अमेरिकन लोकांना लोकशाही, स्वातंत्र्य, मोकळा श्वास वगैरे गोष्टींचेही घेणेदेणे राहिले नाही तर त्यांना ‘ईएमआय’पासून मुक्ती हवी आहे. ट्रम्प यांनी त्यांना ती मुक्ती देण्याचे आश्वासन दिले. भारतात मोदी व त्यांचे लोकदेखील तेच करतात. मोफत रेशन, लाडकी बहीण योजना हा त्याचाच भाग. आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीनेही जनतेसाठी विकासाची पंचसूत्री जाहीर केली. अशा अनेक योजना म्हणजे महाविकास आघाडीच्या विजयाचे ‘ट्रम्प कार्ड’च बनले आहे. अमेरिकेत ट्रम्प व महाराष्ट्रातही ट्रम्प कार्ड! मोदी येतील व जातील. महाराष्ट्राचे हे ट्रम्प कार्ड तसेच राहील.
पंतप्रधान म्हणून मोदी ठिकठिकाणी प्रचार सभांना जातात व मोठमोठी आश्वासने देऊन पाच वर्षांसाठी गायब होतात. हे आता नित्याचेच झाले आहे. मोदी यांच्या महाराष्ट्रात सतरा-अठरा सभा होत आहेत. मोदी हवेत बोलतील व नंतर ट्रम्पला मिठी मारण्यासाठी अमेरिकेत निघून जातील. तिकडे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. त्याचा आनंद इकडे मोदी व त्यांच्या अंध भक्तांना झाला. ट्रम्प यांनी मिठय़ा मारल्याचे जुने फोटो बाहेर काढून ‘माय डिअर फ्रेंड डोनाल्ड’ वगैरे विशेषणे लावून मोदी यांचे संदेश प्रसिद्ध झाले. मोदी यांच्यामुळेच ट्रम्प विजयी झाले असा आव आणि ताव मारला जात आहे. समजा ट्रम्प हरले असते व कमला हॅरिस जिंकल्या असत्या तर त्याचेही श्रेय मोदी यांनीच घेतले असते. भाजपचे चिन्ह कमळ असल्याचा फायदा कमला यांना झाला व मोदी यांनी कमला यांच्या प्रचारासाठी खास पथक पाठवले होते वगैरे कहाण्या प्रसिद्ध करायलाही मोदीभक्तांनी मागेपुढे पाहिले नसते. मोदी हे असेच आहेत व त्यांचे भक्तदेखील त्यांना सुधारू देणार नाहीत आणि निवडणुका असल्या की, हे झटके जास्तच येत असतात. महाराष्ट्रात येऊन मोदी रोज नव्या घोषणा करतील व आश्वासने देतील. हे सर्व करण्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्राचे गुजरातीकरण होण्यापासून रोखले पाहिजे. महाराष्ट्राचे गुजरातीकरण झाले तर देशाचे रक्षण कोणी करायचे? महाराष्ट्र म्हणजे देशाची मर्दानगी, पौरुषत्व आहे. महाराष्ट्राचा गांडाभाई होऊन चालणार नाही. महाराष्ट्राचा सह्यादी म्हणजे
हिंदुस्थानचे चिलखत
आहे. मोदी व शहा यांनी महाराष्ट्राची वाट लावण्याचा अफझलखानी विडा उचलला आहे. तो प्रकार अराष्ट्रीय आहे. मोदी यांना महाराष्ट्राचे शौर्य व मोठेपणा मान्य होत नाही व त्यामुळे शिंदेंसारखे बनचुके लोक त्यांनी मुख्यमंत्रीपदी चिकटवून ठेवले. मोदी हे सरळ खोटे बोलतात, खोटी आश्वासने देतात व याबाबतीत ते डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे टाकतील. ट्रम्प यांनी सांगितले की, आपण राष्ट्राध्यक्ष होताच युद्ध संपवू, जगात शांतता आणू, पण ट्रम्प विजयी होताच इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांना अत्यानंद झाला आहे व ट्रम्प यांनीही नेत्यानाहू यांना शुभेच्छा दिल्या. गाझा पट्टीतील मानवी हत्याकांड, नरसंहार याबाबत ट्रम्प यांनी दुःख व्यक्त केले आहे असे कधीच दिसले नाही. युक्रेनवर हल्ला करून रशियाच्या पुतीन यांनी लाखो लोकांना मारले त्याबाबत ट्रम्प यांनी काहीच भूमिका व्यक्त केली नाही. हेच ट्रम्प आता “मी युद्ध संपवीन’’ असे म्हणत आहेत. ट्रम्प यांच्या विजयामागे एलन मस्क या उद्योगपतीची गुंतवणूक आहे व ट्रम्प विजयी होताच मस्क यांच्या कंपन्यांचे शेअर पंधरा टक्क्यांनी वधारले. भारतात मोदी व अदानी यांचे जे नाते आहे तेच मस्क व ट्रम्प यांचे आहे. मस्क हे विज्ञान व आधुनिकतेचे प्रणेते आहेत व भारतातील ‘ईव्हीएम’ हा एक घोटाळा आहे, असे त्यांनी जाहीर केले. ईव्हीएम हॅक होत आहे व हा लोकशाहीला धोका असल्याचा इशारा मस्क यांनी वारंवार दिला. मस्क हे अमेरिकेचे मतदार आहेत व अमेरिकेत
बॅलेट पेपरवर मतदान
होते. ट्रम्प हे ईव्हीएमच्या मदतीने जिंकले नाहीत. मस्क यांनी भारतातील ‘ईव्हीएम’ घोटाळय़ाचा विषय जागतिक स्तरावर मांडायला हवा. एकदा नव्हे, वारंवार मांडायला हवा. मोदी हे ट्रम्प यांना मिठय़ा मारतात हे खरे, पण चार वर्षांपूर्वी ट्रम्प यांचा पराभव झाला होता. ट्रम्प आता पुन्हा जिंकले. ट्रम्प यांनी मोदी यांच्याप्रमाणे खोटी आश्वासने दिली व आर्थिक विवंचनेत सापडलेल्या बहुसंख्य अमेरिकन नागरिकांनी स्वप्न विकणाऱया ट्रम्प यांना मतदान केले. अमेरिकन लोकांना लोकशाही, स्वातंत्र्य, मोकळा श्वास वगैरे गोष्टींचेही घेणेदेणे राहिले नाही तर त्यांना ‘ईएमआय’पासून मुक्ती हवी आहे. ट्रम्प यांनी त्यांना ती मुक्ती देण्याचे आश्वासन दिले. भारतात मोदी व त्यांचे लोकदेखील तेच करतात. मोफत रेशन, लाडकी बहीण योजना हा त्याचाच भाग. आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीनेही जनतेसाठी विकासाची पंचसूत्री जाहीर केली. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ‘पाच गॅरंटी’ जाहीर झाल्या. त्यात महिलांसाठी महालक्ष्मी योजना आहे. महिलांना दर महिन्याला 3000 रुपये मिळतील. पुन्हा महिला व मुलींसाठी सर्वत्र मोफत बस प्रवास. शेतकऱयांचे तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ होईल. 25 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधे, अशा अनेक योजना म्हणजे महाविकास आघाडीच्या विजयाचे ‘ट्रम्प कार्ड’च बनले आहे. अमेरिकेत ट्रम्प व महाराष्ट्रातही ट्रम्प कार्ड! मोदी येतील व जातील. महाराष्ट्राचे हे ट्रम्प कार्ड तसेच राहील.