
महाराष्ट्रात 5 हजारांहून अधिक, राजस्थानात 30 हजार, छत्तीसगडमध्ये 2 हजार, मध्य प्रदेशात 228 व खुद्द देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 5 हजार पाकिस्तानी बिनबोभाटपणे राहत असतील तर देशाच्या सुरक्षेशी तो मोठाच खेळ आहे. मुळात पाकिस्तानसारख्या शत्रुराष्ट्रातील हजारो लोक बेकायदेशीरपणे हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात जाऊन बिऱ्हाडे थाटतातच कशी? हे एवढे आले कोठून? पुन्हा पहलगामच्या हल्ल्यानंतरच हिंदुस्थानात राहणाऱ्या या हजारो पाकिस्तानी नागरिकांची आठवण सरकारला कशी झाली? सरकारकडे याचे उत्तर आहे काय?
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार भांबावल्यासारखे वागत आहे. एरवी राजकारण, कारस्थाने करण्यात वेळ घालवायचा आणि असा हल्ला झाला की, झोपेतून जागे व्हायचे. तसेच आताही झाले आहे. देशातील पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानात हाकला या मोहिमेचा शुभारंभ केंद्र सरकारने केला खरा; पण जेथे वर्षानुवर्षे भाजपची सत्ता आहे तेथेच सर्वाधिक पाकिस्तानी सापडत आहेत. म्हणजे इतकी वर्षे या लोकांनी झोपाच काढल्या हे नक्की. पुन्हा जेथे भाजपची सत्ता नाही किंवा आहे तेथे मुसलमान विद्यार्थी, फळवाले, भाजीवाले, कपडेवाले, लहान-मोठे व्यावसायिक यांना पाकिस्तानी नागरिक ठरवून त्यांना त्रास देण्याच्या मोहिमा सुरू केल्या जात आहेत. त्यामुळे मूळ पाकिस्तानी नागरिक, घुसखोर राहिले बाजूला; वेगळेच उद्योग सुरू झाले आहेत. देशात पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक वाढले ते भाजपच्या कार्यकाळात. मात्र पहलगामचा हल्ला झाल्यावर देशातील पाकिस्तानी नागरिकांची पाकिस्तानात रवानगी करण्याची मोहीम केंद्र सरकारने सुरू केली आहे. खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच तशा सूचना देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर प्रत्येक राज्यातून पाकिस्तान्यांची पाठवणी सुरू झाली. रविवारी सायंकाळी ही मुदत संपली तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत असंख्य पाकिस्तानी नागरिकांना अट्टारी सीमेवरून त्यांच्या देशात हाकलण्यात आले. मात्र ही मुदत संपल्यानंतरही हजारो पाकिस्तानी नागरिक देशात तळ ठोकून असल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्यात आले ते योग्यच आहे, पण त्यासाठी पहलगामसारख्या हल्ल्याची वाट पाहण्याची काय गरज होती, हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे व तो चुकीचा नाही. मुळात हजारोंच्या संख्येने पाकडय़ांनी हिंदुस्थानात येऊन का राहावे आणि आपल्या देशानेही त्यांना येऊ का द्यावे? आपण
पाकिस्तानला शत्रुराष्ट्र
मानतो ना, मग देशाच्या प्रत्येक राज्यात इतक्या प्रचंड संख्येने पाकिस्तानी नागरिक वैध, अवैध मार्गाने का येउै दिले गेले? बरं, यापैकी किती पाकिस्तानी नागरिकांकडे व्हिसा व अन्य वैध कागदपत्रे आहेत व किती लोक बेकायदेशीरपणे घुसखोरी करून हिंदुस्थानात राहत आहेत, हादेखील संशोधनाचा विषय आहे. हिंदुस्थानात वास्तव्यास असलेल्या हजारो पाकिस्तान्यांमध्ये सिंध प्रांतातून आलेले हिंदू किती व मुस्लिम किती, याचीही बारकाईने पडताळणी व्हायला हवी. 