![narendra modi](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/narendra-modi-1-1-696x447.jpg)
गेल्या दहा वर्षांत राष्ट्रपतींचे अभिभाषण म्हणजे सरकारची चौफेर चमचेगिरीच झाली आहे आणि त्यावर पंतप्रधानांचे उत्तर म्हणजे उखाळ्यापाखाळ्या याशिवाय दुसरे काही नसते. मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लोकसभेतील पराभव आणि आणीबाणीतला अत्याचार वगैरे तेच विषय पुन्हा कथन केले. अमेरिकेने सव्वाशे भारतीयांना हातापायात दंडबेड्या घालून परत पाठवले. त्या अपमानावर मोदी बोलत नाहीत. कुंभमेळ्यातील मृतांच्या खऱ्या आकड्यावरही ते गप्प आहेत, पण भलत्याच विषयावर त्यांचे डोलणे व बोलणे चालले आहे. गंगेच्या पवित्र स्नानाचा नेमका काय फायदा झाला? मोदी बोलतात व भक्त टाळ्या वाजवतात. त्यासाठी संसद कशाला वेठीस धरता?
पंतप्रधान मोदी यांची भाषणे म्हणजे आगा ना पीछा अशाच प्रकारची होत आहेत. विषयांतर करण्यात आणि विषयाला सोडून बोलण्यात त्यांचा हात कोणी धरणार नाही. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी असेच विषयांतर केले. मोदी हे आदल्या दिवशीच गंगेत डुबकी मारून आले. त्यामुळे गंगेचे पावित्र्य त्यांच्या विचारांत शिरेल व ते संयमाने बोलतील असे वाटले होते, पण संसदेत त्यांनी भलतेच विषयांतर केले. राष्ट्रपती भाषणात आपल्या सरकारचा लेखाजोखा मांडतात. भविष्यातील धोरणांचा मसुदा देतात. संसदेत त्यावर चर्चा घडते. विरोधकांकडून सूचना मांडल्या जातात. या चर्चेच्या शेवटी पंतप्रधान सगळ्या मुद्द्यांवर उत्तर देतात. ही एक परंपरा आहे. गेल्या दहा वर्षांत राष्ट्रपतींचे अभिभाषण म्हणजे सरकारची चौफेर चमचेगिरीच झाली आहे आणि त्यावर सत्ताधाऱ्यांची भाषणे आणि पंतप्रधानांचे उत्तर म्हणजे उखाळ्यापाखाळ्या याशिवाय दुसरे काही नसते. विरोधकांना धडपणे बोलूच दिले जात नाही. पंतप्रधानांनी या वेळीही निराशा केली नाही. काँग्रेस आणि विरोधकांवर सडकून टीका केली. काँग्रेसने देशातील महानुभावांना बंधक बनवले. त्यांना बेड्या घातल्या. देशाला जेलखाना बनवले. त्यामुळे काँग्रेसच्या तोंडी ‘संविधान’ हा शब्द शोभत नसल्याचे फूत्कार पंतप्रधानांनी सोडले व सत्ताधाऱ्यांनी बाके वाजवून प्रोत्साहन दिले. हे बाके वाजवणाऱ्यांपैकी बहुसंख्य पूर्वाश्रमीचे काँग्रेसवालेच होते. आपल्या स्वार्थासाठी किंवा जेलवारी टाळण्यासाठी ते अचानक मोदी भजनी लागले. मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लोकसभेतील पराभव आणि आणीबाणीतला अत्याचार वगैरे तेच तेच विषय पुन्हा कथन केले. मोदींच्या भाषणातील किमान 99 टक्के मुद्दे हे खोटे असतात व पुनः पुन्हा ते खोटे मुद्दे रेटून नेतात. काँग्रेसने तेव्हा जेलखाना बनवला. मग आता देशात वेगळे काय सुरू आहे?
