सामना अग्रलेख – ‘ड्रोन’च्या नाकाखालून…

पाकिस्तानी एसएसजी कमांडो भारतात घुसखोरी करण्यास सीमेपलीकडे सज्ज आहेत. मोदी सरकार मात्र अमेरिकेसोबत 25 हजार कोटींचेहंटर किलरड्रोन विकत घेण्याचेडीलकरीत आहे. दहशतवादी अड्डे नष्ट करण्यासाठी हे डील होत असल्याचा सरकारचा दावा आहे, पण आज सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांचे काय? जम्मूकश्मीरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचे काय? भारतात केव्हाही घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या पाकिस्तानी एसएसजी कमांडोंचे काय? सध्या तुमच्या याड्रोनच्या नाकाखालून होत असलेली जम्मूकश्मीरमधील घुसखोरी तुम्ही कशी रोखणार आहात या प्रश्नाचे आधी उत्तर द्या!

जम्मू-कश्मीरविषयी बातमी नाही असा एकही दिवस अलीकडे उजाडत नाही. त्यात आणखी दोन बातम्यांची भर आता पडली आहे. पहिली बातमी आहे ती भारत अमेरिकेकडून ‘हंटर किलर’ हे ड्रोन विकत घेणार असल्याची आणि दुसरी बातमी आहे ती पाकिस्तानचे सुमारे 600 एसएसजी कमांडो भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत असल्याची. कश्मीरच्या सीमेवरून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी हा काही नवीन विषय नाही. 370 कलम हटविल्यामुळे कश्मीरमधील दहशतवाद नष्ट होईल, अशा वल्गना करणाऱ्यांच्याच राज्यात दहशतवादी आता जम्मूमध्येही घुसले आहेत. रोज हल्ले करून आमच्या जवानांचे आणि निरपराध लोकांचे प्राण घेत आहेत. केंद्र सरकार म्हणे आता या दहशतवादाचे कंबरडे मोडून काढणार असून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणार आहे. त्यासाठी अमेरिकेकडून अत्याधुनिक खतरनाक ड्रोन विकत घेणार आहे. ‘एमक्यू9बी प्रीडेटर’ हे ते ड्रोन असून अशा 31 ड्रोनच्या खरेदीसाठी भारताचा अमेरिकेसोबत 25 हजार कोटींचा करार झाला आहे. अमेरिकन लष्करात या ड्रोनला

‘हंटर किलर’

असे म्हटले जाते. ‘अल कायदा’चा प्रमुख अल जवाहिरी याला अमेरिकेने याच ड्रोनच्या सहाय्याने खतम केले होते. त्यामुळे हे ड्रोन आले की आपल्या सीमाभागातीलच नव्हे, तर पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील दहशतवादी अड्डेही उद्ध्वस्त होतील, असे सांगण्यात येत आहे. उद्याचे ठीक, प्रश्न आजच्या वाढत्या दहशतवादी हल्ल्यांचा आहे. ड्रोन खरेदी करण्याची बातमी जेवढी आशादायक आहे त्यापेक्षा 600 पाकिस्तानी कमांडो घुसखोरीसाठी पाकिस्तानात सज्ज असल्याचा इशारा चिंताजनक आहे. पुन्हा हे सर्वोच्च पाक लष्करी कमांडरच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचे तंत्र आणि स्वरूप बदलण्याचा पाकिस्तानचा इरादा मागील काही महिन्यांमध्ये समोर आलाच आहे. आता थेट आपल्या एसएसजी कमांडोंनाच ‘दहशतवादी’ म्हणून भारतात घुसवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. कालपर्यंत ‘छुपे दहशतवादी युद्ध’ करणाऱ्या पाकिस्तानने आता कमांडोंच्या माध्यमातून अप्रत्यक्ष युद्धच पुकारले आहे. भारतानेही त्यानुसारच ‘स्ट्रटेजी’ आखून

सडेतोड प्रत्युत्तर

द्यावे, असे इशारे अनेक संरक्षणतज्ञ आणि माजी भारतीय लष्करी अधिकारी देत आहेत. मात्र केंद्रातील सत्ताधारी ना ते गांभीर्याने घेत आहेत, ना त्यानुसार काही आखणी करीत आहेत, ना ते पाकिस्तानचे नाव घेत आहेत, ना त्या देशाला नेहमीचा तोंडदेखला दम भरत आहेत. दहशतवादी आता थेट जम्मूपर्यंत घुसून हल्ले करीत आहेत. पाकिस्तानी एसएसजी कमांडो भारतात घुसखोरी करण्यास सीमेपलीकडे सज्ज आहेत. मोदी सरकार मात्र अमेरिकेसोबत 25 हजार कोटींचे ‘हंटर किलर’ ड्रोन विकत घेण्याचे ‘डील’ करीत आहे. दहशतवादी अड्डे नष्ट करण्यासाठी हे डील होत असल्याचा सरकारचा दावा आहे, पण आज सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांचे काय? जम्मू-कश्मीरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचे काय? भारतात केव्हाही घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या पाकिस्तानी एसएसजी कमांडोंचे काय? सध्या तुमच्या या ‘ड्रोन’च्या नाकाखालून होत असलेली जम्मू-कश्मीरमधील घुसखोरी तुम्ही कशी रोखणार आहात या प्रश्नाचे आधी उत्तर द्या!