सामना अग्रलेख – महाराष्ट्राचा विजय होईल!

राज्यात अस्थिरता व गोंधळ निर्माण झाला तरी चालेल, लोकशाही स्वातंत्र्याची धूळधाण उडवून संविधान नष्ट केले तरी चालेल, पण बेकायदा मार्गाने सत्तेवर चढायचे हा भाजपचा खाक्या आहे. भाजप व त्यांच्या मिंधे मंडळाने महाराष्ट्र विकायला काढला आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीने हा बाजार उधळून लावला. महाराष्ट्रात एक प्रामाणिक व महाराष्ट्र धर्म पाळणारे सरकार येत आहे. त्यात अडथळे आणणाऱ्यांनाही धूळ चारून महाविकास आघाडीचा जय होईल. महाराष्ट्र धर्म जिंकेल! जिंकावेच लागेल!

आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागतील. निकाल लागण्याआधी राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल काय? अशा शंका निर्माण झाल्या आहेत. शिंदे-फडणवीस ही जोडी व त्यांच्या जोडीला अमित शहांच्या झुंडशाहीचे बळ असल्यावर देशात काहीही अघटित घडू शकते. या मंडळींनी त्यांच्या मनाप्रमाणे ‘एक्झिट’ पोल लावून घेतले व त्या जोरावर ते आपल्या विजयाच्या ‘टिऱ्या’ बडवत अपक्ष, छोटे पक्ष यांच्यावर दाबदबाव आणीत आहेत, पण लोकांनी ठरवले आहे, जिंकणार तर महाविकास आघाडीच! महाविकास आघाडीच्या विजयात व विजयानंतर सत्तास्थापनेच्या मार्गात अडथळे आणण्याचे कारस्थान रचले गेले आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा कौल मानायचा नाही व लोकशाहीचा मुडदा पाडून अल्प मतात आलो तरी राजभवनातील भाजप कार्यालयात जाऊन सरकार स्थापनेचा दावा करायचा. त्यानंतर गोंधळाच्या परिस्थितीत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस करून महाराष्ट्रात राजकीय अराजक घडवायचे, अशा सडक्या विचारांच्या जोर बैठका सुरू आहेत. राजभवनात घटनेला धरून निर्णय व्हायला हवेत, पण गेल्या काही काळापासून राजभवनासारख्या घटनात्मक संस्थांचेही भाजपने साफ मातेरे करून ठेवले आहे. महाराष्ट्राच्या राजभवनाची प्रतिष्ठा तर या लोकांनी साफ रसातळाला नेली आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागत असताना

पडद्यामागे होणाऱ्या हालचाली

महत्त्वाच्या आहेत. एकमेकांचे आमदार पळवले जातील किंवा फोडले जातील, अशी भीती व्यक्त होणे लोकशाहीला धोकादायक आहे; पण राज्यात हे असले प्रकार वारंवार घडू लागले आहेत. 2019 मध्ये शिवसेना व राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले प्रत्येकी चाळीस-चाळीस आमदार एका रात्रीत मोदी-शहांच्या ‘ढोकला’ तंबूत पळून गेले व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडले गेले. आमदार अपात्रतेबाबतचा स्पष्ट निकाल न देता आपले बोलबच्चन सरन्यायाधीश चंद्रचूडही निवृत्त झाले. त्यामुळे पक्षांतराबाबतच्या घटनेतील 10 व्या शेड्युलचे सर्वोच्च न्यायालयानेच पानिपत केले. हे सत्य असले तरी गद्दारीचा सर्व कचरा उडून गेला व आज निवडून येतील ते सर्व लोक शुद्ध असतील. त्यांच्यावर कोणत्या भ्रष्ट मात्रेचा अंमल होणार नाही. तरीही महाविकास आघाडी म्हणून ‘जागते रहो’च्या भूमिका वठवाव्या लागतील. महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेसाठी लागणारे पूर्ण बहुमत मिळत आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा व ‘परेड’ घेऊन राजभवनात पोहोचणे व त्यांची कारस्थाने रोखणे यासाठी एकजुटीचे प्रदर्शन घडवावे लागेल. मतदान झाल्यावर किती टक्के मतदान झाले त्याची माहिती निवडणूक आयोगाने जाहीर केल्यावर पुढच्या 72 तासांत त्या टक्केवारीत वाढ होते व त्या वाढत्या टक्केवारीचा

काहीच आगापिछा

लागत नाही. निवडणूक आयोग सांगतो म्हणून त्यावर विश्वास ठेवायचा हा सर्वच प्रकार संशयास्पद आहे. असे संशयास्पद व रहस्यमय प्रयोग लोकसभेत, हरियाणा विधानसभा निवडणुकीत झाले. आता ते महाराष्ट्राच्या विधानसभा निकालातही घडत आहेत, पण आहे त्या संकटाला सामोरे जाऊन सत्याची लढाई लढायची, एवढेच आपल्या हाती आहे. मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली हे नक्की, मात्र त्याचा फायदा नक्की कुणाला होतोय? हे पाहण्यापेक्षा ही ‘वाढ’ खरी की कृत्रिम सूज आहे यावर संशोधन होणे गरजेचे आहे. मुळात सरकार स्थापनेसाठी जो अगदी मर्यादित कालावधी देण्यात आला आहे तोच एका व्यापक कटाचा भाग आहे. 26 तारखेला राज्यात नवीन सरकार स्थापन करणे बंधनकारक आहे. राज्यपाल अनेक तांत्रिक कारणे उपस्थित करून भाजप व त्यांच्या अल्पमती बगलबच्च्यांना मदत करतील. कारण सध्या राजभवनात काय चालते व कोणाच्या नेमणुका होतात ते जगजाहीर आहे. राज्यात अस्थिरता व गोंधळ निर्माण झाला तरी चालेल, लोकशाही स्वातंत्र्याची धूळधाण उडवून संविधान नष्ट केले तरी चालेल, पण बेकायदा मार्गाने सत्तेवर चढायचे हा भाजपचा खाक्या आहे. भाजप व त्यांच्या मिंधे मंडळाने महाराष्ट्र विकायला काढला आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीने हा बाजार उधळून लावला. महाराष्ट्रात एक प्रामाणिक व महाराष्ट्र धर्म पाळणारे सरकार येत आहे. त्यात अडथळे आणणाऱ्यांनाही धूळ चारून महाविकास आघाडीचा जय होईल. महाराष्ट्र धर्म जिंकेल! जिंकावेच लागेल!