
मोदी यांची भूमिका भ्रष्टाचार खतम करण्याची आहे. ‘‘मला फक्त पैसे खाणाऱ्यांची नावे कळवा, एकेकाला सरळ करतो’’ असे पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच जाहीर केले. श्री. फडणवीस यांनी शिंदे व त्यांच्या फिक्सर लोकांची नावे पंतप्रधान मोदी यांना कळवायला हरकत नाही. महाराष्ट्रात तीन वर्षांपूर्वी शिंद्यांचे राज्य हे ‘फिक्सिंग’मधूनच अवतरले. त्यामुळे राज्यात फिक्सर व दलालांचे उदंड पीक आले. हे पीक कापण्याचे सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, पण त्यांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही. कारण पिकावरचा दाढीवाला खोडकिडा म्हणतोय, ‘‘मला हलक्यात घेऊ नका.’’ फिक्सरांनी मारलेला सिक्सर अडवावा लागेल!
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यकारभारात शिस्त आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. मागच्या तीन वर्षांत भ्रष्टाचाराचा धबधबा वाहत होता. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्याचे राजकारण कुजले. आर्थिक बेशिस्तीने टोक गाठले. आमदार, खासदार, नगरसेवक, खऱ्या शिवसेनेचे पदाधिकारी यांना विकत घेण्यासाठी व नंतर पोसण्यासाठी लागणारा पैसा रस्ते, बांधकाम ठेकेदार, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, म्हाडा, एसआरए, नगरविकास खात्याची लूट करूनच जमा केला गेला. हा लुटीचा पैसा आपल्या खिशात पडावा यासाठी अनेकांनी पक्षांतरे केली. पैशांचा हा प्रवाह आला कोठून, तर बेकायदेशीर टेंडर्स, बनावट कामे, निधीवाटपातील कमिशनबाजी, भूखंड घोटाळे, गृहनिर्माणातील दलाली या ‘आशर’ मार्गाने हा पैसा जमा झाला. शिंद्यांचे मुख्य कलेक्टर आशर प्रा. लि. हे दहा हजार कोटी रुपये घेऊन दुबईत पळाले आहेत, अशी ताजी खबर आहे. कारण मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात घाण करणाऱ्या या सर्व गटारांची सफाई करण्याचे ठरवले आहे. 500 कोटींचे टेंडर तीन हजार कोटींपर्यंत वाढवून मधले हजार कोटी काम सुरू होण्याआधीच ताब्यात घ्यायचे, त्यातले शे-दोनशे कोटी चेल्यांत वाटायचे व त्या सगळ्यांना घेऊन प्रयागतीर्थी गंगास्नान घडवायचे. या सर्व कारनाम्यांना बूच लावण्याचे पवित्र काम श्री. फडणवीस यांनी सुरू केले आहे. त्यामुळे शिंदे व त्यांच्या लोकांची दाणादाण उडाली नसेल तर नवलच! फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणखी एक महत्त्वाचे काम केले. मंत्र्यांचे ‘पीए’ व ‘ओएसडी’ नेमण्याचे अधिकार काढून घेतले. मंत्र्यांकडून ‘पीए’ व ‘ओएसडी’ म्हणून ज्यांची नावे मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली गेली, त्यातील 16 नावे मुख्यमंत्र्यांनी थेट नाकारली. कारण हे 16 जण
आधीच्या मिंधे सरकारात
