देशात 80 कोटी गरीबांना फुकट धान्य द्यायचे व परदेशात जाऊन तेथील प्रमुखांना महागड्या वस्तू भेट द्यायच्या हा पंतप्रधान मोदी यांचा शौक आहे. भारतात 2023-24 मध्ये 37 लाख मुलांनी शाळा, शिक्षण सोडले. ज्यात 16 लाख मुलींचा समावेश आहे. गरिबीमुळे त्यांच्यावर शाळा सोडण्याची वेळ आली व पंतप्रधान मोदी दिल्ली विधानसभेत ‘शीशमहल’वर भाषण झोडीत आहेत. भारत देश गरीब आहे, पण गरीब देशाचा राजा विलासी आहे. पण बोलायचे कोणी? बोलेंगे तो कटेंगे!
दिल्ली विधानसभेच्या निवडणुका हा भाजप व ‘आप’साठी जीवन-मरणाचा खेळ बनला आहे. या खेळात काँगेस पक्षही स्वतःचे हुनर दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. अरविंद केजरीवाल हे एकाच वेळी भाजप आणि काँग्रेसच्या निशाण्यावर आहेत. लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि आपने एकत्र लढवली व आता विधानसभेत त्या दोघांची फ्रीस्टाईल कुस्ती लागली आहे. आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू आहे. नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचा व लुटमारीचा आरोप करावा हे आश्चर्यकारक आहे. केजरीवाल यांनी मुख्यमंत्री म्हणून काहीच केले नाही. दिल्लीच्या जनतेला सुविधा पुरवण्यात ते अपयशी ठरले, पण स्वतःसाठी सरकारी खजिना रिता करून एक ‘शीशमहल’ बांधला, त्याची किंमत 45 कोटी आहे. या ‘शीशमहल’च्या खर्चाचा लेखाजोखा पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा प्रत्येक प्रचार सभेत मांडत आहेत. केजरीवाल यांचा शासकीय बंगला व उधळपट्टी हा दिल्ली विधानसभेतील प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरला आहे. केजरीवाल यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर अवाच्या सवा खर्च केले हा टीकेचा विषय ठरू शकतो, पण दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या घरांवर गेल्या दहा वर्षांत कशी व किती उधळपट्टी झाली? मंत्र्यांनी त्यांची घरे कशी राजेशाही, मोगलाई पद्धतीने सजवली आहेत व त्यासाठी सरकारी पैसा कसा खर्ची पडला यावरही बोलायला हवे. राज्याराज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी आपले सरकारी बंगले मनाप्रमाणे सजवले आहेत. महाराष्ट्रात सगळाच मामला ‘अलग’ म्हणायला हवा. मुख्यमंत्री शिंदे यांनी एका मुख्य बंगल्यासह एकूण तीन सरकारी बंगले ताब्यात ठेवले व आता मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावरही ‘उप’ बनलेल्या शिंद्यांनी दोन बंगले ताब्यात ठेवले आहेत. फडणवीस हे ‘उप’ असताना ‘सागर’ बंगल्यासह आणखी एक मोठा
सरकारी बंगला
त्यांनी ठेवला होता. पूर्वीच्या सर्वच महान मुख्यमंत्र्यांचे एकाच बंगल्यात भागत होते. आताच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दोन-तीन बंगले लागतात. ही उधळपट्टी त्या ‘शीशमहल’ प्रकरणापेक्षा मोठी आहे. केजरीवाल यांच्या बंगल्यात सोन्याचे कमोड आहे, असेही त्यांच्या विरोधकांनी प्रसिद्ध केले. राजकीय प्रचाराचा स्तर किती खाली घसरला आहे त्याचे हे उदाहरण आहे. केजरीवाल हे 50 हजार वर्ग फुटांच्या बंगल्यात राहतात, असे श्री. अमितभाई शहा म्हणतात व ही उधळपट्टी आहे असा त्यांचा दावा आहे. यावर काय बोलायचे? इंदिरा गांधी या सफदरजंग रोड क्र. 7 वर राहत व त्यांचे हे