सामना अग्रलेख – पंतप्रधान कुंभात! प्रे. ट्रम्प यांची पोटावर लाथ

धर्माचे काम साधू, संत श्रद्धाळूंनी करावे राजकारण्यांनी राज्य चालवावे हे पथ्य पाळले जात नाही. त्यामुळेच देशाचा विकास थांबला आहे. अमेरिकेतून साडेसात लाख भारतीयांना परत पाठवले जात आहे. ते त्यांची कुटुंबे आता जगण्यासाठी काय करणार? अमृतकालात उपासमार बेरोजगारीने त्रस्त झाले म्हणून हे लोक अमेरिकेत गेले. तेथेही प्रे. ट्रम्प यांनी पोटावर लाथ मारली. मोदीट्रम्प भेटीत हा पोटाचा प्रश्न सुटतो काय ते पाहू!

पंतप्रधान मोदी यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधी सोहळ्यासाठी बोलावले नाही हे वाईटच झाले. मोदी यांच्याशिवाय आपले काहीच अडत नाही हे दाखविण्याचा हा ट्रम्प यांचा प्रयत्न होता. राष्ट्राध्यक्ष म्हणून ‘व्हाईट हाऊस’मध्ये विराजमान होताच ट्रम्प यांनी भारताला धक्का देण्याचा निर्णय घेतला व अमेरिकेत बेकायदा घुसलेल्या साधारण साडेसात लाख भारतीयांना परत पाठविण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला. नुसता निर्णय घेऊन ते थांबले नाहीत, तर 205 भारतीय घुसखोरांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान भारताकडे झेपावले आणि अमृतसर विमानतळावर उतरले. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी महाकुंभात पुण्य पदरी पाडून घेण्यासाठी गंगेत डुबकी मारली त्या वेळी साडेसात लाख घुसखोरांपैकी 205 भारतीय अमेरिकेच्या विमानाने अमृतसरला उतरवले गेले. ही आफत फक्त भारतीयांवरच नाही, तर अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या इतर देशांच्या नागरिकांवरदेखील आलेली आहे व अशा पद्धतीने अमेरिका ‘घुसखोर’मुक्त करण्याच्या मोहिमेची सुरुवात ट्रम्प यांनी केली. एकट्या टेक्सास प्रांतातून 205 भारतीय घुसखोर आढळले. ते कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांशिवाय अमेरिकेत राहत होते. या साडेसात लाख भारतीयांचे भविष्य काय, हा प्रश्नच आहे. भारतात अमृतकाल सुरू असतानाही पोटापाण्याच्या शोधात हे सर्व लोक अमेरिकेत घुसले हे सत्य आहे. पोटातली आग आणि बेरोजगारी माणसाला अपराधाच्या मार्गावर ढकलते. या भारतीयांनी अमेरिकेचा मार्ग निवडला. अमेरिकेच्या कडक बंदोबस्ताच्या हवाई, जमिनी, समुद्री सीमा पार करून हे लोक तेथे पोहोचले व गुजराण करीत राहिले. त्यांचे भविष्य आता अंधकारमय झाले. यातले कोणी शीख असावेत, कोणी हिंदू असावेत. भारतीय जनता पक्षाला आता असे का वाटू नये की, प्रे. ट्रम्प यांनी भारतीय

