सामना अग्रलेख – सातारचे वाल्मीक कराड! तुषार खरात यांची बेकायदा अटक

मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांनाही उघडे केले. मुंडे, गोरे, रावल, राठोड अशा टाकाऊ लोकांची टोळी फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहे. त्यातले मुंडे गेले. इतरांनाही जावेच लागेल. पत्रकार तुषार खरात यांची अटक हा स्वातंत्र्य, लोकशाही मानणाऱ्या जनतेसाठी आघात आहे. तुषार खरात यांच्या मागे उभे राहावेच लागेल. रोहित पवार हे तुषार खरात यांच्या मागे उभे राहिले आहेत. त्यांचे अभिनंदन! पण इतरांचे काय?

हाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तरीही राज्यातील अनेक गावगुंड त्यांच्या मंत्रिमंडळात असून कायदा आणि पोलीस या ‘आकां’च्या कोठीवर नाचत आहे काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. साताऱ्यातील जयकुमार गोरे या मंत्र्याने झुंडशाहीचा कहर केला आहे. सत्ता आणि पोलिसी बळाचा गैरवापर करून गोरे यांनी स्थानिक पत्रकार तुषार खरात यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अटक करायला भाग पाडले. तुषार खरात यांनी गोरे यांच्या एका घाणेरड्या प्रकरणास वाचा फोडली. साताऱ्याच्या एका घरंदाज महिलेने गोरे यांच्या संदर्भात पोलीस आणि राजभवनात तक्रार केली. गोरे यांनी आपल्याला मोबाईलवर स्वतःचे नग्न फोटो पाठवून एक प्रकारे विनयभंगच केला, असे ती महिला म्हणते. ती महिला कोर्टात गेली तेव्हा गोरे यांनी कोर्टात साष्टांग दंडवत घालून माफी मागितली व खटला मागे घेण्याची विनवणी केली. यापुढे पुन्हा त्रास देणार नाही, असा शब्द दिल्यावर त्या महिलेने खटला मागे घेतला. याचा अर्थ या विनयभंग प्रकरणातून जयकुमार गोरे निर्दोष सुटले असा होत नाही. कोर्टाच्या आदेशात गोरे निर्दोष आहेत असे म्हटले नसताना गोरे यांनी विधानसभेत आपण या प्रकरणात निर्दोष सुटल्याचे खोटेच सांगून सार्वभौम सभागृहाची दिशाभूल केली व त्याबद्दल गोरे यांच्यावरच हक्कभंगाचा खटला चालवायला हवा. पुन्हा या पीडित महिलेची मुलाखत तुषार खरात यांनी घेतली व गोरे यांचा खोटेपणा उघडा केला. ही महिला 17 मार्चला राजभवनासमोर उपोषणाला बसणार आहे. कारण गोरे यांनी त्या महिलेचा छळ चालूच ठेवला. गोरे यांना लाथ मारून मंत्रिमंडळातून हाकलून द्यावे असे हे प्रकरण आहे, पण महाराष्ट्रात उलटेच घडले. गोरे यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून खरात यांच्यावर खंडणी, विनयभंग, अॅट्रॉसिटी असे गुन्हे लावले व त्यांना अटक करायला भाग पाडले. गोरे यांच्या सरकार पुरस्कृत झुंडशाहीस मुख्यमंत्री फडणवीस यांची मान्यता आहे काय? पोलिसांचा हा असा

