लेबनॉनमध्ये लागोपाठ दोन दिवस झालेल्या अजब व अतर्क्य स्फोटांच्या मालिकेने युद्ध या संकल्पनेची व्याख्याच बदलून टाकली आहे. ज्याप्रकारे पेजर, वॉकीटॉकी व घरांच्या छतावरील सौर ऊर्जेच्या यंत्रणेत स्फोट घडवून हे हल्ले करण्यात आले त्यामुळे जगातील साऱ्याच देशांचे धाबे दणाणले आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा युद्धासाठी शस्त्र म्हणून वापर होणार असेल तर साऱ्या जगाचीच सुरक्षा धोक्यात आली आहे. हिंदुस्थानात तर मोबाईलसह असंख्य उपकरणांत चिनी उत्पादनांचा सुळसुळाट आहे व उलट्या काळजाचा चीन काय करू शकतो, हे कोविडच्या काळात जगाने अनुभवले आहे. केवळ आत्मनिर्भर हिंदुस्थानच्या पोकळ घोषणा देऊन भागणार नाही. गनिमी युद्धाच्या या कल्पनेपलीकडील पद्धतीला तोंड देण्यास आपण सज्ज आहोत काय, हा प्रश्न आपल्या देशवासीयांनीही राज्यकर्त्यांना विचारायलाच हवा!
इस्रायल आणि पॅलेस्टिन यांच्यात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या युद्धाने आता भयंकर वळण घेतले आहे. युद्धात पॅलेस्टिनच्या बाजूने मैदानात उतरलेल्या लेबनॉनमध्ये गेले दोन दिवस पुणी कल्पनाही करू शकणार नाही, असे स्फोट झाले. विद्यमान अत्याधुनिक युगाच्या तुलनेत कालबाह्य झालेल्या पेजर आणि वॉकीटॉकी या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा ज्या पद्धतीने या स्फोटांसाठी वापर करण्यात आला, ते पाहून जगभरातील सुरक्षा यंत्रणांमध्ये हलकल्लोळ माजला आहे. लेबनॉनमधील सौर ऊर्जेच्या यंत्रणेतही स्फोट घडवले गेले. या तिन्ही प्रकारच्या स्फोटांमध्ये किमान 40 लोक मृत्युमुखी पडले व साडेतीन हजार लोक जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे व त्यामुळे बळींची संख्या आणखी वाढू शकते. स्फोटांतील मृतांची वा जखमींची संख्या किती यापेक्षाही ज्या पद्धतीने दूर बसून हे स्फोट घडवण्यात आले, ते पाहून जगभरातील सारेच बुचकळ्यात पडले आहेत. युद्धासाठी आता क्षेपणास्त्र, लढाऊ विमाने, तोफा, पाणबुडय़ा व लाखोंचे सैन्यबळच हवे असे नाही, तर आपल्या खिशातील इलेक्ट्रॉनिक उपकरणेही शस्त्र बनून आपल्यावर उलटू शकतात, हे लेबनॉनवरील हल्ल्यांनी सिद्ध केले. या स्फोटांच्या मालिकेमागे इस्रायलचा हात आहे, असा आरोप होत आहे. इराणच्या पाठबळावर लेबनॉनमधून इस्रायलवर हल्ले करणाऱ्या हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला धडा शिकवण्यासाठी इस्रायलने हे स्फोट घडवले, असे सांगण्यात येते. रहस्यमय हल्ल्यांसाठी प्रसिद्ध असलेली इस्रायलची ‘मोसाद’ ही गुप्तचर संस्थाच अशा पद्धतीचे
सुनियोजित हल्ले
घडवू शकते. हिजबुल्लाह, इराण व पॅलेस्टिनी नेत्यांनी हे हल्ले इस्रायलनेच घडवल्याचा आरोप करून याचा सूड घेण्याची धमकी दिली आहे. शिवाय इस्रायलनेही गेल्या तीन दिवसांत ना हल्ल्यांची जबाबदारी नाकारली, ना यासंदर्भात झालेले आरोप फेटाळले. त्यामुळे या हल्ल्यांमागे इस्रायलच आहे, हे आता स्पष्टच झाले आहे. इस्रायलने एकाही माणसाचा वापर न करता हल्ल्यांची ही योजना कशी यशस्वी केली, याचे गुढ उकलून सांगणारी जी