
भारताचा निवडणूक आयोग ‘सरळ’ नाही. तो निष्पक्ष तर नाहीच नाही. भाजपच्या निवडणूक घोटाळ्यातील ते एक प्रमुख पात्र आहे. भाजपचे लोक कारस्थानी आहेत व त्यांनी नैतिकतेचा खून केला आहे. लोकशाही, नीतिमत्ता वगैरेला त्यांनी तिलांजली दिली असल्याने भविष्यात सरळ मार्गाने निवडणुका होतील या भ्रमात कोणी राहू नये. ईव्हीएम डुप्लिकेट, मतदार याद्या डुप्लिकेट, मतदार ओळखपत्र डुप्लिकेट, त्यामुळे निवडणुका आणि त्यांचा विजयही डुप्लिकेट आहे. प. बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारने या स्कॅमवर आवाज उठवला. महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा तडफडत बसले. त्यामुळे यापुढेही निवडणूक आयोगाचे ‘स्कॅम’ सुरूच राहतील.
भारतातील निवडणुका म्हणजे सगळ्यात मोठा घोटाळा आहे. आंतरराष्ट्रीय भाषेत ‘स्कॅम’ आहे. त्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार भारताचा निवडणूक आयोगच आहे. महाराष्ट्र आणि हरयाणात भाजप जिंकला तो डुप्लिकेट मतदार नोंदणीमुळे. प. बंगाल विधानसभा निवडणुकीआधीच हाच डुप्लिकेट मतदारांचा खेळ त्या राज्यात सुरू झाला, पण तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाची चोरी वेळीच पकडल्याने चोराच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या आहेत. भारतात गेल्या दहा वर्षांपासून ईव्हीएम घोटाळा सुरू होताच. त्यात ‘निवडणूक फोटो ओळखपत्र’ म्हणजे ‘EPIC’ मध्ये घोटाळा करून भाजप आपल्या मतांच्या दिवसाढवळ्या चोऱ्यामाऱ्या करीत आहे. प. बंगालच्या मतदार यादीत घुसवलेले लाखो मतदार याआधी झारखंड-गुजरात-बिहारसारख्या राज्यांच्या मतदार यादीतही नोंदवले आहेत व त्यांचा ‘EPIC’ सारखाच आहे. निवडणूक आयोग आणि भाजपची हातमिळवणी असल्याचा हा पुरावा आहे. 18 सप्टेंबर 2008 ला निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवरून जाहीर केले होते की, ‘EPIC’ नंबर हा अद्वितीय (युनिक) असेल. एकाला एकच नंबर. नंबर डुप्लिकेट असणार नाही. मग आता 15 वर्षांनंतर लाखो डुप्लिकेट (बनावट) ईपीआयसी नंबर अस्तित्वात आलेच कसे? तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी प्रश्नांचा भडिमार केल्यावर निवडणूक आयोगाची भंबेरी उडाली. प्रथमच त्यांनी ही चूक मान्य केली. डुप्लिकेट ईपीआयसी नंबर अनेकांना दिले गेले, हे स्वीकारल्यावर महाराष्ट्र, हरयाणाच्या निवडणुकांत याच माध्यमातून घोटाळा झाला व भाजपच्या विजयास निवडणूक
आयोगानेच हातभार लावला
हे सिद्ध होते. निवडणूक आयोगावर तृणमूलचा हल्ला इतका जबरदस्त होता की, दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयोगाला भूगर्भातल्या भूकंपाचे हादरे बसले. दोन वेगळ्या राज्यांत दोन मतदारांचे ‘EPIC’ नंबर सारखे असू शकतात हा निवडणूक आयोगाचा खुलासा म्हणजे बकवास आहे. एका मतदाराचा एक नंबर हे निवडणूक आयोगाचे धोरण. मग हे डुप्लिकेट नंबरचे गौडबंगाल कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर आले? हा सर्व खेळखंडोबा निवडणूक आयोगाच्या स्वतंत्र