
ट्रम्प यांच्या दुसऱ्या राजवटीमुळे भारतीय उद्योग आणि अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’ येतील, बायडेन यांच्यापेक्षा ट्रम्प भारतासाठी ‘उजवे’ आहेत, अशा भाकडकथा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोदीभक्तांनी रंगवून सांगितल्या होत्या. मात्र निवडून आल्यानंतर हेच ट्रम्प एका पाठोपाठ एक हिंदुस्थानविरोधी निर्णय घेत या कथांचा रंग खरडून काढत आहेत. ‘टॅरिफ’चा वरवंटा भारतावरही फिरविण्यात त्यांनी कुठलेही ‘डावे–उजवे’ केले नाही. स्वतःला ट्रम्प यांचे परममित्र वगैरे म्हणवून घेणारे आपले पंतप्रधान मोदी आता काय करणार आहेत? ते काय करतील ते करतील, परंतु ट्रम्प यांच्या निर्णयांनी मोदींच्या चाणक्यनीतीचा आणि ट्रम्प मैत्रीचा फुगा फुटला आहे हे मात्र निश्चित.
भारताकडे संपूर्ण जग एक विश्वासू भागीदार म्हणून पाहत आहे. त्यामुळे देशातील उद्योग क्षेत्राने या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी केले, परंतु त्यांचेच परममित्र प्रे. ट्रम्प यांनी मात्र मोदींच्या या विश्वासालाच तडाखा दिला आहे. ट्रम्प महाशयांनी आयात शुल्क लादण्याची त्यांची धमकी अखेर खरी केली आहे. त्यामुळे ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ म्हणजे ‘जशास तसा’ कर लागू झाला आहे. या 25 टक्के आयात शुल्काचा फटका चीन, कॅनडा, मेक्सिको आदी देशांसह भारतालाही बसला आहे. चीन, कॅनडा आणि मेक्सिकोने प्रत्युत्तर म्हणून अमेरिकी मालावर परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयावर त्यांचे ‘मित्र’ मोदी आता काय बोलणार आहेत? ट्रम्प हे अमेरिकेचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर मोदी यांनी लगेचच अमेरिका दौरा केला होता. ट्रम्प यांच्या गळाभेटी घेतल्या होत्या. दोघांनीही ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ करीत आपल्या मैत्रीची ग्वाही दिली होती. भारतातील मोदीभक्तांनीही ट्रम्प यांच्या एककल्ली कारभाराचा फटका मोदींमुळे भारताला कसा बसणार नाही, मोदींची चाणक्यनीती कशी यशस्वी ठरली वगैरे फुगे हवेत सोडले होते. मात्र मोदींचे विमान अमेरिकेतून उडाल्यापासूनच ट्रम्प महाशय मोदीभक्तांनी उडविलेले हे
फुगे फोडत
आहेत. आयात शुल्क म्हणजे ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ लागू करण्याचा ट्रम्प यांचा ताजा निर्णय भारतासाठी मोठा धक्का आहे. कारण अमेरिका हा भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या निर्णयाचा भारतीय उद्योगावर व्यापक दुष्परिणाम होणार आहे. प्रामुख्याने आयटी, औषधे, ऑटोमोबाईल यांसह स्टील आणि ऍल्युमिनियम तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रांना ट्रम्प यांच्या या ‘टॅरिफराज’चा जबर तडाखा बसणार आहे. आधीच ट्रम्प यांनी व्हिसाचे नियम कठोर केले आहेत. त्यामुळे भारतीय आयटी उद्योगासमोर अनेक अडचणी उभ्या आहेत. त्यात आता आयात शुल्क वाढीची भर पडेल. भारतीय औषध कंपन्यांकडून अमेरिकेला सर्वाधिक जेनेरिक औषधांचा पुरवठा होत असतो. या निर्णयामुळे त्यांच्या निर्यातीवर परिणाम होईल. भारतीय वाहन उद्योग आधीच मंदीसदृश स्थितीला तोंड देत आहे. त्यात ‘ट्रम्प टॅरिफ’मुळे परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. भारतीय कापड आणि वस्त्र उद्योगही अमेरिकेला मोठ्या प्रमाणात निर्यात करीत असतो. त्यालाही आयात शुल्कामुळे ब्रेक लागणार आहे. ट्रम्प महाशयांच्या
पहिल्या राजवटीत
भारतीय पोलाद उद्योगाला त्यांच्या अशाच धोरणाचा फटका बसला होता. आता त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्येही याच पद्धतीने या उद्योगाला तडाखा सहन करावा लागणार आहे. ट्रम्प त्यांच्या आर्थिक निर्णयांना देशहिताचा मुलामा देत आहेत. अमेरिकन उद्योग क्षेत्राला त्यामुळे चालना मिळेल असे गणित मांडत आहेत. त्यांचे हे गणित सुटते की फसते, हे भविष्यातच समजेल, पण भारतासारख्या देशाची आर्थिक समीकरणे त्यामुळे बिघडत आहेत, त्याचे काय? ट्रम्प यांच्या दुसऱ्या राजवटीमुळे भारतीय उद्योग आणि अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’ येतील, बायडेन यांच्यापेक्षा ट्रम्प भारतासाठी ‘उजवे’ आहेत, अशा भाकडकथा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोदीभक्तांनी रंगवून सांगितल्या होत्या. मात्र निवडून आल्यानंतर हेच ट्रम्प एका पाठोपाठ एक हिंदुस्थानविरोधी निर्णय घेत या कथांचा रंग खरडून काढत आहेत. ‘टॅरिफ’चा वरवंटा भारतावरही फिरविण्यात त्यांनी कुठलेही ‘डावे-उजवे’ केले नाही. स्वतःला ट्रम्प यांचे परममित्र वगैरे म्हणवून घेणारे आपले पंतप्रधान मोदी आता काय करणार आहेत? ते काय करतील ते करतील, परंतु ट्रम्प यांच्या निर्णयांनी मोदींच्या चाणक्यनीतीचा आणि ट्रम्प मैत्रीचा फुगा फुटला आहे हे मात्र निश्चित.