पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाच्या आमदारांना मार्गदर्शन कोठे केले? तर कुलाब्यातील ‘आयएनएस आंग्रे सभागृहा’त. म्हणजे संरक्षण दलाच्या वास्तूत. तेथे त्यांनी आमदारांबरोबर भोजनदेखील केले. साधा-सरळ प्रश्न इतकाच की, नौदलाच्या म्हणजे संरक्षण दलाच्या जागेत राजकीय मेळावे घेण्यास मान्यता आहे काय? जर ती असेल तर इतर राजकीय पक्षांनी त्यांचे मेळावे, बैठका, शिबिरे घेण्याची मुभा आयएनएस आंग्रे येथे आहे काय? या सभागृहात जे चहापान, भोजन वगैरे राजकीय कारणांसाठी झाले त्याचे बिल कोणी भरले? मोदीसाहेबांनी प्रतिमा व नैतिकतेवर भाषण केले म्हणून हे नैतिक प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले! मोदींनी त्यांच्या लोकांना ब्रह्मज्ञान दिले, पण सत्य काय आहे? दिव्याखाली अंधारच आहे!
पंतप्रधान मोदी हे एक अजब रसायन आहे. त्या रसायनास कधी बुडबुडे फुटतात, तर कधी ते रसायन स्फोटक बनते. पंतप्रधान मोदी बुधवारी मुंबईत होते. या दौऱ्यात त्यांनी ‘सुरत’ आणि ‘निलगिरी’ युद्धनौकांचे राष्ट्रार्पण केले. आम्हास युद्धनौकेस दिलेले ‘सुरत’ हे नाव बेहद्द पसंत पडले. महाराष्ट्रात ‘ठाकरे’ सरकार पाडण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुरत येथे पळवून नेले व तेथेच पैशांची वगैरे सौदेबाजी झाली. राजकारणात ती घडामोड ‘सुरत सौदा’ म्हणून बदनाम आहे. या घडामोडी सदैव स्मरणात राहाव्यात म्हणून नौकेला ‘सुरत’ असे नाव दिले असावे. मोदी यांनी त्यानंतर भाजप, शिंदे सेना व अजित पवारांच्या गटाच्या आमदारांसमोर मार्गदर्शनपर भाषण केले. मोदी यांनी महायुतीच्या आमदारांना उत्तम असे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, ‘‘बाबांनो, आपली आणि पक्षाची प्रतिमा जपा. उगाच बडेजाव दाखवू नका. एकदम साधेपणाने रहा. बदल्या आणि बढत्यांच्या फायली घेऊन मंत्रालयात फिरू नका.’’ पंतप्रधानांचे हे मार्गदर्शन म्हणजे नैतिकतेचे अजीर्ण झाल्यासारखेच आहे. पंतप्रधानांनी आमदारांना असाही सल्ला दिला की, ‘‘तब्येतीला जपा. सर्वांनी रोज योगासने, प्राणायाम आणि ध्यानसाधना करावी.’’ पंतप्रधानांचे हे मार्गदर्शन किती आमदार गांभीर्याने घेतात ते पाहायचे. पंतप्रधानांनी केलेले भाषण व मार्गदर्शन हे त्यांनाही लागू पडते. आधी केले, मग सांगितले, हा त्यामागचा खरा मूलमंत्र आहे. प्रतिमा जपा असे ते म्हणतात, पण भाजपच्या प्रतिमेच्या साफ चिंधड्या उडाल्या आहेत. प्रतिमा जपा म्हणजे भ्रष्टाचार, स्वैराचार करू नका. प्रत्यक्षात मोदी यांनी महाराष्ट्रात सर्व
भ्रष्टाचारी व लफडेबाज
