सामना अग्रलेख – मुलुंडचा पोपटलाल आता काय करणार?

महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या 107 हुतात्म्यांचे ‘आत्मे’ महाराष्ट्रावरील आकाशात फिरत आहेत व ते सर्व मोदी-शहांची भुताटकी कायमची नष्ट करतील. महाराष्ट्रात हे वखवखते आत्मे कितीही भटकत राहिले तरी त्यांना विजय मिळणार नाही. नागड्या पोपटलालसारखे ‘मुंजे’ तर वायकर, यामिनी जाधवांच्या उमेदवारीनंतर स्मशानातील पिंपळावर जाऊन उलटे लटकणार आहेत. अजित पवार, हसन मुश्रीफ व आता वायकर-यामिनी यांचा प्रचार फडणवीस करतील काय? तसेच फडणवीस प्रचाराच्या व्यासपीठावर येण्याआधी मुलुंडचे नागडे पोपटलाल वायकर-यामिनींच्या स्तुतीची कवने गातील काय? हे दृश्य महाराष्ट्राला एकदा याचि देही याचि डोळा पाहायचे आहे. काळाने भाजपवर, फडणवीसांवर, पोपटलालवरच घेतलेला हा सूड आहे.

देशात ‘मोदी पॅटर्न’ चालणार, बाकी सगळे पॅटर्न भंगारात जाणार, असे मुख्यमंत्री मिंधे यांचे म्हणणे आहे. त्याच मोदी पॅटर्ननुसार भ्रष्टाचारात बरबटलेले व भाजपच्या वॉशिंगमध्ये घुसलेले उमेदवार मिंधे यांनी जाहीर केले. मिंधे-फडणवीस गटाने उत्तर-पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर व दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवांना लोकसभेचे उमेदवार बनवले व मोदी पॅटर्नचा मान राखण्याचा प्रयत्न केला. या दोघांविरोधी याआधी भाजपने भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे रान उठवले होते. मुलुंडच्या नागड्या पोपटलालने तर या दोघांच्या भ्रष्टाचाराची कुंडली काढून थयथयाट केला होता. या दोघांना तुरुंग दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही जाहीर केले होते. आता या दोघांच्या निवडणुकांचे प्रचारप्रमुख म्हणून या नागड्या पोपटलाललाच नेमावे लागेल. लोकशाही, कायदा, न्यायव्यवस्थेचा हा असा खेळखंडोबा भाजपने केला आहे. आधी ‘भ्रष्ट भ्रष्ट’ म्हणून भुई धोपटायची व मग त्यालाच भाजपमध्ये घेऊन खासदारकीचे उमेदवार करायचे हाच मोदी पॅटर्न आहे. कर्नाटकात वीस हजार बलात्कार करणाऱ्या एका प्रज्वल रेवन्नासाठी मोदींनी धो धो प्रचार केला. या प्रज्वल रेवन्नाने सत्तर वर्षांच्या वृद्धेलाही सोडले नाही. मोदी यांनी रेवन्नाच्या पाठीवर थाप मारून त्याला आशीर्वाद दिला. आता हा रेवन्ना जर्मनीत पळून गेला.

बलात्कारी तसेच भ्रष्टाचारी

अशा सर्व लोकांची ‘मोट’ बांधून निवडणूक जिंकण्याचा मोदी पॅटर्न देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारा आहे. मोदी हा सत्तेसाठी वखवखलेला भटकता आत्मा आहे. ही वखवख आज सर्वच पातळीवर दिसत आहे. शिवसेना-फडणवीस गटाचे नेते मिंधे म्हणतात, ‘20-20 तास काम करणारे मोदींचे नेतृत्व आहे. त्यांची ऊर्जा ‘ईश्वरी’ असून त्यांच्याकडून नेहमीच ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. मिंधे यांना मिळणाऱ्या प्रेरणेतूनच त्यांनी भ्रष्टाचाराचा भंगार माल लोकसभा निवडणुकीत उतरवला आहे. मिंधे व त्यांच्याबरोबरीने फुटलेले 40 जण हे ‘मोदी पॅटर्न’मधील भटकते आणि वखवखलेले आत्मेच आहेत. त्यामुळे त्यांना मोदींकडून प्रेरणा व ऊर्जा मिळणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्रात मोदी काळात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अनेक विधवांनी आपली मंगळसूत्रे, जमिनी गहाण टाकल्या. सावकारी कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या केल्या. या सगळ्यांच्या इच्छा अतृप्त आहेत व या सर्व शेतकऱ्यांचे आत्मे भाजपच्या मानगुटीवर बसणार आहेत. मोदी-शहा यांनी सध्या महाराष्ट्रातच ठाण मांडले आहे. त्यांचे आत्मे महाराष्ट्रात वखवखल्यासारखे फिरत आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँगेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष फोडूनही

मोदींचा आत्मा

शांत झाला नाही. कारण त्यांना उद्या महाराष्ट्रापासून मुंबईचा लचका तोडायचा आहे, पण ते कदापि शक्य होणार नाही. महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या 107 हुतात्म्यांचे ‘आत्मे’ महाराष्ट्रावरील आकाशात फिरत आहेत व ते सर्व मोदी-शहांची भुताटकी कायमची नष्ट करतील. मोदी-शहा व त्यांचे मित्रमंडळ महाराष्ट्राच्या बाबतीत साशंक आहेत. महाराष्ट्रात हे वखवखते आत्मे कितीही भटकत राहिले तरी त्यांना विजय मिळणार नाही. नागड्या पोपटलालसारखे ‘मुंजे’ तर वायकर, यामिनी जाधवांच्या उमेदवारीनंतर स्मशानातील पिंपळावर जाऊन उलटे लटकणार आहेत. अजित पवार, हसन मुश्रीफ व आता वायकर-यामिनी यांचा प्रचार फडणवीस करतील काय? तसेच फडणवीस प्रचाराच्या व्यासपीठावर येण्याआधी मुलुंडचे नागडे पोपटलाल वायकर-यामिनींच्या स्तुतीची कवने गातील काय? हे दृश्य महाराष्ट्राला एकदा याचि देही याचि डोळा पाहायचे आहे. काळाने भाजपवर, फडणवीसांवर, पोपटलालवरच घेतलेला हा सूड आहे, पण निर्लज्जम् सदा सुखी असेच हे लोक आहेत. तुम्ही निर्लज्ज बनला असला तरी महाराष्ट्राने लाज सोडलेली नाही. भ्रष्टाचाराच्या ‘मोदी पॅटर्न’ला कायमचे भंगारात पाठविल्याशिवाय मऱ्हाठी जनता स्वस्थ बसणार नाही.