सामना अग्रलेख- मोरारजी मोदी!

मोदी यांनी दहा वर्षांत महाराष्ट्राची आर्थिक ताकद मोडून काढली व रोजगार नष्ट केला. नाणार रिफायनरी, वाढवणसारखे विषारी प्रकल्प आणून मोदी महाराष्ट्रात रोजगार देण्याच्या वल्गना करीत असतील तर ते महाराष्ट्राच्या जनतेला मृत्यूच्या खाईत ढकलत आहेत. मोरारजी देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात मराठी माणसांना थेट गोळय़ा घातल्या. मोदी विषात साखर पेरून महाराष्ट्राला मारीत आहेत. यांना मोरारजी मोदी असेच म्हणावे लागेल!

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने भाजप व त्यांच्या मित्रपक्षांच्या कंबरडय़ात लाथ घातली. त्यामुळे नरेंद्र मोदी हे लोकसभेतील बहुमत गमावून बसले. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या आधी मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन मिंधेगिरी करायला सुरुवात केली आहे. उद्योगपती अंबानी यांच्या घरच्या लग्नास उपस्थित राहण्यासाठी मोदी मुंबईत आले व त्यानिमित्त त्यांनी काही भूमिपूजने, उद्घाटने केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. 29 हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन, शुभारंभ असे उत्सव त्यांनी साजरे केले. गेल्या दोनेक दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले. मुंबई महापालिकेत सध्या प्रशासनाची राजवट आहे. लोकप्रतिनिधींचे राज्य मोदींनी संपवले. परिणामी नालेसफाईचा बोजवारा उडाला. नालेसफाईच्या नावाखाली पैशांची उधळपट्टीच झाली. मुंबईत भ्रष्टाचाराचे गटार फुटले व त्या गटारात पाय सोडून पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली की, आपण महाराष्ट्राला शक्तिशाली व मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवणार आहोत. मोदी यांना कोणीतरी सांगायला हवे की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहेच व दिल्लीत मोदी-शहांचे राज्य आले नसते तर मुंबई जगाचीही आर्थिक राजधानी नक्कीच झाली असती. गेल्या दहा वर्षांत गुजरातच्या हितासाठी मुंबईला ज्या पद्धतीने ओरबाडले गेले किंवा लचके तोडले, त्यामुळे मुंबई घायाळ झाली आहे. मुंबई विव्हळत पडली आहे. मोदी हे राजकीय थापेबाजी करण्यात पटाईत आहेत. ते इतरांपेक्षा वेगळय़ा पद्धतीने म्हणजे नॉन-बायोलॉजिकल पद्धतीने जन्मास आल्याने सत्य-असत्याशी त्यांचा मेळ बसत नसावा. अलीकडे त्यांचा विसराळू विनू झाला आहे किंवा स्पष्टच सांगायचे तर रेटून

खोटे बोलणे हा त्यांचा छंद

बनला आहे. मोदी साहेबांनी असा दावा केला आहे की, महाराष्ट्राला जगातील मोठे आर्थिक शक्तिस्थान आणि जगातील फिनटेक राजधानी बनवणे हे त्यांचे ध्येय आहे. सत्य असे आहे की, मुंबई ही मागील शे-दीडशे वर्षांपासून भारताची आर्थिक राजधानी असूनही मोदींनी मुंबईत IFSC म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापन करण्यास विरोध केला. मात्र अशा धर्तीचे एक आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हे गुजरातमधील ‘गिफ्ट’ सिटीत स्थापन करण्यात आले. सन 2006 मध्ये मनमोहन सिंग यांनी मुंबईत हे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न केले होते आणि त्यासाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जमीनही आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासाठी राखीव ठेवली होती. या वित्तीय सेवा केंद्रामुळे मुंबईला दोन लाख रोजगार मिळणार होते, पण मोदी यांनी काय करावे? वित्तीय सेवा केंद्रासाठी राखीव असलेली जमीन बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या घशात घातली. मोदी यांनी हे करू नये असे त्यांना समजावण्याचा प्रयत्न झाला, पण मोदी यांनी मुंबईतील वित्तीय सेवा केंद्राचा प्रकल्प मोडून गुजरातला नेला व जमीन बुलेट ट्रेनला दिली. मोदी आता मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवण्याची भाषा करतात, हे पाखंड आहे. गेल्या दहा वर्षांत मोदी यांनी महाराष्ट्रासाठी विशेष काही केले नाही. त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्र स्वाभिमानी शिवसेना फोडली. राज्याचे ज्येष्ठ बुलंद नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून महाराष्ट्रात एक घटनाबाह्य दुबळे व गुजरातची गुलामी करणारे मिंधे सरकार निर्माण केले. मोदी यांनी महाराष्ट्रात कोणता उद्योग आणला असेल तर तो हा ‘मिंधे’ उद्योग. म्हणजे मोदी-शहांनी मुंबई आणि महाराष्ट्र लुटायचा व मिंध्यांनी ‘वाहव्वा।़ वाहव्वा’ म्हणून टाळय़ा वाजवायच्या. मोदींनी महाराष्ट्राचा स्वाभिमान, शौर्य आणि सचोटीस

मूठमाती देणारी टोळी

निर्माण केली व त्यांच्या हाती मराठी मुलखाची सत्ता दिली. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील अनेक प्रमुख उद्योग प्रकल्प आणि गुंतवणूक याबाबत मोदींनी सावत्रपणाची वागणूक दिली. मुंबईतला सगळय़ात मोठा क्रिकेट उद्योग गुजरातला नेला. हिरे उद्योग सुरतला स्थलांतरित केला. वेदांत फॉक्सकॉन, ड्रग्ज पार्कसारखे प्रकल्प मुंबईतून गुजरातला पळवले. वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय दिल्लीला हलविले. एअर इंडियाचे मुख्यालय मुंबईतून बाहेर नेले. रिझर्व्ह बँक, स्टॉक एक्सचेंजवरही त्यांची वाकडी नजर आहे. धारावी प्रकल्पाच्या निमित्ताने मुंबईतील मिठागरांच्या बहुमोल जमिनी आपल्या उद्योगपती मित्रास देऊन मोदी मुंबईवरचा राग काढत आहेत. मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली आरेचे जंगल साफ खतम केले. महाराष्ट्राची वाट लावली. महाराष्ट्र कंगाल केला. राज्यावर आज आठ लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर आहे. घेतलेले कर्ज फेडण्याची क्षमता महाराष्ट्राची राहिलेली नाही. तरीही मोदी एका कंगाल व महाराष्ट्र बुडवणाऱ्या मुख्यमंत्र्याला बगलेत घेऊन फिरत आहेत. महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. एक समाज दुसऱ्या समाजाविरुद्ध रक्ताचे घोट पिण्यासाठी उभा ठाकला आहे. कारण हे युद्ध रोजगारासाठी व जगण्यासाठी आहे. मोदी यांनी दहा वर्षांत महाराष्ट्राची आर्थिक ताकद मोडून काढली व रोजगार नष्ट केला. नाणार रिफायनरी, वाढवणसारखे विषारी प्रकल्प आणून मोदी महाराष्ट्रात रोजगार देण्याच्या वल्गना करीत असतील तर ते महाराष्ट्राच्या जनतेला मृत्यूच्या खाईत ढकलत आहेत. मोरारजी देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात मराठी माणसांना थेट गोळय़ा घातल्या. मोदी विषात साखर पेरून महाराष्ट्राला मारीत आहेत. यांना मोरारजी मोदी असेच म्हणावे लागेल!