
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र प्रतिगामी शक्तींच्या विळख्यात सापडला. ‘फुले’ चित्रपटास त्यातूनच विरोध सुरू आहे. महाराष्ट्रात ‘फुले-आंबेडकर विरुद्ध फडणवीस’ असा हा झगडा आहे! मुख्यमंत्री फडणवीस या सामाजिक विषयावर गप्प का बसले आहेत? त्यांनी मौन सोडावे. नाहीतर हा झगडा ‘फुले विरुद्ध फडणवीस’ असाच आहे यावर शिक्का बसेल!
महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ चित्रपटावरून महाराष्ट्रात अकारण वाद सुरू झाला आहे. ‘फुले’ चित्रपटातील अनेक घटना आणि प्रसंगांना कात्री लावा, नाहीतर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशा धमक्या ब्राह्मण संघटनांचे लोक देऊ लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या ब्राह्मण संघटनांना सहज गप्प करता येईल. एकतर ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, स्वतः ब्राह्मण आहेत व महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज त्यांच्या शब्दाबाहेर नाही. त्यामुळे ‘फुले’ चित्रपटाबाबत उचापती करणाऱ्यांना वेसण घालणे हे फडणवीस यांचेच काम आहे. फडणवीस वगैरे लोकांनी ‘कश्मीर फाईल्स’, ‘ताश्कंद फाईल्स’, अलीकडेच ‘छावा’ चित्रपटावर भाष्य केले व हे चित्रपट पाहावेत असे लोकांना आवाहन केले. ‘छावा’नंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद काही उथळ हिंदुत्ववाद्यांनी उकरून काढला. फडणवीस यांनी ते प्रकरण शांत केले. मग ते महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाचा ‘वाद’ थंड करण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत? ‘छावा’प्रमाणेच फडणवीस यांनी ‘फुले’ चित्रपटाचे खास ‘शो’ भाजप आमदार व कार्यकर्त्यांसाठी लावलेच पाहिजेत. महात्मा फुले यांचा मोठेपणा कशात आहे हे त्यांच्या जिवंतपणी जसे पुष्कळ लोकांना कळले नाही, तसे आजही अनेक लोकांच्या ध्यानात आले नाही. ज्या काळात फुले जन्माला आले त्या काळात त्यांच्याएवढा द्रष्टा क्रांतिकारक कोणीच नव्हता. म्हणून त्यांचे कार्य आणि विचार यांचे महत्त्व एकट्या न्यायमूर्ती रानडे यांच्याखेरीज कोणाला कळले नाही. जोतिबांच्या जीवनाविषयी विचार करताना सावित्रीबाई फुले यांचा विचार वेगळा किंवा दूर काढता येणार नाही. याचे कारण हेच की, जोतिबा स्वतः वेगळ्या क्रांतिकारक विचाराने पुढे निघाले होते. समाज परिवर्तनासाठी त्यांनी युद्ध पुकारले होते. या लढ्यात आणि जीवनात सावित्रीबाई त्यांच्या सहचारिणी झाल्या होत्या. जोतिबांचे वैशिष्ट्य हे की, ते सामाजिक कार्यात समाजातील लोकांना घेऊन एकटेच काम करीत राहिले नाहीत. त्यांनी सावित्रीबाईंसह स्वतःच्या घरापासून या कामांना सुरुवात केली. महाराष्ट्रात अनेक विचारवंत आणि समाजसुधारक होऊन गेले. मात्र
समाजाच्या विचारांचा ढाचाच
बदलायला निघणारे जोतिबा – सावित्रीबाई हे बहुधा पहिलेच जोडपे असावे. जोतिरावांना ‘युगपुरुष’ म्हणायचे तर सावित्रीबाईंना ‘युगस्त्री म्हणावे लागेल. स्त्री शिक्षणाचा पाया फुले दांपत्याने घातला. महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची शाळा सर्व प्रकारच्या विरोधाला तोंड देऊन स्थापन केली. त्यामुळे स्त्री शिक्षणाच्या चळवळीने जोर पकडला. फुले यांनी स्थापन केलेल्या या शाळेचे महत्त्व असे की, ती केवळ मागासलेल्या वर्गातील मुलींसाठी शाळा नव्हती. ब्राह्मण आणि बहुजन समाजातील मुलींनीही या शाळेत प्रवेश घेतला होता. सावित्रीबाई त्या शाळेत स्वतः शिकवत व त्या शाळेत जात तेव्हा त्यांच्या अंगावर चिखल, शेण, कचरा फेकून अडवले जात होते. सावित्रीबाईंच्या मैत्रिणींनी सल्ला दिला, “जोतिबा पुरुष आहेत, त्यांना ते काम करू दे. तू मात्र मुलींच्या व अस्पृश्यांच्या शाळेतील काम बंद करावे.’’ या सल्ल्यावर सावित्रीबाईंनी जे उत्तर दिले ते स्त्री शिक्षणातील चळवळीत काम करणाऱ्यांचे मनोबल वाढवणारे आहे. त्या म्हणाल्या, ‘‘जे लोक माझ्या अंगावर दगड, शेणगोळे, उष्टे-खरकटे, पाणी टाकतात ते अज्ञानी आहेत. त्यांना या कार्याचे महत्त्व कळत नाही. त्यांची या अज्ञानापासून मुक्ती व्हावी, त्यांना सत्य कळावे म्हणून तर मी विद्यादानाचे काम करते.’’ सावित्रीबाईंनी हा भयंकर छळ सहन केला व तो चित्रपटाच्या पडद्यावर दाखवला म्हणून छाती का पिटता? ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करणारे मुसलमान होते म्हणून ‘छावा’ पहाच असे श्री. फडणवीस व नरेंद्र मोदी यांनी सांगितले, पण सावित्रीबाईंचा निर्घृण छळ करणारे आपलेच सनातनी हिंदू होते म्हणून त्यांना पाठीशी घालायचे? हा न्याय नाही. फुले दांपत्याने काय काम केले? त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली. अस्पृश्यांसाठी शाळा काढणारे फुले हे भारतातील पहिले समाजसुधारक होते. ब्राह्मण समाजातील कित्येक बालविधवा अजाणतेपणाने गरोदर झाल्या तर त्या आत्महत्या तरी करीत नाहीतर गर्भपात करीत. त्या बालविधवांसाठी फुले दांपत्याने स्वतःच्या घरात प्रसूतिगृह आणि बालहत्या प्रतिबंधकगृह काढले. सर्व समाजाचा विरोध पत्करून फुले दांपत्याने ही सामाजिक सुधारणांची कामे केली. “सर्व मानव ही एका ईश्वराची लेकरे आहेत हे जोपर्यंत आपणास कळत नाही तोपर्यंत
ईश्वराचे खरे स्वरूप
आपणास कळणार नाही.’’ असे जोतिबांनी सांगितले. जोतिबा व सावित्रीबाई हे उत्तम वक्ते व लिहिणारे होते. त्यांनी कविता केल्या, पोवाडे लिहिले. शंभर वर्षांपूर्वी सावित्रीबाईंनी अंधश्रद्धांवर कडाडून टीका केली. ‘काव्यफुले’ या ग्रंथात त्या म्हणतात-
“धोंडे मुले देती, नवसा पावती
लग्न का करिती, नारी नर?’’
फुले हे ब्राह्मणविरोधी नव्हते व ब्राह्मण हेदेखील फुले यांच्या विरोधात नव्हते. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात बुधवार पेठेतील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. तात्यासाहेब भिडे हे ब्राह्मण गृहस्थ होते, पण फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याने ते प्रभावित झाले व आपला भिडे वाडा त्यांनी फुले यांच्या हवाली केला. फुले यांनी जातिभेद मानला नाही. हिंदू समाजातील जातिभेद आणि अस्पृश्यता नाहीशी व्हावी, सामाजिक समतेवर आणि न्यायावर समाजाची उभारणी व्हावी व सर्वांनी सत्याचे उपासक व्हावे यासाठी महात्मा फुले यांनी जिवाचे रान केले. महाराष्ट्र पुरोगामी झाला तो फुले यांच्यामुळेच. आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले यांच्यावर सर्वांगसुंदर मराठी चित्रपट काढला. त्यास राष्ट्रीय पुरस्काराचे रजत कमळ प्राप्त झाले. त्यानंतर ‘फुले’ चित्रपट आता हिंदी भाषेत येत आहे. त्यास विरोध करण्याचा करंटेपणा कोणी करू नये. ‘फुले’ चित्रपटास पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकर व त्यांच्या लोकांनी पुण्यातील फुले वाड्यावर आंदोलन केले. प्रकाश आंबेडकर म्हणतात, ‘‘समाजात अजूनही सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या कार्याला विरोध करणाऱ्या शक्ती आहेत. काही वर्ग आणि समूहाचा त्यांच्या क्रांतीला आणि कार्याला विरोध आहे.’’ प्रकाश आंबेडकर योग्य बोलले. दुर्दैव इतकेच की, फुले यांच्या विचारांना व कार्याला विरोध करणाऱ्या शक्तीशी प्रकाश आंबेडकरांची छुपी हातमिळवणी आहे आणि त्यामुळेच ‘फुले’ यांच्या विचारांना व कार्याला विरोध करणाऱ्यांना बळ मिळाले आहे. त्यामुळे समाजात गोंधळ आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र प्रतिगामी शक्तींच्या विळख्यात सापडला. ‘फुले’ चित्रपटास त्यातूनच विरोध सुरू आहे. महाराष्ट्रात ‘फुले-आंबेडकर विरुद्ध फडणवीस’ असा हा झगडा आहे! मुख्यमंत्री फडणवीस या सामाजिक विषयावर गप्प का बसले आहेत? त्यांनी मौन सोडावे. नाहीतर हा झगडा ‘फुले विरुद्ध फडणवीस’ असाच आहे यावर शिक्का बसेल!