
राष्ट्रभक्तीची प्रेरणा व मराठी प्रेम आपल्याला संघामुळे समजले हे मोदींचे विचार, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन होण्याच्या अनेक शतके आधी भारतवर्षात राष्ट्रभक्तीची व लढण्याची प्रेरणा होतीच. शिवरायांची भाषा मराठीच होती. स्वातंत्र्याच्या कोणत्याच लढ्यात ‘भाजप’ किंवा ‘संघ’ नव्हता. ते फक्त स्वातंत्र्याचा फुकट उपभोग घेत आहेत. त्यामुळे राष्ट्रभक्तीची ही उधार प्रेरणा त्यांना मिळते कोठून? याचा खुलासा कधीच झाला नाही. पंतप्रधान मोदींना भाषणे लिहून देणाऱ्यांनी भान ठेवले असते तर बरे झाले असते. मोदीजी तालकटोरावर आले नाहीत. का? त्यांना कसले भय वाटले? महाराष्ट्राच्या शौर्याचे, स्वाभिमानी बाण्याचे की वाढत चाललेल्या गोडसे प्रवृत्तीचे?
दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटनपर भाषण केले. ते जोरकस होते. साहित्य संमेलनाचा मुख्य सोहळा तालकटोरा मैदानात होता, पण पंतप्रधान मोदी यांनी विज्ञान भवनाच्या सभागृहात साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. मोदींच्या सुरक्षेच्या वगैरे कारणांसाठी उद्घाटनाचा हा वेगळा घाट घातला. याची खरेच गरज होती काय? तालकटोरावर भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यक्रमांना पंतप्रधानांनी हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वी याच तालकटोरा स्टेडियमला मोदींनी ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम केला व त्यास चांगली गर्दी जमवली होती. मग तालकटोरावरील मराठी सारस्वतांच्या मेळ्यात जाण्याचे पंतप्रधानांनी का टाळावे? त्यांना कोणाचे भय वाटले? दिल्लीचेही तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राचे भय वाटले व साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपात मोदी गेले नाहीत असे समजावे काय? पुन्हा हा मंडप छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभारला व सजवला गेला होता. विज्ञान भवनात मोदींचे भाषण टिपणारे पत्रकार, भाजपचे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, खासदार, अधिकारी जास्त होते. साहित्यिक, प्रकाशक, रसिक श्रोते हे तालकटोरावरच ताटकळत राहिले. त्यामुळे विज्ञान भवनात पंतप्रधानांच्या उपस्थितीत जणू एक समांतर संमेलन भरवून उद्घाटन केले गेले. दिल्लीत 1954 साली साहित्य संमेलन झाले व त्याचे उद्घाटन लेखक-साहित्यिक पंतप्रधान पंडित नेहरू यांनी केले. नेहरू प्रत्यक्ष संमेलनात सहभागी झाले व आपल्या भाषणात त्यांनी राजकीय प्रचार केला नाही. विज्ञान भवनात मोदी यांनी जे भाषण केले ते अनमोल मोतीच आहेत. मोदी यांच्या भाषणात त्यांच्या मराठी प्रेमाचे प्रतिबिंब नक्कीच पडले, पण हे बिंब-प्रतिबिंब खरे मानावे काय? मोदी यांनी त्यांच्या भाषणात मराठी भाषेच्या वैभवाची, गौरवाची महती गायली. संत रामदासांच्या महाराष्ट्र धर्म वाढविण्याच्या मंत्राचा उच्चार केला. छत्रपती शिवाजी महाराजांपासून संत ज्ञानेश्वर, तुकोबा, नामदेव, संत तुकडोजी, गाडगेबाबांचा उल्लेख केला व या सगळ्यांमुळे मराठी भाषा कशी
संपन्न आणि अभिजात
झाली ते कथन केले, पण मोदी यांना मराठी भाषेची गोडी लागली याचे कारण त्यांनी विज्ञान भवनातील सारस्वतांना मार्गदर्शन करताना सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीयांना देशासाठी जगण्याची प्रेरणा दिली.’’ मोदी यांनी पुढे अत्यंत महत्त्वाची आणि दुर्मिळ माहिती दिली ती अशी की, “महाराष्ट्राच्या भूमीवर 100 वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली व ती करणारे मराठी होते. त्यामुळे माझा मराठी भाषेकडे ओढा आहे. वेदांपासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत भारताच्या परंपरा आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या 100 वर्षांपासून करत आहे,’’ असे पंतप्रधान मोदी यांनी संमेलनाच्या मंचावरून सांगितले. मोदी हे बोलत होते तेव्हा पुरोगामी विचारांचे श्री. शरद पवार हे स्वागताध्यक्ष म्हणून मंचकावर उपस्थित होते. मोदी यांनी संघाची भलामण करायला हरकत नाही, पण साहित्य संमेलनाचे व्यासपीठ त्यासाठी वापरून घेणे बरे नाही. त्यामुळे आयोजकांचे चेहरे पडलेले दिसले. मोदी हे कोणत्या व्यासपीठावरून काय बोलतील किंवा त्यांच्याकडून वदवून घेतले जाईल याचा नेम नाही. मराठी साहित्य संमेलनातले पंतप्रधानांचे भाषण ज्यांनी तयार केले त्यांना दंडवतच घालायला हवा. राजकारण आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी मराठी साहित्य संमेलनही सोडले नाही. त्यामुळे पंतप्रधानांच्या भाषणातील अनेक साहित्यविषयक मुद्दे मागेच पडले. मराठी भाषा ही अमृताहुनी गोड आहे, असे मोदी यांनी सांगितले. मग त्या अमृत भाषेचा सोहळा जो तालकटोराला झाला तेथे मोदी का गेले नाहीत? पंतप्रधान मोदी यांनी काही साहित्यबाह्य कृती विज्ञान भवनातील मंचावर केल्या. त्यामुळे चर्चेला पेव फुटले. शरद पवार हे भाषण करून आले तेव्हा मोदी यांनी उठून श्री. पवार यांना खुर्चीत विराजमान होण्यास मदत केली. खरे तर याची गरज नव्हती, पण मोदी यांना लक्ष वेधून घ्यायचे होते. श्री. पवार खुर्चीत विराजमान झाल्यावर मोदी यांनी पवारांच्या ग्लासात पाणी ओतले, पण पवार ते पाणी प्यायले नाहीत. त्यामुळे
मोदी–पवार संबंधांवरच
वृत्तवाहिन्यांवर चर्चा सुरू झाल्या. साहित्य संमेलन राहिले बाजूला. प्रश्न असा आहे की, मोदी यांना पवारांच्या प्रती आदर वगैरे असता तर शरद पवार म्हणजे ‘भटकती आत्मा’ असल्याची विशेषणे लावून जाहीर सभांतून पवारांचा अवमान करण्याचा उद्योग पंतप्रधान मोदींनी केला नसता व परम आदरणीय पवारांचा पक्ष फोडून तो अजित पवारांच्या खिशात घातला नसता. त्या भटकत्या आत्म्यास अमित शहांनी काय शब्द वापरले? ‘‘पवारांचे कृषी-सहकार क्षेत्रात योगदान काय? पवारांनी महाराष्ट्राची लूट केली…’’ वगैरे मुक्ताफळे अमित शहा उधळतात, हे काही आदर असल्याचे लक्षण नाही. काका-पुतण्यांनी महाराष्ट्र लुटला, असे मोदी म्हणाले तो पुतण्या आज मोदींच्याच पक्षात आहे व काका साहित्य संमेलनाच्या मंचावर मोदींसोबत बसले. काकांसाठी स्वतः मोदींनी खुर्ची सरकवली हे चित्र गमतीचे आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या मंचावर भरकटलेले किती आत्मे भटकत होते ते पाहायला हवे. पंतप्रधान हे साहित्यविषयक कार्यक्रमात हजेरी लावतात तेव्हा त्यांनी व्यासपीठ आणि विषयाचे भान राखायला हवे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक कामांचे कौतुक करायला काहीच हरकत नाही. मात्र त्यासाठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ वापरणे योग्य नाही. राष्ट्रभक्तीची प्रेरणा व मराठी प्रेम आपल्याला संघामुळे समजले हे मोदींचे विचार, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन होण्याच्या अनेक शतके आधी भारतवर्षात राष्ट्रभक्तीची व लढण्याची प्रेरणा होतीच. देव, देश व धर्मासाठी लढणारे महान लोक अनेक शतकांपूर्वी याच मातीत जन्मास आले. शिवरायांची भाषा मराठीच होती. स्वातंत्र्याच्या कोणत्याच लढ्यात ‘भाजप’ किंवा ‘संघ’ नव्हता. ते फक्त स्वातंत्र्याचा फुकट उपभोग घेत आहेत. त्यामुळे राष्ट्रभक्तीची ही उधार प्रेरणा त्यांना मिळते कोठून? याचा खुलासा कधीच झाला नाही. पंतप्रधान मोदींना भाषणे लिहून देणाऱ्यांनी भान ठेवले असते तर बरे झाले असते. मोदीजी तालकटोरावर आले नाहीत. का? त्यांना कसले भय वाटले? महाराष्ट्राच्या शौर्याचे, स्वाभिमानी बाण्याचे की वाढत चाललेल्या गोडसे प्रवृत्तीचे?