सामना अग्रलेख – गंगा – यमुनेची विटंबना, योगी – मोदी, आचमन करा!

प्रयागराजच्या कुंभ सोहळ्यावर 10 हजार कोटी खर्च झाले. हा एवढा खर्च खरंच झाला असता तर भाविकांना मलमूत्रयुक्त पाण्यात डुबकी मारून पुण्य मिळवायची वेळ आली नसती. गंगा-यमुनेचे राजकारण करून हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवणारे हे सरकार आहे. पंतप्रधान मोदी यांचा हाच ‘सबका साथ सबका विकास’ असेल तर त्यांनी गंगा-यमुनेचीही विटंबनाच केली. महाकुंभाला 50 कोटी लोकांनी मलमूत्रयुक्त पाण्यात आंघोळ केली हे चित्र भयावह आहे. हिंदूंचा अपमान आहे. पुण्यप्राप्ती, मोक्षप्राप्तीचे ढोंग आहे. या ढोंगाला क्षमा नाही. त्रिवार नाही!

योगी आदित्यनाथ हे एक अद्भुत गृहस्थ आहेत. ते कडवट हिंदू आहेत, पण त्यांच्यात भगवान शंकराप्रमाणे विष म्हणजे हलाहल प्राशन करण्याचीही शक्ती आहे काय, ही शंका आहे. प्रयागराज येथे सध्या महाकुंभ सोहळा सुरू आहे. आतापर्यंत 50 कोटी भाविकांनी गंगेत स्नान करून मोक्षप्राप्ती केली किंवा पुण्य मिळवले. हे पुण्य जनतेस आमच्यामुळे मिळाले असे भारतीय जनता पक्षाचे सांगणे आहे. त्यामुळे कुंभात जास्तीत जास्त लोकांनी येऊन डुबकी मारावी असे निमंत्रण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराजांनी दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती धनखड, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री, उद्योगपती अंबानी, अदानी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यांच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी गंगेत डुबकी मारून पुण्य मिळवले. अनेकांनी पाण्याचे आचमन केले. आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला स्पष्ट केले की, ज्या गंगेत राष्ट्रपती-पंतप्रधान मोदी, अदानींनी स्नान केले, त्यातले पाणी ‘जल-मल संक्रमित’ आहे. म्हणजे गटारातला ‘मैला’ व इतर सर्व घाण, बॅक्टेरिया त्या पाण्यात आढळून आले. साधारण 50 कोटी लोकांनी या ‘जल-मल संक्रमित’ प्रवाहात डुबकी मारून पुण्य प्राप्त केले. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. प्रयागराज संगमावरचे पाणी स्नानास असुरक्षित आहे. त्यात फक्त मलमूत्रच नाही, तर ऑक्सिजनचीही कमतरता आहे. पाण्यात फेकल कॉलिफॉर्म बॅक्टेरियादेखील आढळले ही चिंतेची बाब आहे, पण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हा अहवाल स्वीकारण्यास मुख्यमंत्री योगी यांनी नकार दिला. विधानसभेत त्यांनी आदळआपट केली. उलट योगी यांनी जाहीर केले की, “हा अहवाल खोटा आहे. प्रयाग संगमावरील पाणी हे

