदा समजायचा का? अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांनी भलेही आता त्या कायद्याला स्थगिती दिली असेल, पण म्हणून या खटल्याने भारताच्या प्रतिमेवर उडालेले शिंतोडे कसे पुसले जाऊ शकतात? प्रश्न असंख्य असले तरी नेहमीप्रमाणे मोदी त्यांचीदेखील उत्तरे अनुल्लेखाने टाळतील. बाकी मोदी-ट्रम्प भेटीतून 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणा याचे मार्गी लागलेले प्रत्यार्पण तसेच व्यापारी, संरक्षण आणि इतर करारांचा नेहमीचा सोपस्कार हे सगळे ठीक असले तरी या करारांमध्ये भारतासाठी ‘घेवाण’ किती आणि ‘देवाण’ किती? ट्रम्प यांच्या ‘टेरिफ’च्या दणक्याने भारतीय अर्थव्यवस्थेला आलेले टेंगूळ कमी करण्यासाठी एखादे ‘मलम’ ट्रम्प यांनी त्यांचे ‘टफ निगोशिएटर मित्र’ मोदी यांना दिले आहे काय? मोदींच्या या ‘टफ निगोशिएशन’चा देशाला किती फायदा झाला आणि त्यांच्या उद्योगपती मित्राला किती झाला? हा दौरा कोणासाठी होता? मोदीजी, तुमच्या अमेरिका दौऱ्याने निर्माण केलेले हे असंख्य प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे भारतीय जनतेला हवी आहेत. ती देण्याचे धाडस तुम्ही दाखविणार आहात का?