
आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून राज्याची तिजोरी पोखरण्याचे काम शिंदे यांनी पोसलेल्या खेकड्यांनी केले. हाच पैसा पुढे विधानसभा निवडणुकीत आला व मतदारांना घरटी पाच–दहा हजार पाठवून मते विकत घेण्यात आली. भ्रष्टाचाराच्या पैशांवर कोणी निवडणुका लढवल्या तर कुणाची पोरेटोरे खास विमानाने मौजमजेसाठी ‘बँकॉक’ला रवाना झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता तानाजी सावंत यांच्या आरोग्य मंत्रीपदाच्या काळातील 3 हजार 190 कोटींच्या एका कंत्राटास स्थगिती दिली आहे, परंतु हे हिमनगाचे एक टोक आहे. आरोग्य विभागाचा सडका कारभार म्हणजे महाराष्ट्राला लांच्छन आहे. मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्या पावलाखाली गरीबांची औषधे चोरणारे चिरडून जावोत!
मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी उपमुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या लोकांचे जिणे हराम करायचेच ठरवलेले दिसते. शिंदे यांच्या अमृत काळात झालेल्या भ्रष्ट व्यवहारांना स्थगिती देण्याचा सपाटा मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. त्यात तानाजी सावंत यांच्या आरोग्य मंत्रीपदाच्या काळात झालेल्या टेंडरबाजीचाही समावेश आहे. तानाजी सावंत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या साफसफाईसाठी दिलेल्या 3 हजार 190 कोटींच्या कंत्राटाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने तानाजी सावंत यांच्यावरच विशेष विमानाने बँकॉक येथे पळून जाण्याची वेळ आली आहे. तानाजी सावंत यांचे चिरंजीव महिनाभरापूर्वी 70 लाख रुपये खर्च करून ‘खास’ विमानाने मौजमजेसाठी बँकॉकला निघाले होते. त्यांचे विमान बापाच्या दबावाने जमिनीवर उतरवले गेले, पण 70 लाख खर्च करून माजी मंत्र्याचा पोरगा खास विमानाने ‘बँकॉक’ला जातो. पुन्हा बँकॉकचा खर्च वेगळा. हा इतका पैसा येतो कोठून? याचे उत्तर मुख्यमंत्री देवाभाऊंनी आता देऊन टाकले. तानाजी सावंत हे आरोग्य मंत्री असताना सार्वजनिक आरोग्य विभागात घोटाळेच घोटाळे करून तुंबड्या भरल्या व त्या लुटीचा पैसा घरी नेला हे स्पष्ट दिसते. श्री. फडणवीस यांनी आरोग्य खात्यातील घोटाळ्यांची आता चौकशीच लावली. तानाजी सावंत यांनी नियमबाह्य पद्धतीने हे टेंडर दिले. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी पुण्यातील एका कंपनीला वार्षिक 638 कोटी रुपयांचे काम दिले गेले. हे देताना या कामासाठीचे आधीचे दर वाढवून घेतले गेले. आधी वार्षिक 70-80 कोटींमध्ये होणाऱ्या या साफसफाईसाठी त्यामुळे एक वर्षाला
तब्बल 638 कोटी रुपये
सरकारी तिजोरीतून मोजले गेले. या कंपनीशी तानाजी सावंत यांचे लागेबांधे असल्याचे समोर आले. सहा वर्षांसाठी हे कंत्राट 3 हजार 190 कोटी रुपयांना देण्यात आले व हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. 