सामना अग्रलेख – शक्ती दे गणनायका… विघ्न कायमचे जावो!

एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे बदलापूरसारख्या अत्याचार, अनाचाराच्या घटनांनी महाराष्ट्र गांजला आहे. गणेशोत्सवात या ज्वलंत विषयांवर गणेश मंडळांनी जागर घडवायला हवा. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोनेक महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील विघ्न घालवण्याची नामी संधी थोडक्यात हुकली. तथापि, महाराष्ट्रावर आलेले गद्दारीचे संकट व खोकेशाहीतून आलेले मिंधे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रजेला पुन्हा एकदा एकजुटीने कंबर कसावीच लागेल. गणनायका, महाराष्ट्रावरील हे विघ्न घालवण्यासाठी मराठी माणसाला शौर्य दे, तेज दे, शक्ती दे…!

विघ्नहर्त्या गणरायाचा, महाराष्ट्राच्या सर्वात लाडक्या दैवताचा उत्सव आजपासून सुरू होत आहे. घरादारांवर पिंवा पुटुंबावरच नव्हे, तर पृथ्वीतलावर आलेल्या पुठल्याही विघ्नाचे हरण करणारी देवता म्हणून मराठी माणसाला इतर पुठल्याही देवतांपेक्षा विघ्नहर्त्या गणरायाचा अंमळ अधिकच लळा आहे. संकटकाळात रक्षण करण्यासाठी धावा केला जातो तो गणरायाचाच. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव काहीसा खासच आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, वाडी-तांड्यांपासून शहरांपर्यंत, एवढेच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱयात जिथे पुठे मराठी माणूस असेल त्या प्रत्येक घरात आज गणरायाचे आगमन होईल. मराठी जनामनांत उत्साहाचे उधाण आणणारा गणेशोत्सव म्हणजे चैतन्य व मांगल्याचाच उत्सव. घरोघरी पारंपरिक पद्धतीने आकर्षक सजावट व आरास करून श्री गणेशास विधिवत स्थानापन्न केले जाईल. त्यापाठोपाठ ढोलताशांचा गजर आणि वाजतगाजत, धूमधडाक्यात सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तीही मिरवणुकीने केंडॉलमध्ये आणून श्रद्धापूर्वक विराजमान केल्या जातील. गणरायाच्या स्थापनेसाठी आठ-पंधरा दिवसांपासून सुरू असलेली पूर्वतयारी, उत्साहाने सुरू असलेली लगबग गणरायाच्या आगमनानंतर थांबेल आणि लगेचच देखावे व इतर उपक्रमांच्या तयारीसाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होईल. घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांच्या मंडपांमध्ये गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर 17 सप्टेंबरपर्यंत म्हणजे 11 दिवस गणपती बाप्पा आपल्या

भक्तांच्या कोडकौतुकाचा

स्वीकार करतील. श्री गणेशाच्या आगमनाबरोबरच गौरींच्या स्वागताचीही धांदल सुरू झाली आहे. बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. शुद्धतेने भारावलेल्या या वातावरणात सर्वत्रच पुढील 11 दिवस हर्षोल्हास आणि चैतन्याचा संचार सुरू राहील. विद्येची, बुद्धीची, ज्ञानाची देवता व चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून श्रीगणेशाचे अनन्यसाधारण महत्त्व तर आहेच; पण दुःख दूर करणारा, संकटांपासून वाचवणारा, अरिष्ट दूर करणारा विघ्नहर्ता म्हणून भक्तांच्या मनात गणरायाचे म्हणून एक अढळ स्थान आहे. त्यामुळे देशातील व महाराष्ट्रातील शासनकर्त्यांनी जी संकटे महाराष्ट्रासमोर, देशासमोर व जनतेसमोर निर्माण करून ठेवली ती दूर करायची तर गणरायालाच प्रार्थना करावी लागेल. देशाची संपूर्ण संपत्ती निवडक दोन-चार लोकांच्या हातात केंद्रित होत आहे. त्याच त्या श्रीमंतांच्या घरांवर सोन्याची कौले चढवली जात आहेत आणि 80 कोटी गरीबांना मोफत धान्य वाटप करून त्यांच्यावर मोठेच उपकार करीत असल्याचे सरकारकडून भासवले जात आहे. बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. शेतकऱयांपासून विद्यार्थ्यांपर्यंत आत्महत्यांचे जागतिक विक्रम देशात व महाराष्ट्रात नोंदवले जात आहेत. लोकशाहीचे पुनः पुन्हा मुडदे पाडून राज्यातील सरकारे उलथवली जात आहेत. ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ ही घोषणा हवेत विरली आहे व खाण्यासाठी पुप्रसिद्ध ठरवलेल्या भ्रष्टाचाराच्या तमाम प्रतीकांना सत्तापक्षात आणून सत्ताधारी मानाचे पान देत आहेत. कपट, विश्वासघात, कारस्थाने, गद्दारी, खोके, ब्लॅकमेलिंग

या शब्दांना सोन्याचे दिवस

आले आहेत. पूर्वी पाकिस्तान हा एकच शत्रू देशाच्या वाईटावर टपला होता. मात्र आता चीननेही घुसखोरी करून हिंदुस्थानच्या मोठ्या भूभागाचा लचका तोडला आहे. 370 हटल्यानंतरही जम्मू-कश्मीरात दहशतवाद्यांचे थैमान व रक्तरंजित हत्याकांडे सुरूच आहेत. संकटे अनेक आहेत. मागच्या आठवडय़ात अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात लाखो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. पावसाच्या हाहाकारात शेतकरी बरबाद झाले तरी खोक्यांच्या जोरावर महाराष्ट्रात राजकीय गद्दारीचे पीक मात्र जोमात आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून मराठी तरुणांच्या नोकऱयांवर दरोडे घातले जात आहेत. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीतच भ्रष्टाचाराची माती खाल्ली जात आहे. कोट्यवधींच्या भ्रष्टाचारामुळे छत्रपतींचा सिंधुदुर्गातील राजकोटवरील पुतळा कोसळला, छिन्नविच्छिन्न झाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या राजाची विटंबना उघडय़ा डोळय़ांनी बघावी लागली. एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे बदलापूरसारख्या अत्याचार, अनाचाराच्या घटनांनी महाराष्ट्र गांजला आहे. गणेशोत्सवात या ज्वलंत विषयांवर गणेश मंडळांनी जागर घडवायला हवा. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोनेक महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील विघ्न घालवण्याची नामी संधी थोडक्यात हुकली. तथापि, महाराष्ट्रावर आलेले गद्दारीचे संकट व खोकेशाहीतून आलेले मिंधे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रजेला पुन्हा एकदा एकजुटीने कंबर कसावीच लागेल. गणनायका, महाराष्ट्रावरील हे विघ्न घालवण्यासाठी मराठी माणसाला शौर्य दे, तेज दे, शक्ती दे…!