नितीश कुमार यांनी पलटी का मारली हा संशोधनाचा विषय आहे. देशावरच पलटूरामांचे राज्य आले आहे. अयोध्येत राम व देशात पलटूराम! अजित पवारांचा 70 हजार कोटींचा घोटाळा स्वतः पंतप्रधान मोदी बाहेर काढतात व नंतर अवघ्या दोन दिवसांत त्याच अजित पवारांना भाजपसोबत घेऊन उपमुख्यमंत्री करतात. नितीश कुमारांचेही तेच. पंतप्रधानच पलटूराम बनले तेथे अयोध्येचा राम तरी काय करणार? पलटूरामांपुढे अयोध्येचा रामही हतबलच झाला आहे.
देशात ‘जय श्रीराम’चे नारे दिले जात आहेत. मात्र बिहारात ‘जय श्री ‘पलटूराम’चा नारा ऐकू येत आहे. हे पलटूराम ‘इंडिया’ आघाडीचे कर्तेधर्ते असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत. मात्र नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पलटी मारली असून त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा संसार थाटला आहे. लालू यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर काडीमोड घेऊन या वयात पुन्हा भाजपशी संसार थाटणे हा नितीश कुमारांच्या राजकीय जीवनाचा शेवट आहे. नीतिमत्ता व सिद्धांताच्या राजकारणाची बोली लावणाऱ्यांनीच नीतिमत्तेची ऐशी की तैशी केल्यावर भारतीय जनता पक्षाला तरी का दोष द्यायचा? भाजपवाले म्हणजे बाजारातले सध्याचे सगळ्यात मोठे खरेदीदार आहेत. विकणारे माल विकायला तयार असल्यावर खरेदीदार व ठेकेदार बोली लावणारच. महाराष्ट्रातला माल प्रत्येकी पन्नास-पन्नास खोक्यांना विकला गेला. बिहारच्या मालाचा काय भाव लावलाय ते देशाच्या जनतेला समजायला हवे. नितीश कुमार यांच्याकडे देशाच्या राजकारणातली एक केस स्टडी म्हणून पाहायला हवे. एक माणूस राजकारणात अल्प काळात किती वेळा रंग बदलू शकतो, हा संशोधनाचा विषय आहे. हरयाणात आयाराम-गयाराम तसे बिहारात हे ‘पलटूराम’ असेच म्हणावे लागेल. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून आणि हुकूमशाहीविरोधी आंदोलनातून सुरू झालेला नितीश कुमारांचा प्रवास मोदी-शहांच्या हुकूमशाहीपुढे लोटांगण घातल्याने मसणातच संपला आहे व त्याबद्दल त्यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीस श्रद्धांजली अर्पण करून जनतेने पुढे जायला हवे. नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा सत्ता स्थापन करण्याचे ठरवले आहे. हे त्यांचे वय तसे निवृत्तीचे व वानप्रस्थ आश्रमात जाण्याचे, पण तिकडे अयोध्येत श्रीरामांचे आगमन होताच नितीशबाबू मात्र भाजपच्या वनवासी आश्रमात निघाले आहेत. काही महिन्यांपूर्वी नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली, कारण भाजप हा अत्यंत धोकादायक व घातकी पक्ष होता. भाजप त्यांच्याबरोबर सत्तेत राहून कुमारांचा ‘जदयु’ पक्ष फोडत होता. त्यामुळे संतापाने लालबुंद होऊन कुमारांनी
भाजपची संगत सोडली
व पुन्हा कधीच भाजपबरोबर जाणार नाही, असे सांगत जुने साथी लालू यादव यांच्यासोबत सरकार बनवले. त्यांनी असेही जाहीर केले की, यापुढे मी मुख्यमंत्री वगैरे होणार नाही. तेजस्वी यादव हेच राज्याचे नेतृत्व करतील. पण कुमार हे रोज नवे बाशिंग बांधून बोहल्यावर चढत आहेत. कुमार हे ‘इंडिया’ आघाडीच्या स्थापनेनंतर राष्ट्रीय नेतृत्व करतील असे वाटत होते. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपच्या हुकूमशाहीविरोधात लढायला हवे. यासाठी सगळ्य़ांना एकत्र करण्यासाठी कुमार यांनी पुढाकार घेतला व सर्व देशभक्त भाजप विरोधकांची पहिली बैठक पाटण्यात बोलावली व यशस्वी केली. त्या बैठकीतले कुमारांचे भाषण हे एक राष्ट्रीय चिंतन ठरावे, असे होते. ‘‘देश संकटात आहे. संविधान धोक्यात आहे. पेंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असून लोकशाही रक्षणासाठी आपण सगळय़ांनी मतभेद दूर करून एकत्र येणे यातच राष्ट्रहित आहे.’’ असे दिव्य विचार कुमार यांनी पाटण्यात मांडले होते. पुढे बंगळुरू, मुंबई, दिल्लीच्या बैठकांना ते हजर राहिले. भाजप व संघ परिवाराशी अखेरपर्यंत लढण्याचा त्यांचा निर्धार होता, पण त्या निर्धाराचे धोतर आता सुटले असून नितीश कुमार यांनी पलटी मारली आहे. अर्थात या सगळय़ा प्रकरणात पुरते वस्त्रहरण झाले आहे ते भारतीय जनता पक्षाचे. नितीश कुमार यांनी लालू यादवांबरोबर सरकार बनविण्याचे जाहीर करताच गृहमंत्री अमित शहा यांनी पाटण्यात येऊन बिहारच्या जनतेला नितीश कुमार यांना पुन्हा सोबत न घेण्याचे वचन दिले होते. ‘‘यापुढे नितीश कुमार हात जोडून भाजपच्या दारात आले तरी त्यांच्यासाठी दरवाजे बंद आहेत. नितीश कुमार यांना पुन्हा एनडीए आघाडीत कधीच घेणार नाही,’’ असे अमित शहा यांनीच जाहीर केले होते व कुमार यांनीही भाजपच्या दारात पुन्हा कधीच जाणार नाही अशा आणाभाका घेतल्या होत्या, पण दोघांनाही दिल्या-घेतल्या वचनांचे विस्मरण झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या काळात राजकारणाची पातळी कमालीची घसरली आहे. लोकशाही व नैतिकता या शब्दांचे
पुरते हवन
झाले. देश संकटात असताना नितीश कुमारांसारख्या भरवशाच्या लोकांनी बेइमानी केली याची नोंद इतिहासात कायमची राहील. भारतीय जनता पक्षाला 2024 च्या लोकसभा निवडणुकांची भीती वाटते. प्रभू श्रीराम व ‘ईव्हीएम’देखील पराभवापासून वाचवणार नाही याची त्यांना खात्री पटली आहे. ‘अब की बार चारसौ पार’ हा मोदी-शहांचा नारा म्हणजे उसने अवसान आहे. आपल्या कामांवर व नेतृत्व क्षमतेवर इतका विश्वास असता तर फोडाफोडीचे हे असे खेळ करून सत्तेसाठी हपापलेपण दाखविण्याची त्यांना काहीच गरज नव्हती. मात्र सरळ मार्गाने सत्ता मिळत नसल्याने त्यांनी महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेशात पह्डापह्डी केली, पण हे सर्व करूनही 2024 मध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा बहुमताने सत्तेवर येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. मोदी-शहांची राजकीय नौका बुडत आहे हे नक्की. बिहारात नितीश कुमार, भाजप, चिराग पासवान वगैरे आता एकत्र येऊन निवडणुका लढवतील, पण भाजपच्या हुकूमशाहीशी एकाकी लढणारे तेजस्वी यादव, काँग्रेस व इतर लहान पक्षांची आघाडी बिहारातील पलटूरामांचे राजकारण यशस्वी होऊ देणार नाही. तेजस्वी यादव यांना आता अधिक मोकळेपणाने काम करता येईल. बिहारातूनच नव्हे तर देशाच्या क्षितिजावरून नितीश कुमारांचे काळवंडलेले पर्व आता कायमचे नष्ट होत आहे. त्याचे श्रेय भारतीय जनता पक्षाला द्यावे लागेल. ‘इंडिया’ आघाडीत नितीश कुमार यांचे स्थान मोठे होते. त्यांनीच ‘इंडिया’ आघाडीची सुरुवात केली. मोदी-शहांच्या पकडीतून गुदमरलेला देश वाचवायला हवा, असे नितीश कुमारांचे म्हणणे होते. ते नितीश कुमार शारीरिक व मानसिकदृष्ट्या विकलांग झाल्याचा फायदा आज भाजपने घेतला. ईडी, सीबीआयच्या भयाने या काळात भल्याभल्यांनी ‘पलटी’ मारली. नितीश कुमार यांनी पलटी का मारली हा संशोधनाचा विषय आहे. देशावरच पलटूरामांचे राज्य आले आहे. अयोध्येत राम व देशात पलटूराम! अजित पवारांचा 70 हजार कोटींचा घोटाळा स्वतः पंतप्रधान मोदी बाहेर काढतात व नंतर अवघ्या दोन दिवसांत त्याच अजित पवारांना भाजपसोबत घेऊन उपमुख्यमंत्री करतात. नितीश कुमारांचेही तेच. पंतप्रधानच पलटूराम बनले तेथे अयोध्येचा राम तरी काय करणार? पलटूरामांपुढे अयोध्येचा रामही हतबलच झाला आहे.