
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गृहखाते, पोलीस, गुप्तचरांचा वापर राजकारणासाठी करतात, विरोधकांना छळण्यासाठी, सरकारे पाडण्याच्या व बनवण्याच्या खेळासाठी, आमदार व खासदारांच्या फोडाफोडीसाठी करतात. 365 दिवस त्यांचे डोके त्याच कटकारस्थानात गुंतून पडल्यावर राष्ट्रीय सुरक्षेचा विचार कसा होणार? हिंदूंचे रक्षण कसे होणार? हिंदू मेल्यावर मातम करून, मुसलमान आणि पाकड्यांच्या नावाने बोंबा मारून मते मागणे हा यांचा पिढीजात धंदा. पुलवामात तेच झाले. पहलगाम हल्ल्याची तीच गत होईल. हिंदू जागा कधी होणार? अंधभक्तीतून डोळे कधी उघडणार?
कश्मीरात पुन्हा एकदा हिंदूंचा नरसंहार झाला आहे. हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष सध्या भारत दौऱ्यावर आहेत. मोदी काळात भारतात आबादी आबाद सुरू असल्याचे चित्र रंगवले जात असतानाच कश्मीरात गेल्या पंचवीस वर्षांतील सर्वात भयंकर दहशतवादी हल्ला झाला. 26 पर्यटकांच्या शरीरांची बंदुकांनी चाळण करून अतिरेकी पसार झाले. जाताना त्यांनी जिवंत पर्यटकांना निरोप दिला, ‘‘मोदींना सांगा इथे काय घडले!’’ पंतप्रधान मोदी वगैरे नेते पाकिस्तानला घरात घुसून मारण्याच्या पोकळ धमक्या आणि इशारे देत असतात. प्रत्यक्षात सीमा पार करून अतिरेकी भारतात घुसून निरपराध हिंदूंना मारत आहेत. रक्ताचे सडे आणि हिंदू मृतांचा खच पडल्यावर गृहमंत्री शहा कश्मीरात पोहोचले. शहा आता काय करणार? कश्मीरातील हिंदू नरसंहाराची जबाबदारी घेऊन शहा यांनी राजीनामा द्यायला हवा. प. बंगालातील हिंसाचारास जबाबदार ठरवून ममता बॅनर्जी यांचा राजीनामा मागितला जातो, पण हिंदू नरसंहाराची जबाबदारी घ्यायला निर्लज्ज केंद्र सरकार तयार नाही. भाजप काळात कश्मीर अशांत आहे. संपूर्ण देशातच धार्मिक द्वेषाचे वातावरण निर्माण केल्यावर दुसरे काय होणार? मोदी यांच्या कार्यकाळात उरी आतंकवादी हल्ला झाला. 40 जवानांचे हत्याकांड घडवणारे पुलवामा घडले. पुलवामा हत्याकांड ही सुरक्षा व्यवस्थेची हाराकिरी आणि सरकारची बेफिकिरी होती. आता कालचा पहलगाम हल्लासुद्धा बेफिकिरी आहे. कश्मीरात पर्यटक अतिरेक्यांच्या निशाण्यावर सदैव आहेत. कश्मीरात या वेळी 25 लाख पर्यटक पोहोचले. त्यातले 22 लाख पर्यटक पहलगामला आले. काल हल्ला झाला त्या ठिकाणी दोन हजारांवर पर्यटक होते व त्यांच्या सुरक्षेसाठी एकही जवान किंवा पोलीस नव्हता. त्यामुळेच दहशतवाद्यांनी हल्ला करण्यासाठी ही जागा निवडली. पहलगामचा बैसरन भाग हा जंगलाने घेरलेला आहे, उंचावर आहे. येथे पोलीस आणि जवानांची तैनाती नसते, रस्ते निमुळते आहेत. अतिरेकी येथे
दबा धरूनच बसले
व हल्ला केला.जिथे दोन हजारांवर पर्यटक जमले आहेत, जो कश्मीरचा सगळय़ात संवेदनशील भाग आहे, तेथे काही अतिरेकी लष्कराच्या गणवेशात घुसतात, एकेकाला नाव विचारून 26 जणांना गोळय़ा घालतात. अंदाधुंद, बेफाम गोळीबार करून निघून जातात. कुणाच्या भरवशावर सरकारने इतक्या पर्यटकांना संवेदनशील भागात सोडले? जे मारले गेले त्यात बहुतेक हिंदू आहेत. एखाददुसरा मुसलमान आहे. पुलवामानंतर पहलगामचा हल्ला म्हणजे गुप्तचर संस्थांचे सपशेल अपयश आहे. कुठे गेले ते जेम्स बॉण्ड म्हणून मिरवणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार? पंतप्रधान मोदी वारंवार सांगत असतात, हा देश सुरक्षित हातात आहे. मोदी खोटे बोलतात. मोदींनी नोटाबंदी जारी केली तेव्हा सांगितले, ‘‘आता दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडेल.’’ अमित शहांनी 370 कलम हटवून जम्मू-कश्मीरला केंद्रशासित राज्य बनवले तेव्हा जाहीर केले, ‘‘आता खोऱ्यातील दहशतवाद संपला आहे.’’ पण येथे रोजच रक्ताचे पाट वाहत आहेत व त्यात यांच्या खोटेपणाची थुंकी मिसळत आहे. कश्मीर खोऱ्यातला दहशतवाद संपलेला नाही. 370 कलम हटवल्यावर 2019 सालापासून कश्मीरात 197 सुरक्षा कर्मचारी मारले गेले. 135 नागरिक मारले गेले. 700 संशयित अतिरेकी मारले गेले. खोऱ्यातील हिंसाचार संपल्याचे हे लक्षण नाही. हिंदूंना ‘टार्गेट’ केले जात आहे व ज्या कश्मिरी पंडितांसाठी 2014 च्या निवडणुकीत मोदी यांनी आश्वासने दिली, ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत. कश्मिरी पंडितांची घर वापसी झाली नाहीच, उलट उरलेले हिंदूही पलायन करीत आहेत. हिंदूंचे तारणहार म्हणवून घेणाऱ्या भाजप सरकारला याची लाज वाटली पाहिजे. 2019 च्या निवडणूक जाहीरनाम्यात कश्मीरातील 370 कलम हटवण्याची घोषणा होती तसे कश्मीरातील
हिंदूंना सुरक्षा देण्याचे वचन
होते. 370 कलम हटवल्याचा राजकीय उत्सव मोदी सरकार आणि भाजपवाल्यांनी साजरा केला, पण खोऱ्यातील हिंदूंना निराधार अवस्थेत सोडले. कश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा मोदी-शहांनी काढला. म्हणजे हा भाग केंद्रशासित करून सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आपल्या हातात घेतली. जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री नामधारीच राहिले. राज्यपालांच्या माध्यमातून अमित शहा कश्मीरवर राज्य करीत आहेत. हे राज्य कसे आहे ते काल पहलगाम येथील आक्रोश आणि किंकाळ्यांनी दिसले. कश्मीर प्रश्नात मोदी यांनी राजकारण आणले. वारंवार खापर काँग्रेस आणि नेहरूंवर फोडले. दहा वर्षे देशात स्वतः मोदी आहेत. पुलवामा मोदी सरकारच्या अक्षम्य बेफिकिरीमुळे घडले हे तेव्हाचे राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी सांगितले व पहलगाम अमित शहांच्या मस्तीमुळे घडले. कश्मीरचे धोरण मोदी काळात फसले हे नक्की. पाकिस्तानला धमक्या देऊन हा प्रश्न सुटणार नाही. अशा धमक्यांनी मोदींच्या भक्तांना बरे वाटते. पाकिस्तानचे कंबरडे मोडायचे राहिले बाजूला, पहलगाम येथे अतिरेक्यांनी हिंदूंच्या नकली तारणहारांच्या कंबरडय़ावर हल्ला केला. देशात गेले दशकभर हिंदू-मुसलमान द्वेषाचे विष पसरवून सदैव दंगलीचे वातावरण तयार केले जात आहे. गोरगरीब मुसलमानांच्या घरांवर बुलडोझर फिरवून या काळात उन्मत्त उत्सव केले गेले. देशातली शांतता व एकोपा नष्ट केला. देशातील प्रत्येक समस्येवर एकच उत्तर… हिंदू-मुसलमान आणि भारत-पाकिस्तान. मग हा गुजरात फॉर्म्युला जम्मू-कश्मीरात का चालला नाही? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गृहखाते, पोलीस, गुप्तचरांचा वापर राजकारणासाठी करतात, विरोधकांना छळण्यासाठी, सरकारे पाडण्याच्या व बनवण्याच्या खेळासाठी, आमदार व खासदारांच्या फोडाफोडीसाठी करतात. 365 दिवस त्यांचे डोके त्याच कटकारस्थानात गुंतून पडल्यावर राष्ट्रीय सुरक्षेचा विचार कसा होणार? हिंदूंचे रक्षण कसे होणार? हिंदू मेल्यावर मातम करून, मुसलमान आणि पाकड्यांच्या नावाने बोंबा मारून मते मागणे हा यांचा पिढीजात धंदा. पुलवामात तेच झाले. पहलगाम हल्ल्याची तीच गत होईल. हिंदू जागा कधी होणार? अंधभक्तीतून डोळे कधी उघडणार?