3 हजार 190 कोटी रुपयांतील किती कोटी स्वतः तत्कालीन आरोग्य मंत्र्यांना मिळाले व किती टक्के त्यांच्या राजकीय मालकांच्या खजिन्यात जमा झाले? याचाही तपास व्हायला हवा. शिंदे हे फडणवीस – 1 सरकारमध्ये काही काळ आरोग्य मंत्री होते व स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आपल्या तानाजीला आरोग्य मंत्री केले. त्या दोघांनी मिळून राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढले. औषध खरेदीत घोटाळा झाला, पण वैद्यकीय उपकरणांपासून अॅम्ब्युलन्स सेवेपर्यंत सर्वत्र खाऊबाजीच सुरू झाली. शिंदे यांचे चिरंजीव व त्यांची एक टोळी वैद्यकीय मदत केंद्र चालवीत होती आणि त्यांच्याच माध्यमातून आरोग्य सेवेतले सर्व आर्थिक व्यवहार झाले. त्यामुळे या आरोग्य घोटाळ्याचे सूत्रधार हे तानाजी सावंत असले तरी घोटाळ्याचे लाभार्थी तेव्हा ‘वर्षा’ बंगल्यावर होते. राज्यातील वैद्यकीय अधिकारी, सिव्हिल सर्जनच्या बदल्या-बढत्या व नेमणुकांत सरळ सरळ कोट्यवधींची उलाढाल झाली. महाराष्ट्रातील एकूण 1200 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ‘समावेशन’ करण्यासाठी प्रत्येकी चार ते पाच लाख रुपये घेऊन कोट्यवधी रुपये गोळा केले गेले. महात्मा जोतिराव फुले योजना लागू करण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून प्रति बेड एक लाख रुपये घेतले गेले व आजही ते सुरू आहे. या योजनेतील बोगस लाभार्थींची भरमसाट खोटी बिले मंजूर करून कोट्यवधी रुपये आरोग्य मंत्र्यांपर्यंत पोहोचविली जात आहेत. आदिवासी पाड्यांवर आरोग्य सुविधा नाहीत. गरोदर महिलांना
चादरी व घोंगडीचा पाळणा
करून तालुक्याच्या ठिकाणी न्यावे लागते. त्या प्रवासात त्या महिलांची वाटेतच प्रसूती होते. त्यात बाळ आणि बाळंतिणीच्या जिवावर बेतते. विदर्भात लहान मुलांची प्रेते खांद्यावर टाकून घराकडे जातानाचे आई-बापाचे चित्र सरकारला विचलित करू शकले नाही. मृतदेहांना घेऊन जाण्यास अॅम्ब्युलन्स उपलब्ध नाहीत, पण अॅम्ब्युलन्स खरेदीच्या नावाखाली महाराष्ट्रात 10 हजार कोटींचा घोटाळा झाला. सुमित फॅसिलिटीज या कंपनीशी शिंदे पुत्राचे साटेलोटे असल्याने याच कंपनीला ‘टेंडर’ मिळावे असा दबाव आला व मूळ 800 कोटींचे हे टेंडर 10 हजार कोटींपर्यंत वाढवून महाराष्ट्राच्या तिजोरीची लूट केली. या व्यवहारात किमान सहा हजार कोटींची कमिशनबाजी झाली ती कुणाच्या घशात गेली? आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून राज्याची तिजोरी पोखरण्याचे काम शिंदे यांनी पोसलेल्या खेकड्यांनी केले. हाच पैसा पुढे विधानसभा निवडणुकीत आला व मतदारांना घरटी पाच-दहा हजार पाठवून मते विकत घेण्यात आली. या भ्रष्टाचारामुळे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले. अनेक गरीबांना औषधोपचार मिळाले नाहीत. रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी तडफडून प्राण सोडले असतील, पण भ्रष्टाचाराच्या पैशांवर कोणी निवडणुका लढवल्या तर कुणाची पोरेटोरे खास विमानाने मौजमजेसाठी ‘बँकॉक’ला रवाना झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता तानाजी सावंत यांच्या आरोग्य मंत्रीपदाच्या काळातील 3 हजार 190 कोटींच्या एका कंत्राटास स्थगिती दिली आहे, परंतु हे हिमनगाचे एक टोक आहे. आरोग्य विभागाचा सडका कारभार म्हणजे महाराष्ट्राला लांच्छन आहे. मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्या पावलाखाली गरीबांची औषधे चोरणारे चिरडून जावोत!