सामना अग्रलेख – ‘क्लोरोफॉर्म’च्या गुंगीत…

चीन आपल्याशी सैन्य माघारीच्या कराराचे नाटक करील आणि दुसरीकडे सीमांवरील भारतविरोधी उचापती सुरूच ठेवील. आताही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या गळाभेटीचे तुणतुणे मोदी सरकार वाजवीत असताना आपल्या सीमांवर चीनने 22 गावे वसविल्याचे सॅटेलाइट फोटोच प्रसिद्ध झाले आहेत. हा केवळ योगायोग नाही तर चिनी ड्रॅगनचा खरा चेहरा आहे. एकीकडे भारतीय राज्यकर्त्यांशी गळाभेटीघ्यायच्या आणि दुसरीकडे भारताचाच केसाने गळाकापायचा. चीन हा असाच आहे! वेळोवेळी त्याचा वाईट अनुभव आपण घेतला आहे. तेव्हा प्रश्न चिन्यांचा नाहीच, भारतचीन संबंधात सुधारणा झाल्याच्या क्लोरोफॉर्मच्या गुंगीमध्ये असलेल्या मोदी सरकारचा आहे 

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची गळाभेट घेत असतानाच चीनने आपला केसाने गळा कापल्याची माहिती उघड झाली आहे. तिकडे डोवाल चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ करीत होते आणि इकडे आपल्या डोकलाम या भागात चीनने जवळपास आठ नवी गावे वसविली असल्याचे सॅटेलाइट फोटो प्रसिद्ध होत होते. चीन हा किती पाताळयंत्री आहे, याचा हा आणखी एक नमुना. भूतानपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत भारतीय सीमांना लागून असलेल्या भागात चीन कृत्रिम गावे वसविण्यापासून रस्ते, पूल, विमानतळे बांधण्यापर्यंत अनेक उचापती करीत आहे व ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. सॅटेलाइट फोटोंच्या माध्यमातून यापूर्वीही चिन्यांचे हे उद्योग समोर आले आहेत. त्यावरून आमचे राज्यकर्ते ‘हे खपवून घेणार नाहीत’ वगैरे कागदी बाण सोडतात, पण हे बाण चिनी ड्रॅगन फेकून देतो आणि भारतीय सीमांवरील त्याच्या उचापती सुरूच ठेवतो. आता जे भूतान तसेच डोकलाम परिसरातील चिनी उद्योग चव्हाट्यावर आले आहेत ते चीनच्या याच उचापतखोर आणि साहसवादी धोरणाचा भाग आहे. दोनच आठवड्यांपूर्वी भारत-चीन संबंधांमध्ये

थोडीफार सुधारणा

होत आहे, अशी माहिती आपले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत दिली होती. प्रत्यक्ष ताबा रेषेवर शांतता निर्माण करण्यात यश आले आहे, असा दावा जयशंकर यांनी केला होता. मागील चार वर्षांपासून या भागात दोन्ही देशांदरम्यान सातत्याने तणावपूर्ण वातावरण राहिले आहे. गलवान खोऱ्यामध्ये दोन्ही सैनिकांमध्ये झालेल्या भयंकर चकमकीने तर हा तणाव तुटतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र अलीकडील काही महिन्यांत चर्चेच्या सुमारे दोन डझन फेऱ्या आणि इतर बैठका यामुळे सीमा भागांतील हे वातावरण निवळल्याचा दावा मोदी सरकार मोठा गाजावाजा करून करीत होते. ऑक्टोबर महिन्यात भारत आणि चीन या दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेऊन एप्रिल 2020 ची स्थिती पूर्ववत केली होती. या घटनेचाही मोदी सरकारने मोठा डिंडोरा पिटला होता. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही चीनचे संरक्षणमंत्री डोंग जून यांची भेट घेऊन पूर्व लडाखमधील परिस्थिती ‘सकारात्मक’ झाल्याचे सांगितले होते. सैन्य माघारीचा करार चीनला करायला भाग पाडून ‘जितं मया’चा आव मोदी सरकारने आणला होता. चिनी राष्ट्राध्यक्ष

मोदींना घाबरले

आणि त्यांनी हा करार केला अशा गमजा मोदीभक्त करीत होते. मात्र चीन हा चीनच आहे. त्याचे शेपूट वाकडेच राहणार, हे स्पष्ट आहे. गळाभेट घेतानाच गळा कापण्याचा आणि विश्वासघात करायचा या चीनच्या धोरणात कुठलाही बदल झालेला नाही. चीनच्या राष्ट्राध्यक्षांना तुम्ही साबरमती नदीच्या किनारी झुल्यावर बसवून फाफडा-जिलेबी खाऊ घातली तरी भूतानपासून अरुणाचलपर्यंत भारतीय भूभाग गिळंकृत करण्याची त्यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा जराही कमी होणार नाही. चीन आपल्याशी सैन्य माघारीच्या कराराचे नाटक करील आणि दुसरीकडे सीमांवरील भारतविरोधी उचापती सुरूच ठेवील. आताही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या ‘गळाभेटी’चे तुणतुणे मोदी सरकार वाजवीत असताना आपल्या सीमांवर चीनने 22 गावे वसविल्याचे सॅटेलाइट फोटोच प्रसिद्ध झाले आहेत. हा केवळ योगायोग नाही तर चिनी ड्रॅगनचा खरा चेहरा आहे. एकीकडे भारतीय राज्यकर्त्यांशी ‘गळाभेटी’ घ्यायच्या आणि दुसरीकडे भारताचाच ‘केसाने गळा’ कापायचा. चीन हा असाच आहे! वेळोवेळी त्याचा वाईट अनुभव आपण घेतला आहे. तेव्हा प्रश्न चिन्यांचा नाहीच, भारत-चीन संबंधात सुधारणा झाल्याच्या ‘क्लोरोफॉर्म’च्या गुंगीमध्ये असलेल्या मोदी सरकारचा आहे!