मंत्र्यांचे ‘ओएसडी’ बनून दलाली, फिक्सिंग करीत होते. हे सर्व ‘फिक्सर’ मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाकारले. ‘फिक्सर’ नेमू देणार नाही ही मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य आहे. या 16 फिक्सरपैकी 12 फिक्सर हे शिंदे गटाच्या मंत्र्यांनीच सुचवले असे आता समोर आले. हे असे ‘फिक्सर’ मंत्र्यांना हवेतच कशाला? ‘‘नीट काम करा. उगाच मस्ती करू नका. नाहीतर घरी जाल’’ असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची कबुली मंत्री माणिक कोकाटे यांनी उघडपणे दिली. मंत्रालयात सामान्यांना प्रवेश मिळत नाही व दलालांचा सुळसुळाट नेहमीच असतो. पुन्हा मंत्र्यांचे ‘पीए’ आणि ओएसडी हेच फिक्सर असल्याने या दलालांना मंत्र्यांच्या दालनापर्यंत सहज पोहोचता येते. शिंदे काळात तर मंत्रालय हे दलाल व फिक्सरांची जत्राच झाली होती. कोणीही यावे, ‘टक्का’ ठेवावा व निधी आणि कामे मंजूर करून जावे. तिजोरीत खडखडाट असताना कामे देण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर धडाधड विकासकामांना मंजुरी दिली. ठेकेदारांनी कामे केली, पण त्या कामास रीतसर मंजुरी नसल्याने ठेकेदारांची बिले रखडली. शासकीय कामांची जवळपास 90 हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे कंत्राटदार संघटनांनी म्हटले आहे. या 90 हजार कोटींतले 25 हजार कोटी रुपये आधीच ‘दलाली’ म्हणून उचलले गेले. आमदार, खासदारांना (शिंदे-अजित गट) खूश ठेवण्यासाठी त्यांनी सरकवलेल्या कागदांवर सह्या केल्या गेल्या. त्या कागदाच्या जोरावर या लोकांनी कंत्राटदारांकडून कोट्यवधींची उचल घेतली. आता या सगळ्या कामांना देवेंद्र फडणवीस यांनी कात्री लावल्याने शिंदे गटाचे गणित कोसळले. शिंदे गटाची आर्थिक कोंडीच त्यामुळे झाली. शिंदे गटात जे लोक जात आहेत ते एकतर ठेकेदार आहेत किंवा थेट लाभार्थी आहेत.
शिंद्यांची दौलतजादा
झेलायला ते ‘गंगुबाई’च्या कोठ्यावर जात आहेत, पण हे भ्रष्टाचाराचे कोठे व कोठय़ांचे दलालच नष्ट करण्याचा विडा मुख्यमंत्र्यांनी उचलला असेल तर या सगळ्या फिक्सर आणि दलालांचे कसे व्हायचे? लुटीच्या अनेक युक्त्या तीन वर्षांत समोर आल्या. फ्रान्सच्या एका कंपनीने एमएमआरडीएवर ‘कमिशन’खोरीचा आरोप केला. मेट्रोच्या उभारणीत या कंपनीचा सहभाग आहे. या कंपनीने केलेल्या नियमित कामांची बिले मुद्दाम रखडवून ठेवली जात आहेत. म्हणजे ‘आका’चे कमिशन मिळाल्याशिवाय बिले मिळणार नाहीत हे परदेशी कंपन्यांना सांगितले जाते. यात आपल्या देशाची बदनामीच सुरू आहे. शिंदे यांच्या पक्षाचे संस्थापक श्री. अमित शहा आहेत व फडणवीस यांच्या कठोर शिस्तीची तक्रार करण्यासाठी शिंदे हे पुण्यात पहाटे 4 वाजता अमित शहांना भेटले. फडणवीस आमच्या पोटावर मारत आहेत व आमदार, खासदारांची पोटे रिकामी राहिली तर तुमचा पक्ष टिकणार नाही असे शिंदे यांनी शहांच्या कानी घातले. याउलट मोदी यांची भूमिका भ्रष्टाचार खतम करण्याची आहे. ‘‘मला फक्त पैसे खाणाऱ्यांची नावे कळवा, एकेकाला सरळ करतो’’ असे पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच जाहीर केले. श्री. फडणवीस यांनी शिंदे व त्यांच्या फिक्सर लोकांची नावे पंतप्रधान मोदी यांना कळवायला हरकत नाही. महाराष्ट्रात तीन वर्षांपूर्वी शिंद्यांचे राज्य हे ‘फिक्सिंग’मधूनच अवतरले. त्यामुळे राज्यात फिक्सर व दलालांचे उदंड पीक आले. हे पीक कापण्याचे सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, पण त्यांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही. कारण पिकावरचा दाढीवाला खोडकिडा म्हणतोय, ‘‘मला हलक्यात घेऊ नका.’’ फिक्सरांनी मारलेला सिक्सर अडवावा लागेल!