सामना अग्रलेख – प्रे. ट्रम्पने पाचर मारली!

पंतप्रधान मोदी यांना त्यांचे भक्त विश्वगुरू मानतात. प्रे. ट्रम्प यांनी भारतीयांवर उपकार करणारे एक काम मात्र केले ते म्हणजे ‘ईव्हीएम’बाबत पंतप्रधानांचे कान टोचले. लोकशाही टिकवायची असेल, लोकशाहीची प्रतिष्ठा कायम ठेवायची असेल तर मतपत्रिका म्हणजे बॅलट पेपरवरच निवडणुका घ्याव्या लागतील. मोदी आता काय करणार? प्रे. ट्रम्पने चांगलीच पाचर मारून ठेवली आहे हे मात्र नक्की!

पंतप्रधान मोदी हे अमेरिकेला गेले व प्रे. ट्रम्प यांना भेटून आले. त्यामुळे मोदी यांचे भक्त खूष आहेत. मोदी मायदेशी परतले तेव्हा विमानातून उतरताना त्यांच्या चेहर्‍यावर उत्साह नव्हता तर एक प्रकारची निराशा होती. नेहमीप्रमाणे अमेरिका जिंकून आलो व प्रे. ट्रम्पला खिशात घेऊन आलो हा फाजील आत्मविश्वास त्यांच्या चेहर्‍यावर या वेळी अजिबात दिसत नव्हता. अमेरिका भेटीत मोदींना व्यक्तिश: आणि भारताला काहीच मिळाले नाही. उलट अपमानाची माती खाऊन पंतप्रधान परतले. ट्रम्प प्रशासनाने अवैध भारतीयांना बेड्या घालून साखळदंडाने जखडून भारतात पाठवले. यावर मोदी अमेरिकेत जाऊन प्रे. ट्रम्प यांना जाब विचारतील असे वाटले होते, पण मोदी यांनी भारताच्या अपमानावर ‘व्हाईट हाऊस’मध्ये शब्दही उच्चारला नाही. मोदी भारतात परतताच अमेरिकेने भारतीयांनी भरलेले दुसरे लष्करी विमान पाठवले. त्या 116 भारतीयांनाही साखळदंडाने बांधून ठेवले. जे शीख होते त्यांची पगडी जबरदस्तीने उतरविण्यात आली. हे सर्व काँग्रेसच्या राजवटीत घडले असते तर भाजपने देशभर आंदोलन करून पंतप्रधानांचा राजीनामाच मागितला असता, संसद बंद पाडली असती, पण भाजपचे पंतप्रधान मोदी ‘व्हाईट हाऊस’मधून अपमानाचे कडू घोट पचवून आले. त्यावर कोणाचाही राष्ट्रवाद जागा झाला नाही. अफगाणिस्तानच्या भूमीवर अमेरिकेची लष्करी विमाने कालपर्यंत उतरत होती. आता भारताच्या भूमीवरही ती बेड्या घातलेल्या भारतीयांना घेऊन उतरत आहेत. कोठे गेला तुमचा स्वाभिमान आणि

