सामना अग्रलेख – यमाईच्या नावानं चांगभलं!

घटनापीठाचा भाग असलेले न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत आणि त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.

यमाई देवीच्या कृपेने सन्माननीय चंद्रचूड सरन्यायाधीश झाले. देवीच्या कृपेने व श्रद्धेने त्यांनी न्यायदान केले, पण हे न्यायदान सत्य व प्रामाणिकपणास ठोकरणारे का ठरले? महाराष्ट्रात एका घटनाबाह्य, बेकायदेशीर, भ्रष्ट मार्गाने निर्माण केलेल्या सरकारला अभय देऊन चालवण्याचे काम कोणाच्या प्रेरणेने झाले? शिवसेना हे नाव, धनुष्यबाणासारखे चिन्ह हीसुद्धा महाराष्ट्रीय जनतेची श्रद्धा होतीच. संविधानाच्या दहाव्या शेड्यूलचा मान राखून न्यायदान करा, असा साक्षात्कार सरन्यायाधीशांना देवीने दिला नाही की देवीच्या श्रद्धेवर तेराव्या अवताराचे आदेश भारी पडले? यमाई देवी सरन्यायाधीशांना कौल देत असेल तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा खटला आम्ही यमाई देवीच्या देवळात चालवायला तयार आहोत. निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांनी या खटल्याचे वकील व्हावे. बोला, आहे तयारी?

देशाचे संविधान धर्मनिरपेक्ष आहे, पण मोदी-शहांचे राज्य आल्यापासून संविधान धर्मनिरपेक्ष राहिलेले नाही याचा खुलासा स्वतः मावळत्या सरन्यायाधीशांनी केला. मागची दहा वर्षे न्यायव्यवस्थेच्या बाबतीत गोंधळाची गेली व या गोंधळात डफ-तुणतुणे वाजवण्याचे काम याच क्षेत्रातील मोठ्या लोकांनी केले. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुणे जिह्यातील त्यांच्या कन्हेरसर गावी जाऊन ग्रामदेवतेचे दर्शन घेतले व सांगितले, ‘‘गावातील यमाई देवीच्या कृपेमुळे मी सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो.’’ चंद्रचूड यांनी एक प्रकारे कायदा व न्यायदान क्षेत्रातील कर्तबगार लोकांवर व त्यांच्या क्षमतेवर शंका उपस्थित केली. अनुभव, हायकोर्ट व सुप्रीम कोर्टातील त्यांची वरिष्ठता यामुळेच चंद्रचूड हे सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचले असे कायदा क्षेत्रातील त्यांच्या सहकाऱ्यांना वाटत होते, पण त्यांच्या गावातील देवीच्या श्रद्धेमुळे ते सुप्रीम कोर्टातील सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचले, अशी वेगळी माहिती देशासमोर आली. चंद्रचूड साहेब रोज पूजा करतात व त्यात चुकीचे काहीच नाही. काही न्यायाधीश कपाळास गंध, टिळा लावून न्यायासनावर बसत असल्याचे अलीकडे दिसून आले. एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची मेगाभरती न्यायदान क्षेत्रात मागच्या काही वर्षांत झाली. त्यामुळे आमची न्यायालयेही अनेक धार्मिक राष्ट्रांतील न्यायव्यवस्थेप्रमाणे वर्तन करीत आहेत. पंतप्रधान, गृहमंत्री राज्य चालवताना हिंदू-मुसलमान असा भेद उघडपणे करतात. बलात्कार करणारे हिंदू असतील व पीडिता मुसलमान असेल तर ही पीडिता सरकारची लाडकी बहीण ठरत नाही, तर बलात्कार करणाऱ्या झुंड टोळय़ांची सजा माफ करून त्यांचे सत्कार ठेवले जातात, अशी अनेक उदाहरणे गेल्या दहा वर्षांत घडली. कायद्याने, घटनेतील कलमानुसार न्यायदान होते का? याबाबतचा कौल आता न्यायाधीशांनी

