सामना अग्रलेख – गुजरातच्या भूमीवरून काँग्रेस!

भाजपचे लोक सांगतात, ‘मोदी 2047 सालापर्यंत पंतप्रधानपदी राहतील.’ मोदींचे आजचे वय 75 आहे. म्हणजे मोदी अमर गुटिका चघळून खुर्चीवर बसले आहेत. त्या अमर गुटिकेचे झाड गुजरातमध्ये आहे. काँग्रेसने गुजरातला जाऊन ते झाड गदागदा हलवले. हे झाड उखडायचे असेल तर मदतीसाठी अनेक हात लागतील. गुजरात अधिवेशनात यावर जास्त चिंतन होणे गरजेचे होते. काँग्रेसने आपल्या जुन्या वाड्याचे नेपथ्य लावून भाषणे केली. वाडा लयास गेला आहे. तो उभारण्याची ताकद निर्माण करावी लागेल. जुन्या काळातून बाहेर पडून नवा विचार द्यावा लागेल. गुजरातच्या भूमीवरून काँग्रेसने रणशिंग फुंकले, पण पुढे काय?

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन मोदी-शहांच्या गुजरातमध्ये संपन्न झाले. अहमदाबादमध्ये काँग्रेसने अधिवेशन घेतले व राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली याला विशेष महत्त्व आहे. एरवी विरोधकांचा आवाज दडपण्याची एकही संधी न सोडणाऱ्या मोदी-शहांना गुजरातच्या भूमीवरून त्यांच्यावर झालेले हल्ले सहन करावे लागले. ‘घुसकर मारेंगे’ हा भाजपवाल्यांचा आवडता शब्दप्रयोग आहे. राहुल गांधी यांनी अहमदाबादेत घुसून मारले असेच म्हणावे लागेल. काँग्रेस नेत्यांनी महात्मा गांधी व सरदार पटेल यांना अभिवादन केले. पटेलांच्या भव्य पुतळ्याकडे जाऊन अभिवादन केले. साबरमती आश्रमात जाऊन गांधी विचारांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी परदेशी पाहुण्यांना गुजरातच्या सहलीवर आणतात तेव्हाच साबरमती व पटेलांच्या पुतळ्याकडे फिरकतात. गांधी यांनी अहमदाबाद येथे घुसून मारले व गुजरात भाजप गांधींचा हल्ला पाहत राहिला. ‘देशावर आर्थिक संकट येत आहे, पण पंतप्रधान मोदी कुठे लपून बसले आहेत? कुठे गेली ती 56 इंचांची छाती?’ असे धारदार बाण राहुल गांधी यांनी गुजरातच्या भूमीवरून सोडले. गांधी हे थेट हल्ला करतात. ते परिणामांची पर्वा करीत नाहीत. भाजपवाल्यांना मोदी हे अवतारी पुरुष वाटत असतील, पण प्रत्यक्षात ते कोणीच नाहीत. मतदार यादीतले घोटाळे, ईव्हीएमच्या भानगडी करून ते सत्तेवर बसले. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत भाजप व त्यांच्या लोकांनी हेराफेरी केली, पण निवडणूक आयोग गुलामी करत असल्याने मोदी-शहांचे राज्य टिकले, असे गांधी म्हणाले. भाजपचा रथ रोखण्यासाठी आणि निवडणुकीत यश मिळवण्यासाठी काँग्रेस यापुढे मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि आदिवासी समुदायांवर लक्ष केंद्रित करेल. गांधी यांनी गुजरातच्या भूमीवरून

