
अमेरिकेचे प्रे. ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के आयात शुल्क लादले या विषयावरून लोकांचे लक्ष हटविण्यासाठी मोदी सरकारने वक्फ संपत्तीचे विधेयक आणले. प्रे. ट्रम्प यांनी लादलेल्या आयात शुल्काचा भारताच्या उद्योगावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महागाई, बेरोजगारीचा प्रश्न उफाळून येईल. त्यामुळे हे विधेयक आणून मोदी सरकारने त्यांचा आवडता हिंदू-मुसलमानांचा खेळ सुरू केला आहे. वक्फ संपत्तीचे विधेयक ही हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक आणि मतांसाठी सरळ मुस्लिमांचे लांगूलचालन आहे. भ्रष्टाचाराला कायद्याचा मुलामा देण्याचा हा धार्मिक खेळ आहे.
वक्फ सुधारणा विधेयक सरकारने मंजूर करून घेतले. लोकसभेत विधेयकाच्या बाजूने 288 आणि विरोधात 232 मते पडली. बहुमताचा आकडा 273 आहे. त्यामुळे फार मोठ्या फरकाने सरकारने विजय मिळवला असे नाही. सरकारने हर तऱहेचे प्रयत्न करूनही त्यांचा बहुमताचा आकडा 300 पार होत नाही. नितीश कुमार हे पूर्णपणे बधिर अवस्थेत पोहोचले आहेत व चंद्राबाबू यांना केंद्राकडून बऱ्यापैकी निधी मिळत असल्याने सरकार उभे आहे. 232 विरोधकांची एकजूट लोकसभेत दिसली ही बाब सरकारसाठी चिंताजनक आहे. वक्फ सुधारणा विधेयक हे मुसलमानांच्या हितासाठी आणल्याचा दावा गृहमंत्री अमित शहा यांनी केला. विरोधी पक्ष मुस्लिमांचे तुष्टीकरण करीत आहेत व त्यामुळे समाजात दुफळी माजेल असे ते म्हणाले. लोकसभेत अमित शहांचे भाषण ज्यांनी ऐकले त्यांनाच समजेल की, सध्या मुस्लिमांचे लांगूलचालन कोण करीत आहे? शहा यांचे संपूर्ण भाषण म्हणजे, ‘‘आम्हीच आता मुस्लिमांचे एकमेव मसिहा आहोत. काँगेस, मुस्लिम लीगची जागा आम्ही घेतली आहे,’’ असेच दर्शविणारे होते. मोदी-शहांना आज मुसलमानांची चिंता वाटते व मुस्लिमांच्या हक्कांचे आम्ही रक्षण करू असे ते म्हणतात आणि त्या बदल्यात वक्फ बोर्डाच्या ताब्यातील अडीच लाख कोटी किमतीच्या संपत्तीवर त्यांचा डोळा आहे. या संपत्तीचे रक्षण करू असे ते म्हणतात. म्हणजे नक्की काय? शहा यांनी सांगितले, 2025 पर्यंतच्या कोणत्याही मशिदी, दर्गे, मदरसे वगैरेंना सरकार हात लावणार नाही, पण ज्या मोकळय़ा जमिनी आहेत त्या विकून तो पैसा गरीब मुसलमान महिलांना वाटू. म्हणजे अखेर सत्य त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेच.