भारताचे सार्वभौमत्व

वगैरे. रशिया व युक्रेनमधले युद्ध मोदी थांबवू शकले असे त्यांच्या भक्तांचे म्हणणे आहे, पण अमेरिकेतील भारतीयांच्या हातापायांतील बेड्या ते तोडू शकले नाहीत. अमेरिकेची लष्करी विमाने यापुढेही भारताच्या भूमीवर उतरतील व बेड्या घातलेल्या भारतीयांना सोडून निघून जातील. अमेरिकेच्या लष्करी विमानाने उतरण्यासाठी अमृतसर विमानतळाचीच निवड का करावी? मुंबई, चंदिगड, अहमदाबाद, दिल्ली अशी अनेक विमानतळे आहेत. अमेरिकेतील अवैध भारतीयांत गुजरातचे लोकही मोठ्या प्रमाणावर आहेत. मग गुजराती प्रवाशांना घेऊन अमेरिकेचे एखादे लष्करी विमान अहमदाबाद विमानतळावरदेखील उतरणार आहे काय? मोदी व ट्रम्प यांच्या भेटीत भारताच्या अपमानाचा विषय निघालाच नाही. मोदी यांनी त्याबाबत मध्यस्थी करायला हवी होती, पण परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणतात त्याप्रमाणे ‘‘काय करणार? ते अमेरिकी कायद्याप्रमाणे कारवाई करत आहेत.’’ ठीक आहे हो, पण हा भारत एक सार्वभौम देश आहे. भारताच्या भूमीवरही अमेरिकेचा कायदा चालतो काय? निदान भारताच्या हद्दीत प्रवेश केल्यावर भारतीयांच्या हातापायांतील बेड्या काढा, नाहीतर आमच्या जमिनीवर तुमच्या लष्करी विमानांना उतरण्याची परवानगी देणार नाही, असे अमेरिकेला ठणकावून सांगण्याची हिंमत मोदी सरकारमध्ये दिसत नाही. येथे राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या नावाने डरकाळ्या फोडायच्या व प्रे. ट्रम्प हिंदूंना बेड्या घालून भारतात पाठवतात त्यावर ‘ब्र’ काढायचा नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी अमेरिकेत जाऊन काय मिळवले? हा प्रश्नच आहे. भारतात एक कमजोर आणि

बोटचेपे सरकार

विराजमान आहे. रशियाचे पुतीन व अमेरिकेचे प्रे. ट्रम्प यांनी भारताचे पाणी जोखले आहे. पंतप्रधान मोदी यांना अमेरिकेच्या पत्रकार परिषदेत उद्योगपती गौतम अदानींबाबत प्रश्न विचारला तेव्हा अशा व्यक्तिगत प्रश्नांवर अमेरिकेत चर्चा करणे योग्य नसल्याचे मार्गदर्शन मोदींनी केले. अदानींचा भ्रष्टाचार हा मोदींचा व्यक्तिगत प्रश्न होऊ शकतो, पण भारतीयांच्या हातापायांत बेड्या घालून फरफटत आणले जाते हा भारताच्या पंतप्रधानांचा व्यक्तिगत काय, पण राष्ट्रीय विषयही होत नाही. भाजप व त्यांच्या सरकारची राष्ट्रभक्ती हे एक ढोंग आहे असे आम्ही म्हणतो ते यासाठीच. बांगलादेशात हिंसाचार व अराजक माजले आहे व बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना मोदी राज्यात आश्रय मिळाला आहे. प्रे. ट्रम्प यांनी बांगलादेशात शांतता वगैरे निर्माण करण्याची जबाबदारी पंतप्रधान मोदींवर टाकली हा एक आंतरराष्ट्रीय विनोदच म्हणावा लागेल. ज्या भारतात जातीय, धार्मिक हिंसाचाराला राजकीय उत्तेजन दिले जाते व त्यातील अपराध्यांचा मोदी सरकारकडून सन्मान केला जातो ते दुसर्‍या देशातील जातीय हिंसा कशी थांबविणार? प्रे. ट्रम्प यांनी इतका निर्घृण विनोद करायला नको होता, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अलीकडे भारताचे हसे होऊ लागले आहे. पंतप्रधान मोदी यांना त्यांचे भक्त विश्वगुरू मानतात. प्रे. ट्रम्प यांनी भारतीयांवर उपकार करणारे एक काम मात्र केले ते म्हणजे ‘ईव्हीएम’बाबत पंतप्रधानांचे कान टोचले. लोकशाही टिकवायची असेल, लोकशाहीची प्रतिष्ठा कायम ठेवायची असेल तर मतपत्रिका म्हणजे बॅलट पेपरवरच निवडणुका घ्याव्या लागतील. मोदी आता काय करणार? प्रे. ट्रम्पने चांगलीच पाचर मारून ठेवली आहे हे मात्र नक्की!