मोदी-शहांची झोप

उडवली. मोदी हे 18 ते 20 तास काम करतात. देश व जनतेच्या प्रश्नांमुळे ते झोपत नाहीत, पण गांधी व त्यांची काँग्रेस गुजरातमध्ये फौजफाट्यासह अवतरली व भविष्याची दिशा ठरवून गेली. त्यामुळे झोप उडालेल्या मोदींना काही काळ तळमळत राहावे लागेल. काँग्रेसच्या अधिवेशनाची समाप्ती होताच अहमदाबादच्या रस्त्यावर लागलेली राहुल गांधी यांची भव्य होर्डिंग्ज उखडून फेकण्याचे शौर्य भाजप कार्यकर्त्यांनी केले. मोदी-शहांना त्यांच्याच जमिनीवर जाऊन आव्हान देण्याचा हा प्रयत्न चांगला आहे, पण त्यामुळे भारतात खरेच राजकीय क्रांती होईल काय? 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने शंभर जागा जिंकल्या. इंडिया आघाडीने मोदींना 240 वर रोखले, पण इंडिया आघाडीला सत्ता मिळवता आली नाही. ज्या गुजरातच्या भूमीवरून काँग्रेसने मोदींना आव्हान दिले, त्या राज्यात काँग्रेस लोकसभेची एकही जागा जिंकू शकली नाही. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातही काँग्रेसला मेहनत घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात लोकसभेत यश मिळाले, पण विधानसभेत मोठे अपयश पदरी पडले. त्यास भाजपचे घोटाळे जितके कारणीभूत आहेत, तेवढेच काँग्रेसअंतर्गत काही विषय जबाबदार आहेत. त्यावर मंथन झाले पाहिजे. लोकसभेच्या निकालानंतर ‘इंडिया आघाडी कोठे आहे?’ असे प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांना काँग्रेसने गुजरातच्या अधिवेशनातून उत्तर देणे गरजेचे होते. इंडिया आघाडीचे काय झाले? ती जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली? नक्की काय झाले? याचे उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेस अध्यक्षांवर आहे. काँग्रेसने स्वतःला मजबूत करायला हवे, पण भारतीय जनता पक्ष स्वतःला मजबूत करताना आपल्याच मित्रपक्षांचा, प्रादेशिक पक्षांचा घास गिळतो. अर्थात आजचे मोदींचे सरकार हे शेवटी

प्रादेशिक पक्षांच्या कुबड्यांवरच

टिकले आहे याकडे काँग्रेसने डोळसपणे पाहायला हवे. गुजरातच्या अधिवेशनात काँग्रेसने स्वतःपुरता विचार केला व भूमिकांची मांडणी केली. त्यात ‘इंडिया’ किंवा ‘भारत’ दिसत नाही. हुकूमशाहीविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे व त्यासाठी काँग्रेसलाच पुढे यावे लागेल. दिल्लीत केजरीवाल यांच्या पराभवानंतर काँग्रेससाठी मैदान मोकळे झाले असे त्यांच्या नेत्यांना वाटणे स्वाभाविक आहे. अनेक राज्यांत मैदान मोकळे करण्याचे तंत्र ते अवलंबणार असतील तर मोदी-शहांची ते सेवा करीत आहेत असेच म्हणायला हवे. बिहार, गुजरात, प. बंगालच्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेस काय भूमिका घेणार आहे? की पुन्हा एकदा पराभवाचेच दिलखुलास स्वागत करणार? दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘एकी’ झाली असती तर बरे झाले असते. केजरीवाल हे मोदी प्रवृत्तीशीच लढत होते. त्यामुळे मतभेद बाजूला ठेवून निर्णय घ्यायला हरकत नव्हती. महाराष्ट्रात काँग्रेस मित्रपक्षांशी ज्या पद्धतीने वागली त्याचा निकाल विधानसभेत दिसला. आपल्याला मोदी-शहांच्या भाजपला हरवायचे आहे, आपल्याच गोतावळ्यातील मित्रांना नाही. भाजपचे लोक सांगतात, ‘मोदी 2047 सालापर्यंत पंतप्रधानपदी राहतील.’ मोदींचे आजचे वय 75 आहे. म्हणजे मोदी अमर गुटिका चघळून खुर्चीवर बसले आहेत. त्या अमर गुटिकेचे झाड गुजरातमध्ये आहे. काँग्रेसने गुजरातला जाऊन ते झाड गदागदा हलवले. हे झाड उखडायचे असेल तर मदतीसाठी अनेक हात लागतील. गुजरात अधिवेशनात यावर जास्त चिंतन होणे गरजेचे होते. काँग्रेसने आपल्या जुन्या वाड्याचे नेपथ्य लावून भाषणे केली. वाडा लयास गेला आहे. तो उभारण्याची ताकद निर्माण करावी लागेल. जुन्या काळातून बाहेर पडून नवा विचार द्यावा लागेल. गुजरातच्या भूमीवरून काँग्रेसने रणशिंग फुंकले, पण पुढे काय?