सामना अग्रलेख – हिंदूंचे जगणे कठीण झाले आहे!

मोदींमुळे जगातला हिंदू असुरक्षित व कमजोर झाला आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी देशातील घटत्या लोकसंख्या दराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भागवत यांनी कुठल्या समाजाचे थेट नाव घेतलेले नसले तरी त्यांचा अप्रत्यक्ष रोख हिंदुस्थानातील हिंदू समाजाकडेच आहे. सध्या हिंदुस्थानात स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यांचीच सत्ता आहे. तरीदेखील हीच मंडळीएक है तो सेफ हैअशा हिंदूंना भीती दाखविणाऱ्या घोषणा आणि त्यांच्याच राज्यात देशातील हिंदूअनसेफअसल्याचाकबुली जबाबदेत असतात. तेव्हा हिंदूंचा प्रजनन दर वाढल्याने हिंदुस्थानातील आणि जगातील हिंदू सुरक्षित कसा होणार, हा प्रश्नच आहे. वस्तुस्थिती ही आहे की, मोदी व त्यांच्या भाजपमुळे जगात हिंदूंचे जगणे कठीण झाले आहे, पण बोलायचे कोणी?

हिंदुत्वाच्या बाबतीत आमच्यासारखे आम्हीच. आम्ही नसू तर हिंदुत्व धोक्यात येईल, असे भारतीय जनता पक्षाचे म्हणणे आहे. नरेंद्र मोदी आहेत म्हणून जगातला हिंदू ‘सेफ’ म्हणजे सुरक्षित असल्याचे कांदेही हे लोक त्यांच्या नकटय़ा नाकाने सोलत असतात, पण बाजूच्या बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यात भाजप, मोदी व त्यांचे सरकार असमर्थ ठरले आहे. बांगलादेशातील हिंदू समाजाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. बांगलादेशात राजकीय उलथापालथ झाल्यापासून तेथील हिंदूंची मंदिरे, हिंदू वस्त्या, हिंदूंचे व्यापार, उद्योग जाळून भस्मसात केले जात आहेत. हिंदूंवर हल्ले व हत्या सुरू आहेत. बांगलादेशातील ‘इस्कॉन’ मंदिरांचे प्रमुख चिन्मय कृष्ण दास हे शांततेत निदर्शने करीत असताना त्यांना अटक करून तुरुंगात टाकले व आता चिन्मयस्वामींचे शिष्य, मंदिराचे पुजारी आदिनाथ यांनाही अटक केली. आदिनाथ यांना अटक करून तुरुंगात टाकले, पण सरकार म्हणते, कोण आदिनाथ? आम्हाला माहीत नाही. त्यांच्या अटकेबाबत आमच्याकडे माहिती नाही. याचा अर्थ, पुजारी आदिनाथ यांना गायब करण्यात आले आहे. बांगलादेशात भारताचा राष्ट्रध्वज पायदळी तुडवला गेला आहे. हिंदूंना बेकायदेशीर अटक केली जात असताना त्यांच्यासाठी कोर्टात उभे राहणाऱ्या वकिलांच्या हत्या झाल्या आहेत. हे इतके सारे घडत असताना भारतातील हिंदुत्ववादी मोदी सरकार कोठे लपून बसले आहे? पंतप्रधान मोदी, विदेश मंत्री जयशंकर यांनी बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर चकार शब्द उच्चारला नाही. हिंदुत्वावरील हे ‘दमन चक्र’ मोदी सरकार थंडपणे पाहत आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखणे यापेक्षा