पंतप्रधानपदाचे अधिकृत निवासस्थान साधे व सुटसुटीत होते. पंतप्रधान मोदी ज्या ‘7 लोककल्याण मार्गा’वर राहतात ते घर सात-आठ सरकारी बंगले एकत्र करून बनवले आहे. या अवाढव्य आणि हजारो वर्ग मीटर जागेत मोदी हे एकटे म्हणजे ‘सिंगल’ राहतात. मोदी यांनी आता जो सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प दिल्लीच्या बोकांडी मारला आहे, त्यात ‘पंतप्रधान मोदी’ यांच्यासाठी स्वतंत्र ‘महल’ बनवण्याचे कार्य सुरू आहे व त्यावर जनतेच्या तिजोरीतून साधारण 400 कोटी रुपये उधळले जाणार, ‘सॉरी’ खर्च केले जाणार आहेत. मोदी यांनी जगभ्रमणासाठी 15 हजार कोटींचे विमान खरेदी केले. याआधीचे पंतप्रधान एअर इंडियाच्या नियमित विमानाने प्रवास करीत, पण मोदींचा तोराच वेगळा. मोदी हे 10-15 लाखांचा सूट व त्या सुटावर तितक्याच किमतीचे ‘पेन’ खोचतात. एखादा झोलाछाप फकीर ही उधळपट्टी स्वतःच्या झोल्यातून कशी काय करू शकेल? त्यामुळे हा भार सरकारी तिजोरीवर पडला आहे. मोदींचे नवे निवासस्थान म्हणजे ‘महल’ तयार होत आहे. त्याची खरेच गरज होती काय? माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारास ‘दोन गज’ जमीन न देणारे पंतप्रधान व त्यांचे सरकार स्वतःचे ‘महल’ उभारण्यासाठी सरकारी तिजोरी आणि जमिनीची लूट करीत आहेत, पण
टीका मात्र केजरीवाल
यांच्या सरकारी बंगल्यावर करीत आहेत. मोदी नावाचे फकीर स्वतःसाठी कपड्यांपासून चष्मा, पेन, घड्याळ, चपला या ‘ब्रॅण्डेड’ वस्तू वापरतात. हा त्यांचा ‘शौक’ आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी मोदींचे ‘शौक’ व उधळपट्टी यावर प्रखर टिपणी केली आहे. श्रीमती श्रीनेत सांगतात, मोदींनी देशाच्या तिजोरीवर अक्षरशः डल्लाच मारला. 2023 मध्ये मोदीसाहेबांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेनच्या पत्नी जिल बायडेन यांना 7.5 कॅरेटचा महागडा हिरा भेट दिला. त्याची किंमत 20 हजार डॉलर होती. भारतीय रुपयांत 18 लाख रुपये. जिल बायडेन यांना मिळालेल्या भेटीत मोदींनी दिलेली भेट सगळय़ात महागडी होती. बुनेईच्या सुलतानानेही इतकी महागडी भेट ‘जिल’ मॅडमना दिली नव्हती. त्याआधी ट्रम्प कुटुंबासही मोदी यांनी 50 हजार डॉलर्सच्या भेटी दिल्या. म्हणजे भारतीय रुपयांत साधारण 45 लाख. त्यात इवांकासाठी मनगटी सोन्याचे कडे, सात लाख रुपयांचे फुलपात्र, चार लाखांचा नक्षीदार ताजमहल, दीड लाखाच्या कफलिंक्सचा समावेश होता. हा पैसा भाजपच्या किंवा आरएसएसच्या तिजोरीतून खर्च झाला नव्हता, तर भारतीय जनतेची पिळवणूक करून गोळा केलेला कर तसेच जीएसटीच्या माध्यमातून जमा झालेल्या आणि कष्टकऱ्यांच्या घामाच्या पैशांतून हे ‘शौक’ पूर्ण केले. इतक्या महागड्या भेटी देणारे मोदी हे गेल्या 70 वर्षांतले एकमेव पंतप्रधान आहेत. देशात 80 कोटी गरीबांना फुकट धान्य द्यायचे व परदेशात जाऊन तेथील प्रमुखांना महागड्या वस्तू भेट द्यायच्या हा पंतप्रधान मोदी यांचा शौक आहे. भारतात 2023-24 मध्ये 37 लाख मुलांनी शाळा, शिक्षण सोडले. ज्यात 16 लाख मुलींचा समावेश आहे. गरिबीमुळे त्यांच्यावर शाळा सोडण्याची वेळ आली व पंतप्रधान मोदी दिल्ली विधानसभेत ‘शीशमहल’वर भाषण झोडीत आहेत. भारत देश गरीब आहे, पण गरीब देशाचा राजा विलासी आहे. पण बोलायचे कोणी? बोलेंगे तो कटेंगे!