लोकांची मोट बांधून विधानसभेत विजय मिळवला आहे. स्वतः मोदी यांनी ज्यांच्या प्रतिमांचे भंजन केले असे अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे लोक आज भाजपचे समर्थक आहेत. एकनाथ शिंदे यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून माया जमा केली व मोदी त्यांच्या पाठीवर थाप मारताना दिसतात. अशोक चव्हाणांच्या ‘आदर्श’ घोटाळय़ावर अमित शहा-मोदी प्रश्नचिन्ह उपस्थित करतात व त्याच चव्हाणांना मोदी भाजपात प्रवेश देतात. त्यामुळे प्रतिमा जपा म्हणजे काय? पंतप्रधान म्हणतात, साधे राहा. या साधेपणाची सुरुवात कोणापासून करायची. साधेपणाचे मंत्र देणारे व तितक्याच साधेपणाने राहणाऱ्या गांधीजींचा मोदी द्वेष करतात. देशात गरिबी आहे व लोकांना अंगभर वस्त्र नाहीत म्हणून बॅ. गांधी यांनी सर्व सुखे त्यागली आणि वस्त्रही त्यागून आयुष्यभर एक पंचा परिधान केला. भाजपात हा साधेपणा औषधालाही उरला काय? मोदी दहा लाखांचा सूट, पाच-दहा लाखांचा पेन, 20 हजार कोटींचे विमान वापरतात. कांती तुकतुकीत राहावी म्हणून महागडे मशरुम खात असल्याची माहिती समोर आली. मोदींच्या ताफ्यात विदेशी गाड्या आहेत. 350 कोटींचा पॅलेस पंतप्रधान मोदींसाठी दिल्लीत उभारला जात आहे. हे काय साधेपणाचे लक्षण मानायचे? भाजपचे लोक मिळेल त्या मार्गाने पैसा कमवतात. भाजपच्या खात्यावर 6 हजार कोटी रुपये जमा आहेत ते काय कार्यकर्त्यांनी मजुरी करून मिळवून दिले? दिल्लीत भाजपचे पंचतारांकित मुख्यालय उभे आहे व देशातील जिल्ह्या-जिल्ह्यात भाजपची ‘टकाटक’ कार्यालये उभी राहिली ती कोणाच्या पैशांवर? महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजप व त्यांच्या मित्र गटांनी पैशांचा धो धो पाऊस पाडला. त्यामुळे
देशाची प्रतिमाच
उद्ध्वस्त झाली. बडेजाव हेच मोदींच्या राजकारणाचे सूत्र आहे. मोदी जे बोलतात त्याच्या नेमके विपरीत वागतात. मोदी यांनी आणखी एक विनोद केला. ते म्हणाले, ‘‘पैसा नाही, तर चांगली प्रतिमा महत्त्वाची.’’ हा संदेश त्यांनी भाजप वर्तुळातील अदानी वगैरे उद्योगपतींसाठी दिला काय? बाकी मोदी काय व कोणासाठी म्हणाले यावर संशोधन होईलच. ज्यांनी मत दिले नाही त्यांना जिंका, म्हणजे विरोधकच राहणार नाहीत हा मोदींच्या मार्गदर्शनाचा मुख्य गाभा आहे. मोदींच्या मनातील अहंकार येथे उघडा झाला. विरोधक शिल्लक राहता कामा नयेत हे मोदींनी सांगून टाकले. जे विरोधक आहेत त्यांना भाजपात सामील करून घ्या किंवा पैशांच्या, ईडी, सीबीआयच्या बुलडोझरखाली चिरडून टाका. विरोधक राहताच कामा नयेत हा ‘पुतीन’ पॅटर्न लावाच, असे आपल्या पंतप्रधानांनी सांगूनच टाकले. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाच्या आमदारांना मार्गदर्शन कोठे केले? तर कुलाब्यातील ‘आयएनएस आंग्रे सभागृहा’त. म्हणजे संरक्षण दलाच्या वास्तूत. तेथे त्यांनी आमदारांबरोबर भोजनदेखील केले. साधा-सरळ प्रश्न इतकाच की, नौदलाच्या म्हणजे संरक्षण दलाच्या जागेत राजकीय मेळावे घेण्यास मान्यता आहे काय? जर ती असेल तर इतर राजकीय पक्षांनी त्यांचे मेळावे, बैठका, शिबिरे घेण्याची मुभा आयएनएस आंग्रे येथे आहे काय? या सभागृहात जे चहापान, भोजन वगैरे राजकीय कारणांसाठी झाले त्याचे बिल कोणी भरले? मोदीसाहेबांनी प्रतिमा व नैतिकतेवर भाषण केले म्हणून हे नैतिक प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले! मोदींनी त्यांच्या लोकांना ब्रह्मज्ञान दिले, पण सत्य काय आहे? दिव्याखाली अंधारच आहे!