सामना अग्रलेख – लाडकी बहीण ते शेतकरी कर्जमाफी; एक नंबरचे खोटारडे!

राज्याची आर्थिक स्थिती नीट नसणे हे सरकार म्हणून तुमचे अपयश आहे. त्याचे खापर लाडक्या बहिणींवर का फोडत आहात? ‘कॅनेही ताशेरे ओढले आहेत ते तुमच्या आर्थिक धोरणांवरच. तेव्हा लाडक्या बहिणींच्या नावाने गळा काढत कर्जमाफी नाकारून शेतकऱ्यांचा गळा आवळण्याचे उद्योग थांबवा! लाडक्या बहिणींना नवीन निकषांचा तर शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा बागुलबुवा दाखविणे बंद करा! घोषणांची जुमलेबाजी आणि ईव्हीएम घोटाळा करून तुम्ही सत्तेत आलात खरे, परंतु लाडक्या बहिणींपासून शेतकरी कर्जमाफीपर्यंतचे तुमचे सगळेच बुरखे काही महिन्यांतच फाटले आहेत. तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात, हे जनतेच्या लक्षात आले आहे.

राज्यातील विद्यमान राज्यकर्त्यांचा बुरखा रोजच टराटरा फाटतो आहे. मग ते संतोष देशमुख हत्या प्रकरण असो, राज्यातील कायदा-सुव्यवस्था असो, लाडकी बहीण योजना असो, की शेतकरी कर्जमाफी. प्रत्येक बाबतीत राज्य सरकार रोजच उघडे-नागडे होत आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री ‘तपास सुरू आहे’, ‘कोणालाही सोडणार नाही’ हेच डमरू वाजवीत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही सर्व मंडळी राज्यातील तमाम ‘लाडक्या बहिणीं’चे ‘लाडके भाऊ’ वगैरे झाले होते. या योजनेवरून त्यांनी स्वतःच स्वतःला पंचारती ओवाळून घेतल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत या मंडळींना जे यश मिळाले त्यात मोठा वाटा याच लाडक्या बहिणींचा आहे, असे ते मोठ्या तोंडाने सांगत होते. मात्र आता सत्तेत बसल्यावर यांच्या मोठ्या तोंडाचा चंबू झाला आहे आणि लाडक्या बहिणींना ‘निकषां’च्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग त्यांनी सुरू झाले केले आहेत. या चाळणीतून सुमारे 50 लाख ‘लाडक्या’ बहिणी ‘नावडत्या’ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच निकषांत न बसणाऱ्या बहिणींना

अपात्र ठरवून

त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे परत सरकारजमा करण्याच्या ‘सावकारी’ला सुरुवातदेखील झाली आहे. धुळे जिल्ह्यातील एका लाडक्या बहिणीला सरकारच्या या घूमजाव धोरणाचा फटका बसला आहे. तिला मिळालेले 7500 रुपये परत सरकारजमा करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी उफाळून आलेले सत्ताधाऱ्यांचे ‘बंधूप्रेम’ सत्तेत बसताच असे आटत चालले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरूनही या मंडळींनी घूमजाव केले आहे. खुद्द राज्याच्या कृषी मंत्र्यांनीच लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ‘ताण’ पडत असल्याने शेतकऱ्यांनी कर्जमाफी विसरावी, असे जाहीर करून हात वर केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणी, आशा सेविकांपासून शेतकऱ्यांपर्यंत घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला होता. शेतकरी कर्जमाफी देणार म्हणजे देणारच, असा आव भाजपने जाहीरनाम्यात आणला होता. तुमचा तो आव आता कुठे गेला? शेतमालास हमीभाव देण्यापासून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यापर्यंत अनेक आश्वासने 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिली होती, मात्र 11 वर्षांपूर्वी त्यासंदर्भात

कानावर ठेवलेले हात

मोदी सरकारने अजूनही काढलेले नाहीत. याच मागण्यांसाठी पंजाब-हरयाणा सीमेवर कित्येक दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे, पण त्याची दखल घेण्याचेही सौजन्य मोदी सरकारने दाखविलेले नाही. मोदी सरकारच्या महाराष्ट्रातील ‘चेले-चपाटे’ सरकारनेही राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी देऊ, असे सांगायचे आणि सत्तेत बसल्यावर हात वर करायचे. राज्याची आर्थिक स्थिती नीट नसणे हे सरकार म्हणून तुमचे अपयश आहे. त्याचे खापर लाडक्या बहिणींवर का फोडत आहात? ‘कॅग’नेही ताशेरे ओढले आहेत ते तुमच्या आर्थिक धोरणांवरच. तेव्हा लाडक्या बहिणींच्या नावाने गळा काढत कर्जमाफी नाकारून शेतकऱ्यांचा गळा आवळण्याचे उद्योग थांबवा! लाडक्या बहिणींना नवीन निकषांचा तर शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा बागुलबुवा दाखविणे बंद करा! घोषणांची जुमलेबाजी आणि ईव्हीएम घोटाळा करून तुम्ही सत्तेत आलात खरे, परंतु लाडक्या बहिणींपासून शेतकरी कर्जमाफीपर्यंतचे तुमचे सगळेच बुरखे काही महिन्यांतच फाटले आहेत. तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात, हे जनतेच्या लक्षात आले आहे.