सामना अग्रलेख – अतिवृष्टीचा फटका! शेतकरी जगवा…

गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या भयंकर अतिवृष्टीने संपूर्ण मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. जलमय झालेल्या शेतशिवारांत काढणीला आलेली व बहरलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत जमीनदोस्त झाली. या भयंकर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलायला हवीत. ‘लाडकी बहीण’ योजनेची ‘इव्हेंट’बाजी करण्यात रमलेल्या खोकेशाही सरकारने अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे दुःखही समजून घेतले पाहिजे. हवे तर तुमचे आवडते इव्हेंट करा, पण शेतकरी जगवण्यासाठी बांधावर जाऊन त्यांना आर्थिक मदत दिलीच पाहिजे!

मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे सुख निसर्गाला का बघवले जात नसेल हे कळावयास मार्ग नाही. मात्र गेल्या आठ-दहा वर्षांपासून शेतकऱ्यांना कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसतो व त्यांच्या हातातोंडाशी आलेला पिकांचा घास निसर्ग हिरावून नेतो. कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, कधी गारपीट अशा संकटांशी या दोन्ही विभागांतील शेतकऱ्यांना कायमच दोन हात करावे लागतात. आताही तेच झाले आहे. सरल्या आठवडय़ाच्या अखेरीस मराठवाड्यातील सर्व जिल्हे व विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. पाऊस इतका भयंकर होता की, अवघ्या काही तासांत सर्व नदीनाल्यांना पूर आला. अनेक गावांना पुराचा वेढा पडला. शेतांचे रूपांतर तळ्यांमध्ये झाले व शेतातील सारी पिके शेतकऱ्यांच्या डोळय़ांदेखत जमीनदोस्त झाली. काढणीला आलेल्या किंवा सोंगून ठेवलेल्या मूग, उडीद या पिकांच्या राशी एकतर वाहून गेल्या किंवा पावसात भिजून ही पिके नष्ट झाली. कापूस, सोयाबीन, हळद, मका ही शेतातील तरारून आलेली पिके यंदा चांगले उत्पन्न देणार, असे वाटत असतानाच खरिपाची ही सर्व पिके अतिवृष्टीत नष्ट होताना पाहण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली. मराठवाड्यातील दीड हजारहून अधिक गावांमध्ये पिकांचे अतोनात नुकसान झाले. दोन-तीन दिवसांतील पाऊस व पुरामुळे मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांत एकंदर 12 जणांचा मृत्यू झाला. दीडशेहून अधिक जनावरे वाहून गेली किंवा मृत्युमुखी पडली. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या अतिवृष्टीने मराठवाड्यातील सुमारे 8 ते 10 लाख हेक्टरवरील

जिरायत शेतीचे

भयंकर नुकसान केले. शिवाय सुमारे 12 हजार हेक्टरवरील केळी, डाळिंब, पेरू व इतर फळबागांचे क्षेत्र अक्षरशः नासवून टाकले. नांदेडच्या 71 मंडळांमध्ये झालेल्या अतिवृष्टीने 2 लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त केली. हिंगोली जिल्ह्यात 30 पैकी 26 मंडळांत अतिवृष्टी झाली व सुमारे अडीच लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली. परभणी जिह्यातही 50 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली व दोन लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली. लातूर जिल्ह्यात 31, धाराशिव जिल्ह्यात 16, जालना जिह्यात 29 व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 47 मंडळांमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतमालास मोठा फटका बसला. विदर्भापेक्षा मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक होता. जणू काही ढगफुटी झाली आहे, अशा पद्धतीने सुमारे 18 ते 24 तास अखंड ‘धो-धो’ पाऊस सुरू होता. शनिवारी या पावसाने मराठवाडय़ातील नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला अक्षरशः जलमय केले. यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी लातूर, बीड, धाराशीव, जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांनाही रविवारी रात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत भयंकर पावसाने झोडपून काढले. विदर्भातील यवतमाळ, वाशीम, अकोला या जिल्ह्यांनाही अतिवृष्टीचा जबर फटका बसला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसदसह 16 तालुक्यांत तर पावसाने कहरच केला. क्षणभराचीही उसंत न घेता सलग दोन दिवस पावसाने घातलेल्या राक्षसी थैमानाने शेतशिवारांतील उभी पिके तर बरबाद झालीच, पण शेकडो हेक्टरवरील शेतजमीनही या पावसाच्या पाण्याने खरवडून टाकली. पिकांच्या नुकसानीचा भुर्दंड तर शेतकऱ्यांना आहेच, पण शेती पुन्हा लागवडीयोग्य करण्यासाठीदेखील शेतकऱ्यांना

मोठा खर्च करावा

लागेल. नांदेड जिल्ह्यात गोदावरी, आसना, सीता, पैनगंगा, मांजरा, मन्याड या साऱ्याच नद्यांना पूर आला व मराठवाडा, विदर्भाचा संपर्क तुटला. परभणीत करपरा, पूर्णा व हिंगोलीत कयाधू नदीला मोठा पूर आला. नांदेडमध्ये विष्णुपुरी धरणाचे 14 दरवाजे तर उघडावे लागलेच, पण या भयंकर अतिवृष्टीमुळे लिंबोटी धरणाचे नऊ दरवाजे गेल्या 30 वर्षांत पहिल्यांदाच उघडण्याची वेळ आली. छत्रपती संभाजीनगरातील पैठणचे जायकवाडी धरणही तुडुंब भरले आहे. त्यातच आणखी एक-दोन दिवस मराठवाडा व विदर्भात मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसे झाले तर जायकवाडी धरणाचे दरवाजेही उघडावे लागतील. एकतर आधीच पैठणच्या पुढे गोदावरी नदी अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहत आहे. त्यात जायकवाडीचे दरवाजे उघडावे लागले तर पैठणपासून नांदेडपर्यंत गोदाकाठच्या सर्व गावांमध्ये गंभीर पूरस्थिती ओढवू शकते. गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या भयंकर अतिवृष्टीने संपूर्ण मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. जलमय झालेल्या शेतशिवारांत काढणीला आलेली व बहरलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळय़ांदेखत जमीनदोस्त झाली. या भयंकर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलायला हवीत. ‘लाडकी बहीण’ योजनेची ‘इव्हेंट’बाजी करण्यात रमलेल्या खोकेशाही सरकारने अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे दुःखही समजून घेतले पाहिजे. हवे तर तुमचे आवडते इव्हेंट करा, पण शेतकरी जगवण्यासाठी बांधावर जाऊन त्यांना आर्थिक मदत दिलीच पाहिजे!