अदानीच्या घशात मुंबईसह महाराष्ट्राची सार्वजनिक संपत्ती घालण्याचा डाव ज्या मोदी-शहा-फडणवीस-मिंध्यांनी रचला त्या अदानीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठीच महाराष्ट्राचा पूर्ण ‘निकाल’ लावला गेला. महाराष्ट्र आज मेले. त्यामुळे राष्ट्रही मेले. अदानी राष्ट्राच्या उदयाचा जय व जल्लोष सुरू झाला. हा जय त्यांचा त्यांनाच लखलाभ ठरो. महाराष्ट्राच्या छाताडावर पाय रोवून ‘अदानी राष्ट्र’ उभे राहताना दिसत आहे. हा विजय खरा नाही!
विधानसभेचे निकाल लागले. निकाल लागले, पण हा जनतेचा काwल नाही. भाजपपुरस्कृत महायुतीला 230 जागा मिळू शकतात. यावर कोणाचा विश्वास बसेल? बेइमान शिंदे गट 57 आणि तोळामांसाचा अजित पवार गट 41 जागांवर विजयी झाला. हा निकाल विचलित करणारा आहे. राज्यातील सरकारविरोधात प्रचंड असंतोष धुमसत होता. मऱहाठी जनता भाजप आणि त्यांनी पोसलेल्या गद्दारांविरुद्ध धुसफुसत होती. सर्व बेइमानांना गाडायचेच अशा निर्धाराने महाराष्ट्राची जनता मतदानाला उतरली असताना एका झटक्यात सर्व बेइमान विजयी होतात व बेइमानांच्या जयजयकाराच्या विजयी मिरवणुका निघतात हा प्रकार महाराष्ट्राच्या स्वाभिमानी प्रतिमेला धक्का देणारा आहे. हा निकाल स्वीकार करण्यासारखा नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, कर्जबाजारी झाला आहे. कांदे, टोमॅटो, दूध रस्त्यावर फेकून द्यावे लागत आहे. महाराष्ट्राचा उद्योग गुजरातला पळवल्याने राज्यातला तरुण बेरोजगार झाला. बेरोजगारीमुळे शेतकऱयांच्या मुलांची लग्ने होत नाहीत. तरीही या सरकारबद्दल प्रेमाची ही अशी लाट उसळली व त्यात एक बदनाम, घटनाबाहय़ सरकार पुन्हा विजयी झाले, यावर कुणी विश्वास तरी ठेवील काय? लोकसभेत महाराष्ट्राने आपला स्वाभिमानी बाणा दाखवून मोदी-शहांच्या मराठीद्वेष्टय़ा राजकारणाचा पराभव केला. मोदींचे लोकसभेतील बहुमत रोखण्याचा पुरुषार्थ ज्या महाराष्ट्राने चार महिन्यांपूर्वी दाखवला त्याच महाराष्ट्रात पुढील चार महिन्यांत विधानसभेचा हा निकाल लागला व महाराष्ट्रातील ‘महा’पणाची कुंडले गळून पडली. महाराष्ट्राचे तेजच जणू संपले. जातीयवादाचे एक अगम्य प्रकरण महाराष्ट्राच्या मातीत पसरले. ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे विखारी प्रचार निर्लज्जपणे झाले व त्याबद्दल निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला नाही. पैशांचा पाऊस गडगडाटासारखा पडला. आता पैशांवरच निवडणुका लढायच्या व जिंकायच्या असतील तर लोकशाहीला टाळेच लावायला हवे व गावोगावच्या अदानीचा पक्षच निवडणुका लढवू शकेल. सामान्य माणसाचे मोलाचे मत हे पैशाच्या तागडीत तोलले गेले व त्याबरहुकूम आता विजयाचे नाद घुमले. शरद पवार, उद्धव ठाकरे या नेत्यांनी महाराष्ट्रात अविश्रांत श्रम घेतले. शेतकऱयांनी, कष्टकऱयांनी, युवकांनी, महिलांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला. तरीही फक्त लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयांमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला, असे कोणी म्हणत असतील तर ते बरोबर नाही. महाराष्ट्राच्या ऐक्याला सुरुंग लावून ‘महायुती’ नावाचा राक्षस आज विजयाचे विकट हास्य करीत आहे. या विजयामागे ‘अदानी राष्ट्रा’चे भयंकर कारस्थान आहे. दोन दिवसांपूर्वी अदानी यांच्या अटकेचे वॉरंट अमेरिकेत निघते व अदानीच्या भ्रष्टाचाराची पाठराखण करण्यासाठी संपूर्ण भाजप उभा राहतो. त्याच अदानीच्या घशात मुंबईसह महाराष्ट्राची सार्वजनिक संपत्ती घालण्याचा डाव ज्या मोदी-शहा-फडणवीस-मिंध्यांनी रचला त्या अदानीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठीच महाराष्ट्राचा पूर्ण ‘निकाल’ लावला गेला. महाराष्ट्र आज मेले. त्यामुळे राष्ट्रही मेले. अदानी राष्ट्राच्या उदयाचा जय व जल्लोष सुरू झाला. हा जय त्यांचा त्यांनाच लखलाभ ठरो. महाराष्ट्राच्या छाताडावर पाय रोवून ‘अदानी राष्ट्र’ उभे राहताना दिसत आहे. हा विजय खरा नाही!