
मोदी काळात चीन लडाखमध्ये घुसला. मोदी यांनी हे आक्रमण सहन केले व आता तर त्यांनी गंगेत जाऊन स्नान केल्याने त्यांच्या मनातील वैराग्नी विझून गेला. त्याच गंगास्नानाचे काही थेंब सॅम पित्रोदांच्या अंगावर पडले व त्यांनाही चीन आपला कडवट शत्रू नसल्याचे वाटू लागले. या सगळ्यात काँग्रेस पक्ष उगाच घामाघूम झाला व पित्रोदांना दूर ढकलून दिले. खरे तर मोदींना काँग्रेसने विचारायला हवे की, चीन भारताचा शत्रू आहे की नाही त्याबाबतचे परराष्ट्र व्यवहार धोरण लगेच जाहीर करा. म्हणजे आम्ही भूमिका घ्यायला मोकळे. पलायन व प्रश्नांचा ढेकूण झटकणे हा मार्ग नाही.
सॅम पित्रोदांच्या चीनवरील एका वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला कोंडीत पकडण्याचे उद्योग सुरू केले आहेत. ‘‘चीनला शत्रू मानणे अयोग्य आहे,’’ असे सॅम पित्रोदा यांनी सांगितले. पित्रोदा याबाबत पुढे सांगतात, ‘‘चीनपासून भारताला कोणता धोका आहे हेच मला समजत नाही. चीनसंदर्भातील समस्यांना कायम फुगवून सांगितले जाते. भारताने चीनबाबतचा दृष्टिकोन बदलून त्या देशाला शत्रू मानणे बंद केले पाहिजे.’’ सॅम हे काँग्रेसच्या ‘विदेश’ विभागाचे प्रमुख आहेत व नक्कीच एक ज्ञानी-विज्ञानवादी गृहस्थ आहेत. मात्र त्यांची अनेक विधाने ही वाद ओढवून घेणारी ठरली व काँग्रेसची त्यामुळे कुचंबणा झाली. आता त्यात चीनवरील विधानाची भर पडली. नेहमीप्रमाणे काँग्रेसने सॅम यांच्या विधानापासून स्वतःला दूर केले. सॅम यांची भूमिका ही काँगेसची भूमिका नसल्याचे जाहीर केले. त्यावरून भाजपने चीनवर छाती बडवायला सुरुवात केली, पण मोदी पंतप्रधान झाल्यापासून चीनचे भारतात घुसखोरीचे व हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे आणि मोदींचे सरकार त्या घुसखोरीचा मुकाबला करू शकलेले नाही, या वास्तवाचे काय? चीनने भारतीय हद्दीत घुसून लडाखची 4060 वर्ग किलोमीटर जमीन हडप केली आहे. पाच वर्षांपासून पूर्व लडाखच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैनिकांत तणाव आहे. गलवान व्हॅलीत दोन्ही बाजूच्या सैनिकांत संघर्ष झाला व त्यात भारताच्या कर्नलसह वीस जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. इतके होऊनही भारताने त्यावर काहीच कठोर प्रतिक्रिया दिली नाही.
चिनी सैनिकांचे आक्रमण
झालेच नसल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला. हे सॅम पित्रोदांच्या कालच्या विधानापेक्षा गंभीर आहे. चीन हा कुरापती करण्यात पटाईत आहे. चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेश हा त्यांचा भूभाग असल्याचे दाखवले जाते. चीनने भारतीय हद्दीत घुसून गावे वसवली. बांधकाम केले, रस्ते बनवले, विमानतळ उभारले. हे सर्व सॅटेलाईटने टिपले, पण भारताने आपली जमीन मुक्त करण्यासाठी काय केले? की अदानी वगैरेंना ज्याप्रकारे भूदान दिले जात आहे, त्याचप्रमाणे चीनलाही भूदान केले? तसे असेल तर सॅम पित्रोदा म्हणतात त्याप्रमाणे मोदींचे सरकारही चीनला शत्रू मानायला तयार नाही. भारत पाकिस्तानला शत्रू मानतो. कारण तो एक दुबळा देश आहे. त्या देशावर हल्ल्यांचे नाटक रचले जाते. कारण त्याचा भारतातील निवडणुकीत ‘हिंदू-मुसलमान’ किंवा ‘भारत-पाकिस्तान’ असा मुद्दा करून मते मिळविण्यास फायदा होतो. पुलवामातील शहिदांचे निवडणूक काळात ठिकठिकाणी असेच राजकारण केले गेले. त्यांच्या शवयात्रा काढून भाजपने विजयाच्या व बदला घेण्याच्या गर्जना केल्या, पण चीनबरोबरच्या चकमकीत जे जवान शहीद झाले त्यांच्या हौतात्म्याचा राजकीय फायदा नसल्याने भाजप सरकारने तो मामला नेहमीच थंड डोक्याने घेतला. चीन आणि भारतात व्यापारी संबंध आहेत. चीन शत्रू आहे हे मान्य केले तर चीनमधून होणाऱ्या व्यापारावर आणि मालावर बहिष्कार का टाकला जात नाही? चीनने भारतीय बाजारावर नियंत्रण मिळवले आहे. चीन भारताला
शंभर अब्ज डॉलर्सची निर्यात
करतो. अमेरिका, रशिया, युरोप व अरब राष्ट्रांपेक्षा हा आकडा मोठा आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा समतोल भारतातील बाजाराने राखला आहे. चीनच्या आर्थिक मंदीवर भारताशी व्यापार हा उतारा आहे व तरीही भारत आणि चीनमध्ये वैर आहे असे बोलले जाते. चीनने वैर पुकारले आहे, पण मोदी सरकारने कितीही छाती फुगवून दाखवली तरी चीनशी सरळ टक्कर घेण्याची हिंमत त्यांच्यात दिसत नाही. चीनबरोबरचे युद्ध नेहरूंमुळे हरलो व 1962 साली चीनने भारताच्या 37 हजार वर्ग किलोमीटर जमिनीवर कब्जा मिळवला हेच त्यांचे दळण सुरू आहे. मोदी हे हिंमतबाज वगैरे पंतप्रधान खरोखरच असतील तर त्यांनी नेहरूंमुळे चीनच्या ताब्यात गेलेली जमीन मुक्त करायला हवी. ते राहिले बाजूला, उलट मोदी काळात चीन लडाखमध्ये घुसला व मोठ्या जमिनीवर कब्जा मिळवला. पंतप्रधान मोदी यांनी हे आक्रमण सहन केले व आता तर त्यांनी गंगेत जाऊन स्नान केल्याने त्यांच्या मनातील वैराग्नी विझून गेला. त्याच गंगास्नानाचे काही थेंब सॅम पित्रोदांच्या अंगावर पडले व त्यांनाही चीन आपला कडवट शत्रू नसल्याचे वाटू लागले. या सगळ्यात काँग्रेस पक्ष उगाच घामाघूम झाला व पित्रोदांना दूर ढकलून दिले. खरे तर मोदींना काँग्रेसने विचारायला हवे की, चीन भारताचा शत्रू आहे की नाही त्याबाबतचे परराष्ट्र व्यवहार धोरण लगेच जाहीर करा. म्हणजे आम्ही भूमिका घ्यायला मोकळे. पलायन व प्रश्नांचा ढेकूण झटकणे हा मार्ग नाही.