
लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी यांसह इतरही अनेक बाबतीत विद्यमान सरकारचे ‘वरातीमागून घोडे’ नाचविण्याचे उद्योग सुरू आहेत. नवीन नियम आणि निकषांची ही ‘घोडी’ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात कुठे पेंड खात होती? याच घोड्यांवरून सत्ताधारी सध्या स्वतःला मिरवत आहेत आणि लाडक्या बहिणींपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांची फसवणूक करीत आहेत. शेतकऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा घोटाळा करीत आहेत. महाराष्ट्रात घोटाळेबाज आणि लुटारू राज्य करीत आहेत. मुळात हे सरकार हाच एक घोटाळा आहे. त्यामुळे फसवणूक, घोटाळे आणि लूट याशिवाय दुसरे काय घडणार?
हेराफेरी करून सत्तेवर आलेल्या राज्यातील विद्यमान सरकारचे फसवाफसवी आणि लुटीचे कारनामे रोजच चव्हाट्यावर येत आहेत. आता जालना जिल्ह्यातील एक भयंकर प्रकार उघड झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाच्या कोटय़वधी रुपयांवर तेथील तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनीच डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. मुख्य म्हणजे हा सुमारे 50 कोटींचा अपहार झाल्याची कबुली उपजिल्हाधिकाऱ्यांनीच दिली आहे. अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यात हेराफेरी करून बोगस शेतकरी दाखवून हे अनुदान लाटण्यात आले. आता म्हणे या घोटाळ्याची चौकशी सुरू असून दोषी व्यक्तींविरोधात कठोर वगैरे कारवाई करण्यात येणार आहे. जालन्यातील या शेतकरी अनुदान घोटाळय़ाने राज्यातील सरकारचा भ्रष्ट चेहराच पुन्हा एकदा समोर आला आहे. सत्ताधारी मंडळी काहीही दावे करीत असली तरी सत्तेत आल्यापासून समाजातील
प्रत्येक घटकाची फसवणूक
केली जात आहे. दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासला जात आहे. ही मंडळी सत्तेत येण्यात लाडक्या बहिणींचा मोठा हातभार होता, परंतु सत्ता मिळताच या मंडळींनी लाडक्या बहिणींनाच ‘हात’ दाखवायला सुरुवात केली. नवनवीन नियम आणि निकष यांचा बागुलबुवा उभा केला. पात्रतेची चाळणी बारीक केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘लाडक्या’ ठरलेल्या लाखो बहिणी सत्ता स्थापन झाल्यावर ‘लाडक्या’ राहिल्या नाहीत. त्यांना अपात्र ठरविले गेले. पाठोपाठ केशरी आणि पिवळे रेशनकार्डधारक वगळता इतर अर्जांची पडताळणी केली जाईल, असे फर्मानच राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांनी काढले. आता 7 लाख 74 हजार लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी फक्त 500 रुपयेच अर्थसहाय्य दिले जाणार आहे. कारण काय, तर म्हणे या महिला ‘नमो शेतकरी सन्मान योजने’चाही लाभ घेत आहेत. जे लाडक्या बहिणींचे तेच सामान्य शेतकऱ्यांचे. ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणजे देऊच,’ असे
जाहीर आश्वासन
राज्यकर्त्यांनी दिले होते, मात्र लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक बोजाचे कारण देत शेतकऱयांना आता तरी कर्जमाफी देणे शक्य नाही, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनीच हात झटकले. एक रुपयात पीक विमा योजनाही रद्द करण्यात आली. बळीराजाशी संबंधित इतरही अनेक योजना बंद केल्या गेल्या. लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी यांसह इतरही अनेक बाबतीत विद्यमान सरकारचे ‘वरातीमागून घोडे’ नाचविण्याचे उद्योग सुरू आहेत. नवीन नियम आणि निकषांची ही ‘घोडी’ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात कुठे पेंड खात होती? याच घोड्यांवरून सत्ताधारी सध्या स्वतःला मिरवत आहेत आणि लाडक्या बहिणींपासून शेतकऱयांपर्यंत सर्वांची फसवणूक करीत आहेत. शेतकऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा घोटाळा करीत आहेत. महाराष्ट्रात घोटाळेबाज आणि लुटारू राज्य करीत आहेत. मुळात हे सरकार हाच एक घोटाळा आहे. त्यामुळे फसवणूक, घोटाळे आणि लूट याशिवाय दुसरे काय घडणार?