महाराष्ट्रात सरकार बनविण्याचा

खेळ चालू ठेवणे त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचे दिसते. बांगलादेशात हिंदू मुले व महिलांवर होणारे अत्याचार  चिंताजनक आहेत. भारतात ‘व्होट जिहाद’, ‘कटेंगे तो बटेंगे’, ‘एक है तो सेफ है’, ‘लव्ह जिहाद’ असे खुळखुळे वाजवणाऱ्यांना शेजारच्या बांगलादेशातील हिंदूंचा आक्रोश दिसत नाही. महाराष्ट्रातील निकाल लागताच भाजपचे अनेक विजयी चिल्ले-पिल्ले व टिल्ले हे मशिदी, दर्गे अशा ठिकाणी जाऊन मन्नत पुरी झाल्याचा नवस फेडताना दिसत आहेत. त्यात हिंदूंचे टिल्ले गब्बर म्हणवून घेणारेही आहेत, मग हे लोक त्यांची शस्त्रे परजवत हिंदूंच्या रक्षणासाठी बांगलादेशात का बरे जात नाहीत? हिंदू खतऱ्यात आहे तो बांगलादेशात, नेपाळात, अफगाणिस्तानात. भारतात हिंदूंपेक्षा भाजप संकटात असल्याने ते तव्यावरील वाटाण्यासारखे ताडताड उडत आहेत. बांगलादेशातील आजचे चित्र विचलित करणारे आहे, पण नरेंद्र मोदी, फडणवीस, मिंधे वगैरे लोक त्यामुळे विचलित झाले नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक कागदी बार उडवून सांगितले की, ‘‘बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेले अत्याचार थांबवावेत आणि अटकेत असलेल्या चिन्मय दास यांची सुटका करावी.’’ पण या आवाहनाने बांगलादेशातील हिंदूविरोधी हिंसा थांबणार आहे काय? मुळात बांगलादेशात जो हिंदूविरोधी द्वेष पेटला आहे त्याची कारणे भारतातील मोदी, भाजपच्या कार्यपद्धतीत दडली आहेत. मोदी यांनी निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण केली, मुसलमानांवर हल्ले केले. अनेक ‘प्रयोग’ असे केले की, त्यामुळे जगातील मुसलमानांत मोदींच्या हिंदुत्वाविषयी नफरत निर्माण झाली. उत्तर प्रदेशात संभल, अजमेर दर्गा, ग्यानवापी मशिदीखालचे खोदकाम भारतात आगी लावत आहे, पण त्याचे चटके भारताबाहेरील हिंदूंना बसत आहेत याची भाजपच्या भंपक हिंदुत्ववाद्यांना जाणीव आहे काय? 1971 साली पूर्व पाकिस्तानात

हिंदूंवर हल्ले

झाले व निर्वासितांचे लोंढे भारतावर आदळू लागले तेव्हा मर्दानी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सरळ पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारून दोन तुकडे केले. त्यातील एक तुकडा म्हणजे बांगलादेश. मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण साफ बिघडले आहे. शेजारी राष्ट्रांशी त्यांचे संबंध ताणलेले आहेत. मोदी आल्यापासून भारताला शेजारी-पाजारी कोणी मित्र राहिलेला नाही. मोदींची धोरणे ही कचखाऊ तर आहेतच, पण जगातील हिंदूंना शरमेने मान खाली घालायला लावणारी आहेत. मोदींमुळे जगातला हिंदू असुरक्षित व कमजोर झाला आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी देशातील घटत्या लोकसंख्या दराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ‘‘जेव्हा समाजाचा प्रजनन दर 2.1 टक्क्यांच्या खाली जातो तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो. त्यामुळे लोकसंख्या प्रजनन दर 2.1 टक्क्यांच्या खाली जाता कामा नये. दोन किंवा तीन मुले जन्माला घालावीत.’’ भागवत यांनी कुठल्या समाजाचे थेट नाव घेतलेले नसले तरी त्यांचा अप्रत्यक्ष रोख हिंदुस्थानातील हिंदू समाजाकडेच आहे. देशातील हिंदूंनीच दोन किंवा तीन पोरांना जन्म द्यावा आणि लोकसंख्या वाढवून येथील हिंदू समाज सुरक्षित करावा, असेच भागवत यांना सुचवायचे आहे. सध्या हिंदुस्थानात स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यांचीच सत्ता आहे. तरीदेखील हीच मंडळी ‘एक है तो सेफ है’ अशा हिंदूंना भीती दाखविणाऱ्या घोषणा आणि त्यांच्याच राज्यात देशातील हिंदू ‘अनसेफ’ असल्याचा ‘कबुली जबाब’ देत असतात. तेव्हा हिंदूंचा प्रजनन दर वाढल्याने हिंदुस्थानातील आणि जगातील हिंदू सुरक्षित कसा होणार, हा प्रश्नच आहे. वस्तुस्थिती ही आहे की, मोदी व त्यांच्या भाजपमुळे जगात हिंदूंचे जगणे कठीण झाले आहे, पण बोलायचे कोणी?