आपापल्या देवांनाच

लावायला हवा. चंद्रचूड साहेबांनीच तो मार्ग दाखवला आहे. सरन्यायाधीश म्हणतात, ‘‘बाबरी खटल्याचे, अयोध्येतील राममंदिराचे प्रकरण माझ्या समोर आले तेव्हा मी देवासमोर बसलो. हा खटला सोडवण्यासाठी देवाला प्रार्थना केली. मी देवाला म्हटले, आता तुम्हालाच कोणता तरी तोडगा काढावा लागेल.’’ सरन्यायाधीश कोणत्या देवासमोर प्रार्थनेसाठी बसले? विष्णूच्या तेराव्या अवतारासमोर बसले की चौदाव्या? पण तोडगा निघून अयोध्येत राममंदिर उभे राहिले, मात्र मंदिरातील प्रभू श्रीराम हे लोकसभा निवडणुकीत तेराव्या अवताराला प्रसन्न झाले नाहीत हे नक्की. श्रद्धेच्या विषयात न्यायालयाने पडू नये. येथे कायद्याची कलमे कुचकामी ठरतात. अयोध्येतील राममंदिरासाठी मोठा संघर्ष झाला. शरयू रक्ताने लाल झाली. ज्यांनी ती लाल केली, त्या मुलायमसिंग यादव यांना पंतप्रधान मोदी यांनी पद्मविभूषण किताबाने सन्मानित केले. हा भाजपच्याच श्रद्धेचा भाग आहे. या सगळ्या चर्चेचा सारांश किंवा ‘जजमेंट’ असे की, देवाच्या कृपेने भारताचे न्यायदान सुरू आहे. एखाद्या महत्त्वाच्या खटल्यात न्यायाधीश ध्यानस्थ होऊन देवासमोर बसतात व देव कौल देईल त्याप्रमाणे मार्ग निघतात. बहुधा त्यामुळेच न्यायाधीशांच्या टेबलावरील संविधानाचे पुस्तक आता न्यायदेवतेची डोळ्यांची पट्टी उघडून तिच्या हाती देण्यात आले. न्यायदेवता निर्जीव आहे व तिच्या हाती संविधान देऊन काय मिळवले? न्यायदेवतेच्या हाती तलवार होती. ती आता सरन्यायाधीशांनी काढून घेतली. त्या हातात मशाल अधिक शोभून दिसली असती. न्याय क्षेत्रात जो अंधकार पसरला आहे, तो जाळण्याचे काम या मशालीने केले असते. सरन्यायाधीशांनी आपल्या श्रद्धेने हे बदल घडवले. जग हे श्रद्धेवर चालते, पण न्यायदान श्रद्धेवर चालू शकते काय? आमची

न्यायव्यवस्था निष्पक्ष

आहे ही श्रद्धा भारतीयांच्या मनात होती, ती श्रद्धा आता नष्ट झाली आहे. आपण ज्ञानवादी व विज्ञानवादी आहोत हे न्यायालयाने समजून घेतले पाहिजे. महान शास्त्रज्ञ आइनस्टाईनने म्हटले आहे, ‘‘हे जग आपण चालवीत नाही. ते स्वतःच चालविले जात असते आणि त्या चालविण्यामधील आपण एक भाग असतो.’’ परमेश्वर या विश्वाशी जुगार खेळत नाही अशी आइनस्टाईनची धारणा होती. त्याचबरोबर तो परमेश्वर मानवजातीलाही या भूतलाशी जुगार खेळायला परवानगी देणार नाही असे आइनस्टाईनचे ठाम मत होते, पण आमची सर्वोच्च न्यायालये आइनस्टाईनच्या मार्गाने न जाता तेराव्या अवताराच्या इच्छेने काम करतात. यमाई देवीच्या कृपेने सन्माननीय चंद्रचूड सरन्यायाधीश झाले. देवीच्या कृपेने व श्रद्धेने त्यांनी न्यायदान केले, पण हे न्यायदान सत्य व प्रामाणिकपणास ठोकरणारे का ठरले? महाराष्ट्रात एका घटनाबाह्य, बेकायदेशीर, भ्रष्ट मार्गाने निर्माण केलेल्या सरकारला अभय देऊन चालवण्याचे काम कोणाच्या प्रेरणेने झाले? अडीच वर्षे हा खटला फक्त तारखांच्या घोटाळ्यात अडकवून ठेवला गेला. शिवसेना हे नाव, धनुष्यबाणासारखे चिन्ह हीसुद्धा महाराष्ट्रीय जनतेची श्रद्धा होतीच. संविधानाच्या दहाव्या शेडय़ूलचा मान राखून न्यायदान करा, असा साक्षात्कार सरन्यायाधीशांना देवीने दिला नाही की देवीच्या श्रद्धेवर तेराव्या अवताराचे आदेश भारी पडले? ईश्वराचे न्यायदान गद्दार, बेइमानांच्या बाजूने असेल तर महाभारतातील धर्म-अधर्माचे युद्ध, रामायणातील राम-रावणाचे युद्ध यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. यमाई देवी सरन्यायाधीशांना कौल देत असेल तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा खटला आम्ही यमाई देवीच्या देवळात चालवायला तयार आहोत. निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांनी या खटल्याचे वकील व्हावे. बोला, आहे तयारी?