गद्दारी व खोकेबाजीच्या माध्यमातून मिळवलेली ‘लाडकी खुर्ची’ वाचवण्यासाठीच महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘खोकेबाजी’ला ऊत आला आहे. ‘खोकेबाज’ सरकारचा सरदार गद्दारांना पुन्हा निवडून आणण्यासाठी ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ घेत पुन्हा एकदा ‘पन्नास खोक्यां’चा प्रयोग राबवतो आहे. त्यातील 15 खोक्यांच्या पहिल्या हप्त्यातील 5 खोके खेड-शिवापुरात पकडले गेले, हा खोकेबाज सरकारचा झालेला पर्दाफाशच आहे. भाजपच्या घरी पाणी भरणाऱ्या निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या निवडणुकीतील पैशांचा हा महापूर दिसेल काय?
महाराष्ट्रात ‘खोकेबाजी’च्या माध्यमातून मिंध्यांचे सरकार स्थापन झाल्यापासून ‘पन्नास खोके, एकदम ओके’ ही घोषणा मोठीच लोकप्रिय झाली होती. ही घोषणा किती समर्पक होती, याचे जिवंत दर्शन आता केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर साऱ्या जगाला झाले आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत खोकेबाजांनी एका मताला 5 हजार रुपयांचा भाव काढला असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी खोकेबाजांचा सरदार पुन्हा एकदा पन्नास खोक्यांची रसद वाटत सुटला आहे. या रसदीतील काही खोके पकडले गेल्याने खोकेबाजांबरोबरच स्वच्छतेचे बुरखे पांघरणाऱ्या ढोंग्यांचीही अब्रू चव्हाटय़ावर आली आहे. पुण्यातील खेड-शिवापूर परिसरातील टोलनाक्यावर नाकाबंदीदरम्यान काही गाड्या अडवण्यात आल्या. यातील एका गाडीतून पाच कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. गद्दारांच्या भाषेत सांगायचे तर एकेक कोटीचे पाच खोके या नाकाबंदीत पकडले गेले. अर्थात बोभाटा झाल्यामुळे पाच कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याचे कागदोपत्री दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात ही रक्कम 15 कोटींची म्हणजे गद्दारांच्या भाषेत 15 खोके इतकी होती, असे सांगितले जाते. मात्र ‘खोकेबाज’ सरकारमधील गद्दारांच्या सरदाराने ज्या ठिकाणी ही कारवाई झाली तिथे कोणाला तरी फोन फिरवला आणि या गाडीसोबत असलेल्या इतर गाड्या सोडून देण्यात आल्या, असा आरोप आहे. त्यामुळे
15 कोटी रुपयांपैकी
पाच कोटी जप्त केले तरी सोडून दिलेल्या गाडीसोबत 10 कोटी रुपयेदेखील सोडून देण्यात आले. पुण्याच्या ग्रामीण पोलिसांनी खेड-शिवापूर टोलनाक्यावर ज्या गाडीतून ही रक्कम जप्त केली, त्या गाडीचा क्रमांक एमएच-45 एएस 2526 असा आहे व या गाडीतून ‘खोकेबाज’ सरकारमधील एका गद्दार आमदाराचेच कार्यकर्ते प्रवास करीत होते. ही गाडी मुंबईहून सांगोल्याकडे जात होती व त्यामुळेच सांगोल्याच्या गद्दार आमदाराकडे संशयाची सुई नव्हे तर दाभण फिरणे साहजिक आहे. गाडीमध्ये गद्दार आमदाराचे एक नातेवाईक आणि तीन कार्यकर्ते होते. यापैकी एका कार्यकर्त्याचे नाव रफिक नदाफ असे आहे. गद्दार आमदार जेव्हा शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून सूरतमार्गे गुवाहाटीला पोहोचले होते, तेव्हा सांगोल्याच्या याच रफिक मियाँने पळपुटय़ा आमदाराला गुवाहाटीचे वातावरण व ख्याली-खुशाली विचारण्यासाठी फोन केला होता. त्यावर ‘काय झाडी, काय डोंगार… समदं ओक्के मंदी हाय’ असे उत्तर त्या आमदाराने दिले होते. शहाजीबापू हे त्या आमदाराचे नाव. ‘पन्नास खोके, एकदम ओके’ या घोषणेप्रमाणेच गद्दार आमदाराचा ‘काय झाडी, काय डोंगार’ हा निर्लज्ज डायलॉगही महाराष्ट्रात भलताच गाजला होता. त्याच आमदाराच्या मतदारसंघात निघालेली पाच कोटींची रक्कम पकडली जाते व
गद्दार आमदाराचा डायलॉग
‘फेमस’ करणारा रफिकही त्याच गाडीत सापडतो हा नक्कीच योगायोग असू शकत नाही. मात्र सोमवारी रात्री उशिरा ही गाडी व रक्कम पकडल्यापासून ही रोकड पहाटे 4 वाजता कोषागारात जमा करेपर्यंत सरकारच्या सर्वच विभागांनी जी लपवाछपवी केली ती संशयास्पद आहे. गृहमंत्री फडणवीस यांचे पोलीस हातकडी बांधलेल्या आरोपीचे एन्काऊंटर करून मर्दुमकीचा आव आणतात; पण आचारसंहितेच्या काळात कोटय़वधी रुपयांची रोकड घेऊन फिरणाऱ्या मिंध्यांच्या कार्यकर्त्यांना गपगुमान सोडून देतात. गाडीतील चौघांच्याही मुसक्या आवळून या पैशाचे मायबाप कोण आणि कुणासाठी हे पैसे घेऊन जात होते, याची कसून चौकशी केली असती तर ‘खोकेबाजां’चा सरदार व ‘डोंगार’फेम आमदार यांची नावे नक्कीच समोर आली असती. मात्र पोलीस, निवडणूक विभाग व इन्कम टॅक्सचे अधिकारी सळ्यांनीच ‘अळी-मिळी गुप-चिळी’ करून जी दातखिळी पकडली आहे, त्यामुळे संशय अधिकच बळावतो आहे. गद्दारी व खोकेबाजीच्या माध्यमातून मिळवलेली ‘लाडकी खुर्ची’ वाचवण्यासाठीच महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘खोकेबाजी’ला ऊत आला आहे. ‘खोकेबाज’ सरकारचा सरदार गद्दारांना पुन्हा निवडून आणण्यासाठी ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ घेत पुन्हा एकदा ‘पन्नास खोक्यां’चा प्रयोग राबवतो आहे. त्यातील 15 खोक्यांच्या पहिल्या हप्त्यातील 5 खोके खेड-शिवापुरात पकडले गेले, हा खोकेबाज सरकारचा झालेला पर्दाफाशच आहे. भाजपच्या घरी पाणी भरणाऱया निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या निवडणुकीतील पैशांचा हा महापूर दिसेल काय?