
गाझापट्टी, युक्रेन येथे रोज शेकडो निरपराध मारले जात आहेत. तेथील जनता वाचेल काय? असा प्रश्न पडावा एवढी त्या ठिकाणची परिस्थिती भीषण बनली आहे. भारतातील मणिपुरात हिंसेचा आगडोंब विझता विझत नाही. अनेक बालके निराधार होऊन निर्वासित छावण्यांत जगत आहेत. त्यांची चिंता ना मोदींना ना ट्रम्प, बायडेनला; पण ट्रम्प यांच्या कानाखालून वाहणाऱ्या रक्ताच्या चार थेंबांनी सगळय़ांचाच श्वास गुदमरला. चिंता आणि वेदनेतही विषमता आहे ती अशी. ट्रम्प यांना दीर्घायुष्य लाभो, पण मणिपूर, गाझा, युक्रेनमधील लोकांनाही जगण्याचा हक्क लाभो!
डोनाल्ड ट्रम्प हे प्राणघातक हल्ल्यातून बचावले आहेत. ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाला, पण मारेकऱ्याचा नेम चुकला. गोळी ट्रम्प यांच्या कानास चाटून गेली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर अशा पद्धतीने रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तेथील रणमैदान तापले आहे. त्या तापलेल्या वातावरणात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांच्यावर गोळीबार होणे हे बरे नाही. अमेरिकेतील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे अशा प्रकारे जगाच्या वेशीवर आली. जगातील अनेक देशांतील फौजदारकीची जबाबदारी अमेरिका घेत असते. इराक, अफगाणिस्तान, लिबिया या देशांतील सरकारे कायदा-सुव्यवस्था नाही या सबबीखाली उलथवून तेथील राष्ट्रप्रमुखांचे बळी घेण्यात आले, पण अमेरिकेच्या दिव्याखाली मात्र अंधार आहे. याआधी जॉन एफ. केनडी या उमद्या राष्ट्राध्यक्षाची हत्या करण्यात आली होती. केनडी यांची हत्या हे आजही एक रहस्यच आहे. माजी राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांच्यावरही वॉशिंग्टनच्या भररस्त्यावर गोळय़ा चालविण्यात आल्या. आता माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना ठार करण्याचा प्रयत्न झाला. 81 वर्षांचे ट्रम्प थोडक्यात बचावले. मारेकऱ्याचा नेम बरोबर होता. ट्रम्प यांची मान वळली व गोळी कानास चाटून गेली. रक्ताचे ओघळ आलेला गोरापान चेहरा हेच ट्रम्प यांच्या प्रचाराचे पोस्टर झाले आहे. अमेरिकेत बेरोजगारी, अंमली पदार्थ, गुन्हेगारी टोळय़ा यामुळे
लोकांचे जीवन भयग्रस्त
बनले आहे. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी, खासकरून शाळा व सार्वजनिक ठिकाणी अंदाधुंद गोळीबारात अनेकांनी प्राण गमावले, पण ट्रम्प हे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत व ते उद्याच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतले उमेदवार आहेत. त्यांना सिक्रेट सर्व्हिसची खास सुरक्षा व्यवस्था आहे. अशा वेळेला एक मारेकरी ट्रम्प यांच्यावर भरसभेत गोळय़ा चालवतो हे धक्कादायक आहे. सिक्रेट सर्व्हिसच्या लोकांनी ट्रम्प यांच्यावर गोळय़ा चालवणाऱ्या तरुणाला जागीच गोळय़ा घालून ठार केले. त्यामुळे अनेक गोष्टी अंधारातच राहिल्या. ट्रम्प हे एक नाटकी गृहस्थ आहेत. या घटनेचे पुरेपूर भांडवल ते करू लागले आहेत. ट्रम्प हे मोदी यांचे मित्र असल्याने त्यांच्याकडून वेगळी अशी काय अपेक्षा करणार? ट्रम्प म्हणतात, ‘‘पेनसिल्वानियातील प्रचार सभेत झालेला हत्येचा प्रयत्न हा वास्तवातील वाटणार नाही असाच अनुभव होता. त्या वेळी माझा मृत्यू निश्चित होता. केवळ नशिबाने किंवा देवानेच मला वाचवले.’’ ट्रम्प हे पुढे सांगतात, ‘‘सगळय़ात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी नेमक्या वेळी पुरेसा वळलो. अन्यथा कानाला लागून गेलेल्या गोळीने माझा जीव घेतला असता.’’ ट्रम्प हे बचावले हे त्यांचे भाग्यच म्हणायला हवे. याकामी त्यांचे नक्की कोणते पुण्य कामी आले ते अमेरिकेच्या जनतेलाच माहीत, पण ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी केलेली झुंडशाही व त्यांच्या जीवनातील इतर उपद्व्याप हे काही पुण्यकर्मात मोडणारे नाहीत. ट्रम्प निवडणूक हरले व बायडेन जिंकले तेव्हा हे महाशय लोकमताचा आदर करून सहजासहजी सत्ता सोडायला तयार नव्हते. उलट आपल्या समर्थकांच्या
हिंसक झुंड टोळय़ा
व्हाईट हाऊसमध्ये घुसवून त्यांनी दंगल घडवली होती. ट्रम्प यांचा स्वभाव हा असा आहे. ट्रम्प यांच्यावर अनेक आरोप व गुन्हे आहेत व मधल्या काळात त्यांना अटकही झाली होती. तरीही ते पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले व ट्रम्प हेच जिंकतील असा माहोल आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. या संकट काळात एकजूट राखावी. सध्याची वेळ राजकीय वाद बाजूला ठेवण्याची आहे, असे बायडेन यांनी सांगितले. मोदी यांना ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. मोदी व ट्रम्प म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मोदी यांना दुःख झाले आहे व त्यांनी ते व्यक्त केले. राजकारण व लोकशाहीत सूड आणि हिंसेला थारा नाही, असे मोदी यांचे म्हणणे आहे, पण भारतात त्यांचे धोरण नेमके उलटे आहे. हिंसेला कोठेच थारा असू नये. गाझापट्टी, युक्रेन येथे रोज शेकडो निरपराध मारले जात आहेत. तेथील जनता वाचेल काय? असा प्रश्न पडावा एवढी त्या ठिकाणची परिस्थिती भीषण बनली आहे. भारतातील मणिपुरात हिंसेचा आगडोंब विझता विझत नाही. अनेक बालके निराधार होऊन निर्वासित छावण्यांत जगत आहेत. त्यांची चिंता ना मोदींना ना ट्रम्प, बायडेनला; पण ट्रम्प यांच्या कानाखालून वाहणाऱ्या रक्ताच्या चार थेंबांनी सगळय़ांचाच श्वास गुदमरला. चिंता आणि वेदनेतही विषमता आहे ती अशी. ट्रम्प यांना दीर्घायुष्य लाभो, पण मणिपूर, गाझा, युक्रेनमधील लोकांनाही जगण्याचा हक्क लाभो!