हिंदूंवर आघात

केला आहे. त्यांच्या पोटावर लाथ मारली आहे. भारतातून अद्यापि एकही बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोर, रोहिंगे आपण परत पाठवू शकलो नाही. निवडणुका अवतरल्या की, मुंबई ते दिल्ली बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा भाजपचे लोक खेळवत बसतात. प्रत्यक्षात कृतीच्या नावाने बोंब. म्हणून प्रे. ट्रम्प यांनी घुसखोर भारतीयांवर केलेल्या कारवाईचे अवलोकन करायला हवे. अमेरिकेत जाऊन स्थायिक होणे, त्या देशाचे नागरिकत्व मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते, पण ट्रम्प यांनी आदेश दिले आहेत की, आता जन्माच्या आधारावर अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही. म्हणजे अशी प्रथा पडली होती की, अनेक गरोदर महिला बाळंतपणासाठी अमेरिकेत आपल्या नात्यागोत्यात जात व तेथेच मुलांना जन्म दिला की, तो मुलगा ‘वंश’परंपरेने तेथील कायदेशीर नागरिक बनत असे. ट्रम्प यांनी हा उद्योग बंद केल्यामुळे अनेक मातापित्यांचे आपल्या मुलांना जन्मतःच अमेरिकन नागरिकत्व बहाल करण्याचे स्वप्न भंगले. ट्रम्प यांनी आल्या आल्या काही कठोर निर्णय घेतले आहेत. मेक्सिको, कॅनडा, काही युरोपियन राष्ट्रांच्या उत्पादनांवर ट्रम्प यांनी आयात शुल्क लावले. अशा प्रकारचे भारी शुल्क भारतावरही लादण्याचा ट्रम्प महाशय गांभीर्याने विचार करीत आहेत व त्यामुळे भारतीय उद्योग जगतात चिंतेचे वातावरण आहे. अर्थात पंतप्रधानांच्या गंगास्नानानंतर

हे सर्व प्रश्न

चुटकीसरशी सुटतील याविषयी भक्तांच्या मनात शंका नाही. ट्रम्प यांनी मोदी यांना शपथविधीसाठी बोलावले नाही व आता त्यांनी भारतीय घुसखोरांना बाहेर काढले आहे. मात्र मोदी हे ट्रम्प यांना भेटण्यासाठी अमेरिकेला निघाले आहेत, पण मोदींची वाट न पाहता ट्रम्प यांनी भारतीयांना अमेरिकेबाहेर फेकले. ही भारताची अमृतकालातील प्रतिष्ठा आहे. महासत्ता व राष्ट्राचा दरारा म्हणजे काय ते थोडेफार चीनकडूनही शिकावे लागेल. चिनी उत्पादनांवर ट्रम्पकडून आयात कर लादण्याचा निर्णय होताच चीननेही जशास तसे उत्तर दिले. अमेरिकी उत्पादनांवर आयात कर लादण्याचा निर्णय जाहीर करून चीन थांबला नाही, तर गुगल कंपनीची चौकशी करण्याची घोषणा केली. त्यामुळे अमेरिकेचे धाबे दणाणले. भारतात मात्र अमेरिकेचा बोटचेपेपणा चालला आहे. मोदी-ट्रम्प भेट होईल व भारतीय उत्पादनांवर आयात कर लादण्याचा निर्णय ट्रम्प घेणार नाहीत असे काही लोकांना वाटते, पण त्यासाठी ट्रम्प मोदींकडून फार मोठी व्यापारी सवलत आणि किंमत वसूल करतील, अमेरिकेची संरक्षण उत्पादने भारताच्या गळ्यात मारतील हे मात्र नक्की. अमेरिका एका बाजूला बेकायदा घुसखोरांना परत पाठवीत आहे, तर त्याच वेळी नागरिकत्वाचे नियम कडक करीत आहे. भारतात मात्र पंतप्रधान व त्यांचे सरकार महाकुंभात अडकून पडले. ज्ञान, विज्ञान, संशोधनाचा मार्ग सुटल्याचे हे लक्षण आहे. धर्माचे काम साधू, संत व श्रद्धाळूंनी करावे व राजकारण्यांनी राज्य चालवावे. हे पथ्य पाळले जात नाही. त्यामुळेच देशाचा विकास थांबला आहे. अमेरिकेतून साडेसात लाख भारतीयांना परत पाठवले जात आहे. ते व त्यांची कुटुंबे आता जगण्यासाठी काय करणार? अमृतकालात उपासमार व बेरोजगारीने त्रस्त झाले म्हणून हे लोक अमेरिकेत गेले. तेथेही प्रे. ट्रम्प यांनी पोटावर लाथ मारली. मोदी-ट्रम्प भेटीत हा पोटाचा प्रश्न सुटतो काय ते पाहू!