माहिती समोर येते आहे ती अचंबित करणारी आहे. दृश्य स्वरूपात बाहेरून कुठलाही हल्ला न घडवता लेबनॉनमधील पेजर्समध्ये आणि वॉकीटॉकीमध्ये स्फोटांचे जे सत्र सुरू झाले त्याने केवळ लेबनॉनमध्येच नव्हे तर साऱ्या जगाचा थरकाप उडवला. आज जे लेबनॉनमध्ये घडते आहे ते उद्या आपल्या देशातही घडू शकते, ही चिंता साऱ्याच देशांना सतावते आहे व त्यामुळेच युद्धाचे हे नवीन स्वरूप बघून आंतरराष्ट्रीय समुदाय भयचकित झाला आहे. मंगळवारी आधी लेबनॉनपासून सीरियापर्यंत एकाचवेळी तीन हजार पेजर्समध्ये स्फोट घडवण्यात आले. यातील मृतांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार सुरू असतानाच तिथे हिजबुल्लाहच्या सदस्यांकडील वॉकीटॉकीमध्ये धमाक्यांचे सत्र सुरू झाले. ज्या पेजरमध्ये पहिले स्फोट झाले ते सर्व पेजर तैवानमधील गोल्ड अपोलो या कंपनीने बनवले होते. हिजबुल्लाहनेच तैवानच्या या कंपनीला पाच हजार पेजर्स बनवण्याची ऑर्डर दिली होती. इस्रायल व त्यांची ‘मोसाद’ ही गुप्तचर संघटना मोबाईल फोन हॅक करून धोका निर्माण करू शकते म्हणून हिजबुल्लाहने आपल्या सर्व सदस्यांना मोबाईल फोनऐवजी फक्त पेजर व वॉकीटॉकी वापरण्याची सक्ती केली होती. तैवानमधून हे पेजर निघाल्यानंतर त्यातील बॅटरीवर केवळ
तीन ग्रॅम वजनाचे स्फोटक
‘मोसाद’ने पेरले व हॅकिंगच्या माध्यमातून बॅटरीचे तापमान वाढवून हे स्फोट घडवले गेले, असे आता सांगितले जात आहे. आधी पेजरवर एक मेसेज आला व त्यानंतर पेजरमधील स्फोटके सक्रिय झाली. काही सेकंदापर्यंत बीपचा आवाज आला आणि काही कळायच्या आत एकाचवेळी तीन हजार पेजरमध्ये स्फोट होऊन हिजबुल्लाहचे सदस्य व सामान्य नागरिकही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. बुधवारी ‘वॉकीटॉकी’मध्ये जे स्फोट झाले त्या वॉकीटॉकी जपानमधील एका कंपनीत तयार झाल्या होत्या, मात्र वॉकीटॉकीचे उत्पादन दहा वर्षांपूर्वीच बंद केल्याचे संबंधित कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे या वॉकीटॉकी बनावट आहेत की जुन्या साठ्यातून काढून ‘मोसाद’नेच त्या हिजबुल्लाहपर्यंत पोहोचवल्या हेदेखील गौडबंगालच आहे. लेबनॉनमध्ये लागोपाठ दोन दिवस झालेल्या अजब व अतर्क्य स्फोटांच्या मालिकेने युद्ध या संकल्पनेची व्याख्याच बदलून टाकली आहे. ज्याप्रकारे पेजर, वॉकीटॉकी व घरांच्या छतावरील सौर ऊर्जेच्या यंत्रणेत स्फोट घडवून हे हल्ले करण्यात आले त्यामुळे जगातील साऱ्याच देशांचे धाबे दणाणले आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा युद्धासाठी शस्त्र म्हणून वापर होणार असेल तर साऱ्या जगाचीच सुरक्षा धोक्यात आली आहे. हिंदुस्थानात तर मोबाईलसह असंख्य उपकरणांत चिनी उत्पादनांचा सुळसुळाट आहे व उलट्या काळजाचा चीन काय करू शकतो, हे कोविडच्या काळात जगाने अनुभवले आहे. केवळ आत्मनिर्भर हिंदुस्थानच्या पोकळ घोषणा देऊन भागणार नाही. उद्या असा बाका प्रसंग आलाच तर गनिमी युद्धाच्या या कल्पनेपलीकडील पद्धतीला तोंड देण्यास आपण सज्ज आहोत काय, हा प्रश्न आपल्या देशवासीयांनीही राज्यकर्त्यांना विचारायलाच हवा!