व निष्पक्ष वगैरे निवडणूक घेण्याच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करतो. भारताचा निवडणूक आयोग ‘सरळ’ नाही. तो निष्पक्ष तर नाहीच नाही. भाजपच्या निवडणूक घोटाळ्यातील ते एक प्रमुख पात्र आहे. घटनाबाह्य पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्तची नेमणूक झाली आहे याचा खुलासा राहुल गांधी यांनी केला. निवडणूक आयोगाच्या निवड प्रक्रियेबाबतचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना मोदी व `यांनी घाईघाईत आपल्या मर्जीतला निवडणूक आयुक्त नेमला. एक बाहुला निवृत्त झाला, त्याच्या जागी दुसरा बाहुला नेमला. हे बाहुले देशाच्या लोकशाहीचे काळ ठरले आहेत. देशभरातील मतदार याद्यांत आपल्याला हवी असलेली माणसे घुसवून निवडणुका जिंकण्याचे हे नवे तंत्र आहे. जे मतदार ओळखपत्र क्रमांक प. बंगालमधील मतदारांना दिले आहेत, तेच नंबर गुजरात, हरयाणा, बिहार राज्यातील मतदारांना कसे दिले? राज्यांच्या अनेक मतदारसंघांतून हजारो नावे वगळायची व त्या ठिकाणी आपल्या समर्थक
‘डुप्लिकेट’ मतदारांची नावे
टाकायची. त्यामुळे देशातील लाखो मतदार त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहिले आहेत. याच पद्धतीने हरयाणात 6 लाख व महाराष्ट्रात साधारण 40 लाख डुप्लिकेट मतदार घुसवून भाजप व त्यांच्या मित्रपक्षांनी निवडणुका जिंकल्या व सत्ता काबीज केली. हा काही लोकमताचा कौल नाही. हा एक ‘स्कॅम’ किंवा घोटाळा आहे. भारतात ईव्हीएम घोटाळा आणि निवडणूक मतदार याद्यांच्या माध्यमातून होणारा ‘स्कॅम’ गेल्या 10 वर्षांपासून चालला आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणात निवडणूक आयोगास जाब विचारला व चूक कबूल करायला लावली. ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ ते असे! महाराष्ट्रातील मतदार याद्यांवर दिवसाढवळ्या दरोडे पडले. हाताशी आलेला विजय पळवून नेला, पण निवडणूक आयोगाशी ममता बॅनर्जी यांनी टोकाचा संघर्ष केला. त्यामुळेच निवडणूक आयोगाला नमते घ्यावे लागले. असा संघर्ष महाराष्ट्र आणि दिल्लीमध्येही दिसायला हरकत नव्हती. दिल्लीत स्वतः केजरीवाल पराभूत झाले. केजरीवाल यांच्या स्वतःच्याच मतदारसंघात 31 हजार मतदार काढून टाकले व 30 हजार नवे मतदार यादीत घुसवले. हे इतके मोठे ‘स्कॅम’ घडत असताना शहाण्यांचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा ‘आप’ थंडच पडला होता. भाजपचे लोक कारस्थानी आहेत व त्यांनी नैतिकतेचा खून केला आहे. लोकशाही, नीतिमत्ता वगैरेला त्यांनी तिलांजली दिली असल्याने भविष्यात सरळ मार्गाने निवडणुका होतील या भ्रमात कोणी राहू नये. ईव्हीएम डुप्लिकेट, मतदार याद्या डुप्लिकेट, मतदार ओळखपत्र डुप्लिकेट, त्यामुळे निवडणुका आणि त्यांचा विजयही डुप्लिकेट आहे. प. बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारने या स्कॅमवर आवाज उठवला. महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा तडफडत बसले. त्यामुळे यापुढेही निवडणूक आयोगाचे ‘स्कॅम’ सुरूच राहतील.