
श्रीमंतांना सर्व सवलती आणि गरीबांना कोणीच वाली नाही. गरीबांनी काही मागितले तर त्यांना ‘हिंदू खतरे में’ अशी भीती दाखवून ‘शांत रहा’ असे सांगितले जाते. त्यामुळे भारतीय जनतेला शांत आणि सुखी करण्याची कांडी राज्यकर्त्यांना सापडली आहे. पंतप्रधान मोदींची प्रवचने, त्या प्रवचनांवर माना डोलवणारे व टाळ्या पिटणारे लाखो अंधभक्त पाहिले की प्रश्न पडतो, ‘सुख सुख म्हणजे नक्की काय असते?’ आपल्या देशात चाललंय तेच तर सुख असतं! जगाला ते दिसत नाही हा त्यांचा दृष्टिदोष!
आनंदी देशाची वार्षिक यादी जाहीर झाली असून भारत 118 व्या क्रमांकावर आहे. ही क्रमवारी संयुक्त राष्ट्र संघातर्फे लावली जाते. त्यामुळे भारतातील मतदार यादीप्रमाणे त्यात घोटाळा असण्याची शक्यता नाही. आश्चर्य असे की, पाकिस्तान आणि नेपाळसारखे देश भारतापेक्षा जास्त आनंदी दाखवले आहेत. नेपाळ 92 व्या तर पाकिस्तान 109 व्या क्रमांकावर आहे. फिनलँड सगळ्यात सुखी म्हणजे पहिल्या क्रमांकावर, त्यापाठोपाठ डेन्मार्क, आईसलँड, स्वीडन, नेदरलँड वगैरे देश आहेत. रशिया, अमेरिकेसारखी राष्ट्रे आनंदी राहण्याच्या बाबतीत वरचा क्रमांक पटकावू शकली नाहीत, पण आम्हाला त्याचे काय? जगातील अनेक देश दहशतवादाने ग्रासले आहेत, पण तेदेखील ‘आनंद पोटात माझ्या मावेना’ या भूमिकेत शिरून मस्त जगत आहेत. आमच्या देशातही 80 कोटी लोकांनी मोदी-योगी पुरस्कृत कुंभस्नानाचा आनंद घेतला, लोकांनी गंगेत डुबक्या मारल्या. बाबा, संत-महात्म्यांनी आशीर्वादाची बरसात केली. कुंभ सोहळ्यात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल झाल्याचा हिशोब योगी महाराजांनी दिला. तरीही भारताच्या चेहऱ्यावर आनंद आहे व लोक सुखी आहेत असे संयुक्त राष्ट्रास दिसले नाही. फिनलँड हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे आर्थिक सुबत्ता आहे, पण फिनलँडच्या लोकसंख्येमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती इतर युरोपीय देशांपेक्षा खूपच जास्त आहे. तरीही या देशाच्या आनंदाचा ‘इंडेक्स’ जास्त आहे. भारतात शेतकरी, बेरोजगारांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. मोदी यांनी 2014 पासून ‘अच्छे दिन’ म्हणजे आनंदी दिवस आणण्याचे वचन देऊनही
गरिबी व महागाईवर मात
करता आलेली नाही. 80 कोटी लोकांना पंतप्रधान मोदी व त्यांचे सरकार 10 किलो फुकट धान्य देते. महाराष्ट्रासारख्या राज्यात महिलांना 1500 रुपयांचे वाटप करून गुलाम करून ठेवले गेले आहे. जात, धर्म, भाषा यावरून भारतात रोज संघर्ष सुरू आहे. त्यामुळे जनता त्रस्त आणि तणावाखाली आहे. मोदी व त्यांचे पाच-दहा उद्योगपती मित्र सोडले तर आनंदी कोणीच नसावे. हे दुःख इतर देशांतही असावे. तरीही ते देश आनंदाच्या बाबतीत आपल्या पुढे आहेत. कारण त्यांचे राज्यकर्ते बनवाबनवी करत नाहीत. जनतेशी खोटे बोलत नाहीत. सामान्य गरजा भागविण्यासाठी तेथील जनतेला भ्रष्ट मार्गाचा अवलंब करावा लागत नाही. भारतात व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने लादली गेली आहेत. त्यामुळे लेखक, कलावंत, सामान्य जनता तणावाखाली जगत आहे. तेव्हा पंतप्रधान मोदी यांचे मूर्ख अंधभक्त सोडले तर इतर जनतेच्या सुखाच्या नावाने बोंब आहे. अंधभक्तांच्या डोक्यात व तोंडात धर्माच्या अफूची गोळी असल्याने ते धुंदीत आहेत. ती धुंदी म्हणजेच त्यांना आनंद वाटतोय. सगळी मानवजात, सगळं जग सुखासाठी धडपड करत असतं. सुखाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. संयुक्त राष्ट्र संघाने ज्या अहवालाच्या आधारे आनंदी देशांचा क्रम ठरवला, त्यातील काही निरीक्षणे महत्त्वाची ठरतात. एखादा देश आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे, तेथील घरांतून सोन्याचा धूर निघतो म्हणून तेथील लोक आनंदी नसतात, तर त्या देशातील लोकांतील आपापसातील सौहार्द्र आणि समाजातील
सकारात्मक भूमिका
त्या देशातील लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणते. या गोष्टींचाच भारतीय समाजात अभाव दिसतो. त्यामुळे लोकांत नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढत आहे. सुखी देशांना कोणत्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते? भिन्न धर्मांच्या समाजांना एकमेकांकडे विश्वासाने पाहावे लागते. समाजात विषमता आणि वांशिक भेदाभेदी आहे काय? ते पाहिले जाते. समाज इमानदार आहे काय? उदाहरणार्थ, ज्या देशातल्या लोकांना ही खात्री आहे की, त्यांचे पाकीट किंवा पर्स हरवली तर ती त्यांना परत मिळू शकते, ते देश सुखी, आनंदी ठरू शकतात. आता जाहीर झालेल्या सुखी देशांच्या यादीत ज्यांची नावे आहेत त्या देशांत चोऱ्या होत नाहीत व हरवलेली, विसरलेली वस्तू परत मिळते. सुखी देशांचा निर्देशांक अशा गोष्टींमुळे वाढतो. भारतात आपण ही अपेक्षा करू शकतो काय? देशातले उद्योगपती बँकांकडून कर्ज घेतात व बुडवतात. मोदी गोटातील 22 उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले गेले, पण गरीबांचे कर्ज माफ होत नाही व कर्जापोटी त्यांना आत्महत्या करावी लागते. ज्या उद्योगपतींची कर्जे माफ झाली त्यात अंबानी, जिंदालसारखे उद्योगपती आहेत. श्रीमंतांना सर्व सवलती आणि गरीबांना कोणीच वाली नाही. गरीबांनी काही मागितले तर त्यांना ‘हिंदू खतरे में’ अशी भीती दाखवून ‘शांत रहा’ असे सांगितले जाते. त्यामुळे भारतीय जनतेला शांत आणि सुखी करण्याची कांडी राज्यकर्त्यांना सापडली आहे. पंतप्रधान मोदींची प्रवचने, त्या प्रवचनांवर माना डोलवणारे व टाळय़ा पिटणारे लाखो अंधभक्त पाहिले की प्रश्न पडतो, ‘सुख सुख म्हणजे नक्की काय असते?’ आपल्या देशात चाललंय तेच तर सुख असतं! जगाला ते दिसत नाही हा त्यांचा दृष्टिदोष!