प्रश्न फक्त चीनने आता अरुणाचल प्रदेशात केलेल्या घुसखोरीचा नाही तर देशाच्या स्वाभिमानाचा, राष्ट्रीय अस्मितेचा आहे; पण मोदींना त्याची चिंता नाही. मोदीचे सरकार हे ‘राष्ट्रीय’ अस्मितेचे सरकार नाही. ते दोन–पाच धनाढ्य लाडक्या उद्योगपती मित्रांसाठी चालवले जाणारे सरकार आहे. त्यामुळे चीनची घुसखोरी, कश्मिरी पंडितांच्या प्रश्नांना त्यात स्थान नाही. भारत देश महान आहे. हा महान होण्यात मागच्या दहा वर्षांचे काडीमात्र योगदान नाही. मोदींची दहा वर्षे ही देशासाठी वाया गेलेली वर्षे आहेत. त्यामुळे चीन भारतात सहज घुसत आहे व आपण हात चोळत बसलो आहोत.
मोदी सध्या रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्याच्या कार्यात गुंतून पडले आहेत आणि इकडे चीन अरुणाचल प्रदेशातील कपापू भागात घुसला आहे. चीनचे सैन्य आठ दिवसांपूर्वीच आपल्या हद्दीत घुसले. तेदेखील साठ किलोमीटर आत. हे चित्र भयंकर असताना आपल्याकडून चीनचा साधा निषेधही झाला नाही. दोन दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी परंपरेप्रमाणे पाकिस्तानला दम भरला, पण आत घुसलेल्या चीनवर संरक्षणमंत्री बोलत नाहीत. चीन अरुणाचल सीमेवर सातत्याने घुसखोरी करीत आहे इतकेच नव्हे, तर अरुणाचल चीनचेच आहे असा त्याचा दावा आहे. दावा करून तो थांबत नाही, तर त्याचे लाल सैन्य तो अरुणाचलच्या हद्दीत घुसवून भारताला आव्हान देत आहे. मोदींचे सरकार आल्यापासून चीन सर्वात जास्त भारताच्या सीमा कुरतडत आहे. मोदी हे जगाचे मजबूत नेते किंवा विश्वगुरू वगैरे आहेत, पण चीन तसे मानायला तयार नाही. मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यापासून चीनचे सैन्य कधी अरुणाचल, तर कधी लडाखच्या हद्दीत घुसखोरी करत आहे. लडाखच्या हद्दीत घुसून चीनने हेलिपॅड, गावे वसवली तरी सरकारची चीनवर डोळे वटारण्याची बिशाद नाही. मोदी हे जगभ्रमणास जातात, जगभरच्या नेत्यांच्या गळाभेटी घेतात, पण त्यांना भारताच्या कुरतडलेल्या सीमांची काळजी घ्यायला वेळ नाही. शेकडो किलोमीटर जमीन चीन भारतात घुसून ताब्यात घेत असेल तर ही मोदींसाठी
लाजिरवाणी गोष्ट
आहे. चीनने बाजूचे नेपाळ गिळले आहे. चीनचे आरमार मालदीवच्या समुद्रात उभेच आहे. श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून चीनने त्यालाही आपल्या टाचेखाली आणले आहे. पाकिस्तानने चीनलाच आपला बाप मानले आहे. म्हणजे हिंदुस्थानच्या जवळ जवळ सर्वच शेजाऱ्यांना ताब्यात घेऊन चीनने हिंदुस्थानच्या सीमांवर स्वतःचे चौकी-पहारे बसवले आहेत. एकही शेजारी आपला मित्र नाही व पंतप्रधान मोदी सातासमुद्रापलीकडील राष्ट्रप्रमुखांच्या गळाभेटी घेत आहेत. परराष्ट्र धोरणातला हा ‘लोच्या’ असून राष्ट्रीय सुरक्षेसाठी ही अत्यंत घातक बाब आहे. पंतप्रधान मोदी हे बोलतात जोरदार, पण कृतीच्या बाबतीत कमजोर पडले आहेत. मणिपूरचा हिंसाचार व रक्तपात जे पंतप्रधान थांबवू शकले नाहीत ते स्वतःला जगाचे नेते मानतात, हे आश्चर्यच आहे. मोदी पंधरा दिवसांपूर्वी युक्रेनच्या पर्यटनावर गेले तेव्हा मोदी हे युद्धभूमीवर गेल्याचा डंका त्यांच्या भक्तांनी वाजवला व मोदी युक्रेनमध्ये आहेत तोपर्यंत रशिया-युक्रेनवर हल्ले करणार नसल्याचे पुतीन प्रशासनाने सांगितले, पण गेल्या दोन वर्षांत युक्रेन पूर्ण बेचिराख करून चार लाख लोकांचे बळी रशियाने घेतले. मोदी या जिवांचे प्राण वाचवू शकले नाहीत. मोदी मणिपुरातील हजारो आदिवासींचे प्राण वाचवू शकले नाहीत. मोदी ‘पुलवामा’ टाळू शकले नाहीत. त्यामुळे भारतात घुसलेल्या चीनच्या बाबतीत मोदी
कठोर भूमिका
घेतील असे अजिबात वाटत नाही. कुठलाही देश आपल्या इंच इंच भूमीच्या संरक्षणासाठी लढत असतो. जगात अशी अनेक उदाहरणे आहेत. परक्या शत्रूचे पायही तो आपल्या भूमीवर लागू देत नाही, पण इथे लडाख-अरुणाचलमध्ये ‘इंचभर’ नाही, तर शेकडो किलोमीटर जमीन चीनने गिळली तरी मोदी व त्यांचे लोक शांत आहेत व मोदी भक्तांच्या फौजाही गप्प आहेत. मोदी हे अपयशी व अकार्यक्षम पंतप्रधान आहेत. अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा याबाबत मोदींचे ज्ञान व आकलन शून्य आहे. जो नेता देशाच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवू इच्छित नाही तो नेता जागतिक राजकारणावर उठाबशा काढतो व त्यावर अंधभक्त टाळ्या वाजवत बसतात. प्रश्न फक्त चीनने आता अरुणाचल प्रदेशात केलेल्या घुसखोरीचा नाही तर देशाच्या स्वाभिमानाचा, राष्ट्रीय अस्मितेचा आहे; पण मोदींना त्याची चिंता नाही. मोदीचे सरकार हे ‘राष्ट्रीय’ अस्मितेचे सरकार नाही. ते दोन-पाच धनाढ्य लाडक्या उद्योगपती मित्रांसाठी चालवले जाणारे सरकार आहे. त्यामुळे चीनची घुसखोरी, कश्मिरी पंडितांच्या प्रश्नांना त्यात स्थान नाही. भारत देश महान आहे. हा महान होण्यात मागच्या दहा वर्षांचे काडीमात्र योगदान नाही. मोदींची दहा वर्षे ही देशासाठी वाया गेलेली वर्षे आहेत. त्यामुळे चीन भारतात सहज घुसत आहे व आपण हात चोळत बसलो आहोत.