स्नान करण्यायोग्य

तर आहेच, पण पिण्यासारखेदेखील आहे. हे पाणी खुशाल पिऊ शकता.’’ योगींनी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला खोटे पाडले. या ट्रिब्युनलला न्यायालयाचा दर्जा आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेला अहवाल बकवास ठरवून योगींनी गंगेतील पाण्यास स्वच्छतेचे प्रमाणपत्र दिले. पाण्यात मलमूत्र वगैरे नाही व ऑक्सिजनही पूर्ण आहे असे योगींनी जाहीर केले ते कशाच्या आधारावर? यावर अनेक पर्यावरणवादी लोकांनी आव्हान दिले, “योगीजी, तुमचे म्हणणे एकदम मान्य. चला, आता दूध का दूध पानी का पानी होऊ द्या. योगीजी, तुम्ही तुमच्या संपूर्ण कॅबिनेटसह प्रयागराज संगमावर यावे आणि जनतेसमोर प्रत्येकाने संगमातील लोटाभर पाण्याचे तीर्थ म्हणून आचमन करावे. जगाला दाखवून द्या, गंगा स्वच्छ आहे. आहे तयारी?’’ पण योगी व त्यांचे मंत्रिमंडळ हे आव्हान स्वीकारायला तयार नाहीत. महादेवाने समुद्र मंथनातून प्राप्त झालेले विष प्राशन केले, पण योगी गंगेतील लोटाभर पाणी प्यायला तयार नाहीत. गंगा शुद्धीकरणासाठी आतापर्यंत लाखो कोटी रुपये खर्च झाले. एक स्वतंत्र मंत्रालय त्यासाठी मोदींनी स्थापन केले. वाराणसीचे रूपांतर जपानच्या ‘क्योटो’ शहरासारखे करण्याचीही मोदींची योजना होती. त्यासाठी हिंदूंची हजारो मंदिरे बुलडोझर लावून पाडण्यात आली, पण साध्य काय झाले? गंगा गढूळ व वाराणसी तसेच गच्च, नियोजनशून्य राहिले. प्रयागराजच्या कुंभ सोहळ्यावर 10 हजार कोटी खर्च झाले. हा एवढा खर्च खरंच झाला असता तर भाविकांना मलमूत्रयुक्त पाण्यात डुबकी मारून पुण्य मिळवायची वेळ आली नसती. कुंभाला निघालेले अनेक भाविक रेल्वे स्थानकांवर चिरडून मेले, जे कसेबसे प्रयागराजला पोहोचले त्यातले शेकडो चेंगराचेंगरीत मेले. या सगळ्या मृतांना आता मोक्ष मिळाला असे

भंपक बाबालोक

म्हणत आहेत. श्रद्धाळूंना प्रयागतीर्थी पिण्यासाठी साधे पाणीही सरकार देऊ शकले नाही, ते नद्या काय स्वच्छ करणार? कुंभास आलेले पाच हजारांवर लोक आजही बेपत्ता आहेत. लहान मुले हरवली आहेत. त्यांच्या माता आक्रोश करीत आहेत. याला काय मोक्ष मिळाला म्हणायचे? या अनागोंदीस सरकार जबाबदार आहे. त्याची जबाबदारी सरकारने घ्यायलाच हवी. गंगा-यमुनेचे राजकारण करून हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवणारे हे सरकार आहे. कोविड काळात गंगेत हजारो प्रेते सोडली. साऱया जगाने पाहिले. आता कुंभकाळात गंगेत मलमूत्र तरंगत आहे व त्यात आमचे हिंदू भाविक डुबकी मारत आहेत, या स्थितीस काय म्हणावे? नद्यांचे शुद्धीकरण करणे ही त्या राज्यांचीच जबाबदारी आहे, पण राज्यांनी ही जबाबदारी झटकली आहे. दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्यात विष आहे, ते पिण्यायोग्य नाही, असे केजरीवाल सांगत राहिले तेव्हा केंद्र सरकार ते मानायला तयार नव्हते. हरयाणाचे मुख्यमंत्री दिल्लीत यमुनातीरी आले व त्यांनी त्या पाण्याचे आचमन करून ते जागीच थुंकल्याचे चित्रण समोर आले. केजरीवाल यांचा पराभव होताच दिल्लीच्या नायब राज्यपालांनी यमुनेवर जाऊन पाहणीचे नाटक केले व नदी-जलशुद्धीकरणाचे मशीन, यंत्रसामग्री आणून यमुना स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली. हे त्यांना आधीदेखील करता आले असते, पण भाजपला केजरीवाल सरकारला बदनाम करायचे होते. त्यामुळे दिल्लीकरांना अस्वच्छ पाणी पिऊ दिले. पंतप्रधान मोदी यांचा हाच ‘सबका साथ सबका विकास’ असेल तर त्यांनी गंगा-यमुनेचीही विटंबनाच केली. महाकुंभाला 50 कोटी लोकांनी मलमूत्रयुक्त पाण्यात आंघोळ केली हे चित्र भयावह आहे. हिंदूंचा अपमान आहे. पुण्यप्राप्ती, मोक्षप्राप्तीचे ढोंग आहे. या ढोंगाला क्षमा नाही. त्रिवार नाही!