मुक्त गैरवापर

हाराष्ट्रात जागोजाग सुरू आहे व ते लोण आता स्वातंत्र्यलढ्यात पुढे असलेल्या छत्रपतींच्या साताऱ्यात पोहोचले. गोरे यांचे वागणे हे बीडच्या वाल्मीक कराडप्रमाणे आहे व हे कराड थेट सत्तेत आहेत. तुषार खरात हे तरुण पत्रकार स्वतःचे ‘लय भारी’ हे यूट्यूब चॅनल चालवतात. साताऱ्यातील अनेक प्रकरणांवर त्यांनी उत्तम रिपार्टिंग केले. खरात यांनी काही चुकीचे केले असेल तर संबंधित व्यक्ती त्यांच्यावर कायद्याने कारवाई करू शकते. बेअदबीचा खटला दाखल करू शकते. गोरे यांनी तर खरात यांच्यावर थेट हक्कभंगच आणला. हेसुद्धा मान्य, पण गोरे यांचा सुडाग्नी इतका पेटला की, त्यांनी खरात यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करून अशी कलमे टाकली की, खरात यांची कधी सुटकाच होऊ नये. एका तरुण पत्रकाराला आयुष्यातून उठविण्याचा हा नीच प्रयत्न आहे. गोरे यांनी याआधी साताऱ्यातील एक शिक्षण संस्था व त्यांचे कॉलेज हडपण्यासाठी देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात सडवले. देशमुखांच्या घरातील महिला व मुलांनाही या गोरे यांनी सोडले नाही. गोरे यांची कृत्ये महाराष्ट्राला आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहेत. पुन्हा ही कृत्ये प्रसिद्ध करू नयेत हा त्यांचा दबाव आहे. टिळक, आगरकर, जांभेकर, आचार्य अत्रे यांच्या पत्रकारितेचा वारसा सांगणारा हा आपला महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रात सत्य सांगितल्याबद्दल एका तरुण पत्रकाराला मंत्र्याकडून सुडाने तुरुंगात ढकलले जात असेल तर हे राज्य शिवरायांचे नसून मोदी यांचे झाले हे मानायला हवे. मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांवर अशाच सुडाच्या कारवाया देशात सुरू आहेत. व्यंगचित्रकार, पत्रकार, लेखक मंडळी त्यामुळे दहशतीखाली आहेत. महाराष्ट्रातही आता तोच दळभद्री प्रकार सुरू झाला आहे. तुषार खरात या तरुण पत्रकाराच्या अटकेने काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातील पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आणि

पत्रकारितेवर सेन्सॉरशिप

लागू झाली आहे काय? सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरीचे आरोप कोणी समोर येऊन पुराव्यासह करीत असतील तर त्याकडे पत्रकारांनी डोळेझाक करण्याचे फर्मान सुटले आहे काय? महाराष्ट्रात मंत्र्यांना कसेही वागण्याचा, सत्य सांगणाऱ्यांना धमक्या देण्याचा परवाना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे काय? या प्रश्नांची उत्तरे विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवीत. विरोधी पक्षांत लोकशाहीची बूज आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ऊर्जा उरली असेल तर तुषार खरात यांची अटक गांभीर्याने घेऊन मंत्री जयकुमार गोरे यांच्या गुंडगिरीवर विधानसभेत सरकारला सळो की पळो करून सोडले पाहिजे. साताऱ्यात शिवरायांचे दोन वंशज फडणवीस सरकारचे समर्थक आहेत. या सर्व प्रकरणात सातारचे दोन्ही श्रीमंत छत्रपती गप्प बसणार आहेत काय? कोणीही गप्प बसले तरी महाराष्ट्रातल्या सर्व पत्रकारांनी, लोकशाही मूल्यांसाठी लढणाऱ्या जनतेने जयकुमार गोरेंच्या दडपशाहीविरुद्ध ठामपणे उभे राहायलाच हवे. सत्य सांगणे, लिहिणे हा महाराष्ट्रात गुन्हा ठरला तर हे राज्य मूक-बधिर गुजरात होईल. राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार तुषार खरात यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करण्यापेक्षा ‘आरोप’ करणाऱ्या त्या पीडित महिलेवर बेअदबीचा खटला आणि हक्कभंग दाखल करण्याची हिंमत दाखवावी. गोरे यांनी तसे केले नाही. कारण संबंधित महिलेला पाठवलेले स्वतःचे 300 नग्न व अश्लील फोटो आजही कोर्टाच्या कस्टडीत आहेत. हे सर्व फोटो व गोरे यांनी केलेले अश्लील चॅटिंग कोर्टानेच जनहितार्थ समोर आणावे. सैतानाला नागडे करावेच लागेल. मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांनाही उघडे केले. मुंडे, गोरे, रावल, राठोड अशा टाकाऊ लोकांची टोळी फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहे. त्यातले मुंडे गेले. इतरांनाही जावेच लागेल. पत्रकार तुषार खरात यांची अटक हा स्वातंत्र्य, लोकशाही मानणाऱ्या जनतेसाठी आघात आहे. तुषार खरात यांच्या मागे उभे राहावेच लागेल. रोहित पवार हे तुषार खरात यांच्या मागे उभे राहिले आहेत. त्यांचे अभिनंदन! पण इतरांचे काय?