27 एप्रिलची मुदत संपेपर्यंत यापैकी किती पाकिस्तानी परतले व किती अजूनही देशातच ठाण मांडून आहेत, हे कळायला मार्ग नाही. एकट्या महाराष्ट्राचेच उदाहरण घेतले तर आपल्या राज्यात तब्बल 5023 पाकिस्तानी राहत होते. यापैकी अनेकांना आता पाकिस्तानात हाकलण्यात आले असले तरी महाराष्ट्रात वास्तव्यास असलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या 107 पाकिस्तानी नागरिकांचा पोलिसांनी खूप शोध घेतला, पण ते सापडले नाहीत, असे खुद्द राज्याच्या गृह राज्यमंत्र्यांनीच सांगितले असल्याने त्यावर विश्वास ठेवावा लागेल. मात्र त्यांच्या या बोलण्याला गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनीच छेद दिला आहे. एकही पाकिस्तानी गायब नाही, असा दावा त्यांनी केला आहे. म्हणजे गृह राज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिंधे 107 पाकिस्तानी गायब म्हणत आहेत, तर मुख्यमंत्री फडणवीस तसे काहीही नाही, असे ठणकावत आहेत. इतक्या संवेदनशील गोष्टीत सरकारमध्येच एकवाक्यता नसेल तर कसे चालेल? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री अशी परस्परविरोधी माहिती देत असतील तर जनतेने विश्वास तरी कुणावर ठेवायचा? सीमेवर सुरक्षा दलांचा खडा पहारा असताना या घुसखोरांनी बिळे कशी केली? देशाचे पंतप्रधान स्वतःला जनतेचा चौकीदार म्हणवून घेतात; पण
सीमेला भगदाडे पाडून
पाकिस्तानी नागरिक, घुसखोर, अतिरेकी सीमा ओलांडून हिंदुस्थानात येत असतील, देशाच्या कुठल्याही राज्यात जाऊन आरामात राहत असतील व पहलगामसारखे हल्ले आणि हत्याकांड घडवून गायब होत असतील तर सरकार नावाची यंत्रणा, देशाचे गृहखाते व गुप्तचर यंत्रणा नेमके काय करीत आहेत? महाराष्ट्रातील 48 शहरांत 5023 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास होते. त्यापैकी निम्म्याहून अधिक म्हणजे 2 हजार 458 पाकिस्तानी एकटय़ा नागपूर शहरातच असल्याचे समोर आले. नागपूर हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे व रा. स्व. संघाचे मुख्यालय असलेले शहर, पण नागपुरातच अडीच हजार पाकिस्तानी राहत असतील व त्यापैकी सुमारे 30 पाकिस्तान्यांची कुठलीच माहिती पोलीस प्रशासनाकडे नसेल तर देशाबरोबरच महाराष्ट्राचीही सुरक्षा रामभरोसेच आहे, असे म्हणावे लागेल. उपमुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात एक हजारहून अधिक पाकिस्तानी नागरिक राहत होते व त्यापैकी 33 गायब आहेत. राज्याच्या एकूण 48 शहरांत पाकिस्तानी नागरिकांनी हातपाय पसरले आहेत व व्हिसाची मुदत संपल्यानंतर किंवा वैध कागदपत्रांशिवाय ते इथे राहत आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी हे धोकादायक नाही काय? महाराष्ट्रात 5 हजारांहून अधिक, राजस्थानात 30 हजार, छत्तीसगडमध्ये 2 हजार, मध्य प्रदेशात 228 व खुद्द देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 5 हजार पाकिस्तानी बिनबोभाटपणे राहत असतील तर देशाच्या सुरक्षेशी तो मोठाच खेळ आहे. मुळात पाकिस्तानसारख्या शत्रुराष्ट्रातील हजारो लोक बेकायदेशीरपणे हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात जाऊन बिऱ्हाडे थाटतातच कशी? हे एवढे आले कोठून? पुन्हा पहलगामच्या हल्ल्यानंतरच हिंदुस्थानात राहणाऱ्या या हजारो पाकिस्तानी नागरिकांची आठवण सरकारला कशी झाली? सरकारकडे याचे उत्तर आहे काय?