खरेदी-विक्रीची बात
निघालीच. जमिनी विकणार हे त्यांनी सांगितले. आता हे व्यापारी जमिनी विकणार कोणाला? याचे उत्तर जनतेला हवे आहे. देशात विकणारे आणि विकत घेणारे दोन-चार लोक आहेत. व्यापारी मंडळाचे असे धोरण असते की, 500 कोटींची लूट करायची असेल तर त्या लुटीतले पाच-दहा कोटी गरीबांच्या तोंडावर मारायचे. वक्फ बोर्डाचा सारा खेळ हा हिंदुत्व, गरीब मुसलमानांना न्याय मिळावा यासाठी नसून तो वक्फ बोर्डाच्या रिकाम्या जमिनींसाठी सुरू आहे. वक्फ बोर्डाच्या संपत्तीचे रक्षण करणाऱ्यांनी देशाची संपत्ती लाडक्या उद्योगपतींना विकली. विमानतळांपासून धारावीपर्यंत सगळे विकल्यावर हे आता वक्फ मंडळाच्या जमिनींचा धंदा करायला निघाले आहेत. वक्फच्या जमिनीचा विषय राष्ट्रहितासाठी घेतला असे मोदी सरकार सांगत आहे, पण लडाखमध्ये घुसून चीनने आपल्या 40 हजार वर्ग मैल जमिनीवर ताबा मिळवला आहे, त्याचे काय? आधी त्या जमिनीची चिंता करा. कश्मीर खोऱयातील ‘पंडित’ मंडळींची घरवापसी अद्यापि झालेली नाही. त्यांचा जमीन-जुमला, घरे त्यांना मिळत नाहीत. त्या हिंदू पंडितांची चिंता करा, पण हिंदू समाजाची चिंता न करता हे लोक मुसलमान लांगूलचालनाच्या मार्गाने निघाले आहेत व दुसऱयांना हिंदुत्व वगैरे पाठ शिकवत आहेत. सगळा मामला हा लाखो कोटींच्या संपत्तीचा आहे व कायदा बदलून ती संपत्ती विकण्याचा हा डाव आहे. वक्फ बोर्डात आता दोन गैर मुसलमान असतील. मात्र गृहमंत्री म्हणतात तसे होणार नाही. मग
हिंदू मंदिरांच्या बोर्डातही
दोन-चार गैर हिंदू असतील काय? मुंबईतील मराठी माणसांच्या जमिनी मुसलमान नव्हे, तर वेगळेच गैर हिंदू हडपत आहेत व हे लोक भाजपला आर्थिक पाठबळ देतात. हे लोक बांधकाम क्षेत्रात आहेत व त्यांच्या गृहसंकुलात मांस-मच्छी खाणाऱ्या हिंदूंना जागा देत नाहीत. हे हिंदूंच्या अधिकाराचे आक्रमण नाही काय? संपूर्ण देश शाकाहारी करायचा व त्याच वेळी जमिनी, पैशांची लूट करून खायचे हे अमानवी धोरण आहे. वक्फच्या जमिनीच्या बिर्याणीची शिते त्यांच्या गालफटात अडकली तरी अल्लाचा प्रसाद म्हणून ते मान्य करतील व बाहेर येऊन हिंदुत्वाच्या चिपळ्या वाजवतील. वक्फ बोर्डाची संपत्ती ही दानधर्मातून जमा झाली आहे. लोक अल्लाच्या नावाने दान देतात व अनंत काळापासून ही संपत्ती जमा होत आहे. आता या सर्व संपत्तीची ‘डिजिटल नोंद’ होईल. इतर बऱ्याच गोष्टी नव्या कायद्यात समाविष्ट आहेत. कोणत्याही नव्या विधेयकात अशा सुधारणा केल्या जातात, पण हे वक्फ संपत्तीचे विधेयक संसदेत आणायचा मुहूर्त निवडला तो मजेशीर आहे. अमेरिकेचे प्रे. ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के आयात शुल्क लादले या विषयावरून लोकांचे लक्ष हटविण्यासाठी मोदी सरकारने वक्फ संपत्तीचे विधेयक आणले. प्रे. ट्रम्प यांनी लादलेल्या आयात शुल्काचा भारताच्या उद्योगावर परिणाम झाला आहे. शेअर बाजार आणि रुपया कोसळून पडला. त्यामुळे महागाई, बेरोजगारीचा प्रश्न उफाळून येईल. त्यामुळे हे विधेयक आणून मोदी सरकारने त्यांचा आवडता हिंदू-मुसलमानांचा खेळ सुरू केला आहे. वक्फ संपत्तीचे विधेयक ही हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक आणि मतांसाठी सरळ मुस्लिमांचे लांगूलचालन आहे. भ्रष्टाचाराला कायद्याचा मुलामा देण्याचा हा धार्मिक खेळ आहे.