राजकीय विरोधकांना
उचलून तुरुंगातच टाकले जात आहे. व्यंगचित्रकार, लेखक, कवी, नट, नकलाकारांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आज उरले आहे काय? मोदींचे व्यंगचित्र काढले म्हणून कलाकारांना तुरुंगात टाकले गेले व गजाआड सडवून ठेवले. ‘मीडिया’ मोदींनी आपल्या पायाशी बसवून ठेवला व सत्य दाखवण्यावर बंदी आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्य औषधालाही उरलेले नाही. याला जेलखाना म्हणायचे नाही तर काय? स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने संविधान निर्मात्यांच्या भावना पायदळी तुडविल्याचे दुःख मोदी यांनी व्यक्त केले. प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी व त्यांच्या पक्षाला चारशे खासदारांचा आकडा पार करून देशाचे मूळ संविधान बदलायचेच होते व आजही न्यायालये, राजभवन, निवडणूक आयोग वगैरे संवैधानिक पदांवर लाचार, गुलाम मनोवृत्तीची माणसे लादून मोदी यांनी संविधानाची ऐशी की तैशीच केली. निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना उचलून तुरुंगात डांबायचे. आमदार-खासदार विकत घ्यायचे. मतदार यादीत घोटाळे करून, ईव्हीएम मॅनेज करून निवडणुका जिंकायच्या व विजयाचे ढोल वाजवायचे हे कोणते नवे संविधान श्रीमान मोदी यांनी लागू केले? मोदी यांनी भाषणात बलराज सहानी व पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे उदाहरण दिले ते निरर्थक आहे. बलराज सहानी यांना काँग्रेसने तुरुंगात डांबले व मंगेशकरांनी वीर सावरकरांच्या गीतास संगीत साज चढवला म्हणून आकाशवाणीने त्यांना नोकरीतून काढल्याची थाप पंतप्रधान महोदयांनी संसदेत मारावी यासारखे दुर्दैव नाही. मोदी यांनी नीट माहिती घेऊन बोलायला हवे होते. कारण ते पंतप्रधान आहेत. बलराज सहानी हे एक सशक्त अभिनेते होते, पण त्यांचा संबंध कम्युनिस्ट म्हणजे डाव्या चळवळीशी होता. ते चळवळीत सक्रिय होते. प्रोगेसिव्ह रायटर्स संघटनेचे ते आधारस्तंभ होते. के. असिफ यांच्या ‘हलचल’ चित्रपटात त्यांना ‘जेलर’ची भूमिका साकारायची होती व त्यासाठी त्यांना
प्रत्यक्ष जेलमध्ये जाऊन
अनुभव घ्यायचा होता. पण योगायोग असा की, त्याच काळात मुंबईत डाव्यांचे एक जोरदार आंदोलन झाले होते. दंगल उसळली होती आणि आगी वगैरे लावल्या गेल्या होत्या. त्यावरून सामुदायिक अटका झाल्या. त्यात बलराज सहानी होते. तेव्हा सहानी यांची अभिनेता म्हणून फारशी प्रसिद्धी झाली नव्हती. त्यांना आर्थर रोड तुरुंगात नेले. काही दिवसांनी निर्माते के. असिफ त्यांना भेटायला जेलमध्ये आले व त्यांनी पोलीस आणि जेलरला वस्तुस्थिती सांगितली. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय सुटका होत नाही, हे खरे असले तरी बलराज सहानी जेलमध्ये होते तोपर्यंत रोज त्यांना ‘हलचल’च्या शूटिंगला तुरुंगातून जाण्याची सवलत सरकारने दिली होती व चाळीस दिवसांचे शूटिंग सहानी यांनी तुरुंगात असताना पूर्ण केले. हे आपल्या पंतप्रधानांना कोणी सांगितले नाही काय? मंगेशकरांचा संदर्भही अर्धसत्य आहे. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ हेच ते वीर सावरकरांचे गीत संगीतबद्ध केले हृदयनाथांनी. त्यांची नोकरी या गाण्यामुळे गेली काय ते कोणी ठरवायचे? पण ‘सागरा प्राण तळमळला’ हे वीर सावरकरांचे गीत हजारो वेळा आकाशवाणीने वाजवले व आकाशवाणीमुळेच या गाण्यास लोकमान्यता मिळाली. पण पंतप्रधान मोदी या विषयावर ‘मन की बात’ सांगत आहेत. खोट्या कहाण्यांचे सादरीकरण करून लोकांना गंडवण्याचे हे त्यांचे उद्योग धोकादायक आहेत. अमेरिकेने सव्वाशे भारतीयांना हातापायात दंडबेड्या घालून परत पाठवले. त्या अपमानावर मोदी बोलत नाहीत. कुंभमेळ्यातील मृतांच्या खऱ्या आकड्यावरही ते गप्प आहेत, पण भलत्याच विषयावर त्यांचे डोलणे व बोलणे चालले आहे. गंगेच्या पवित्र स्नानाचा नेमका काय फायदा झाला? मोदी बोलतात व भक्त टाळ्या वाजवतात. त्यासाठी संसद कशाला वेठीस धरता?