सामना अग्रलेख – ‘ऋषीराज’ संपले! ‘नव्या इराण’चे स्वागत

ब्रिटन व इराणमध्ये झालेल्या निवडणुका व तेथील सत्तांतर हा खऱ्याखुऱ्या लोकशाहीचा विजय आहे. हे यश निवडणूक आयोगाचा गळा दाबून मिळवलेले नाही. वाढलेली महागाई व जनतेचे घसरलेले राहणीमान या मुद्द्यावर ब्रिटनमध्ये पंतप्रधान सुनक यांच्या हुजूर पक्षाचे ‘ऋषीराज’ संपुष्टात आले. मात्र खरा चमत्कार घडला तो इराणमध्ये. धर्मांधता आणि धर्मवेड झुगारून इराणी जनतेने कट्टरपंथीयांचा पराभव केला व ‘नव्या इराण’चा नारा देत हिजाबविरुद्ध लढणाऱ्या मसूद पेझेश्कियान या सुधारणावादी नेत्याची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली. या दोन्ही निकालांचे स्वागत व्हायला हवे!

ब्रिटन आणि इराण या दोन्ही देशांमध्ये मोठाच तख्तापलट झाला आहे. ब्रिटनमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक व त्यांच्या हुजूर पक्षाविरुद्ध असलेली असंतोषाची लाट पाहता साहेबांच्या देशातील सत्तांतर अटळ होते. तथापि, इराणमध्ये कट्टरपंथी नेते सईद जलिली यांचा झालेला पराभव अचंबित करणारा आहे. इराण म्हणजे धर्मवेड, इराण म्हणजे फतवे हे समीकरण ताज्या निकालाने उद्ध्वस्त केले. इराणला हिजाबपासून मुक्ती देऊ, असे आश्वासन देणारे सुधारणावादी नेते मसूद पेझेश्कियान यांना इराणच्या जनतेने डोक्यावर घेतले. कट्टरतेचे जोखड झुगारून देत इराणच्या जनतेने उदारमतवादी मसूद यांची नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करावी ही ऐतिहासिकच घटना म्हणायला हवी. ब्रिटनमध्ये सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी ऋषी सुनक यांच्या रूपाने एक हिंदू व्यक्ती पंतप्रधान झाल्यामुळे हिंदुस्थानातील हिंदू धर्मीयांनी त्यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत केले होते. शिवाय ऋषी सुनक हे हिंदुस्थानातील प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक व्ही. नारायण मूर्ती व सुधा मूर्ती या सुसंस्कृत उद्योगपती दांपत्याचे जावई असल्यामुळे या आनंदाला दुहेरी झालर होती. मात्र हा आनंद पुरती दोन वर्षेही टिकला नाही. 2014 नंतर हिंदुस्थानात जन्माला आलेल्या ‘अंधभक्त’ नावाच्या नव्या वर्गाने तर ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले म्हणून असा काही धुमाकूळ घातला होता की, जणू काही हिंदुस्थानातील एखादे प्राचीन ऋषी-मुनीच ब्रिटनचे पंतप्रधान झाले होते. ‘हिंदू ऋषी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी आरूढ झाले, हा ब्रिटिशांवर काळाने उगवलेला सूडच आहे’, अशा पोस्टस्चा पाऊसच आपल्याकडे सोशल मीडियावर ‘अंधभक्त’ नावाच्या वर्गाने पाडला होता. वास्तविक ब्रिटनच्या खासदारांनी व त्या वेळी सत्तेवर असलेल्या हुजूर पक्षाने ऋषी सुनक यांचा धर्म पाहून नव्हे, तर त्यांची

योग्यता पाहून

पंतप्रधान म्हणून निवड केली होती. मात्र अल्पावधीतच ऋषी सुनक यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. पक्षातील मातब्बर नेते सुनक यांच्या सरकारमधून बाहेर पडले. इतकेच नव्हे तर हिंदू वंशाच्या मतदारांनीही सुनक यांच्याकडे पाठ फिरवली. निकालातूनही हे स्पष्ट झाले. निवडून आलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या 29 खासदारांपैकी तब्बल 19 खासदार हे मजूर पक्षाचे आहेत, तर सुनक यांच्या हुजूर पक्षाचे केवळ 7 खासदार निवडून आले आहेत. ब्रिटनमध्ये वाढलेली प्रचंड महागाई, आर्थिक आघाडीवर सपशेल अपयशी ठरलेली धोरणे, करांमध्ये झालेली भरमसाट वाढ आणि जनतेच्या खर्चात वाढ होऊन घसरलेले जीवनमान यामुळे सुनक यांच्या सरकारविरुद्ध तीव्र असंतोष खदखदत होता. तो निकालात उमटला. पराभवाच्या भयाने सुनक यांच्या पक्षातील 78 खासदारांनी राजीनामे देऊन निवडणुका लढवण्यास नकार दिला तेव्हाच या निकालाची चाहूल लागली होती. 14 वर्षांपासून सत्तेत असलेल्या कॉन्झर्व्हेटिव्ह अर्थात हुजूर पक्षाला ब्रिटिश जनतेने सत्तेतून बेदखल केले आणि कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखालील मजूर पक्षाला सत्तेच्या सिंहासनावर बसवले. आपल्याकडील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडलेला ‘चार सौ पार’चा बुडबुडा जसा जनतेने हवेतच फोडला, तशी कुठलीही बढाई न मारता ब्रिटनच्या मजूर पक्षाने ‘चार सौ पार’ जागा जिंकून दाखवल्या. पुन्हा धार्मिक उन्माद, आहार-विहार, मंगळसूत्र, म्हैस, मुजरा असे कुठलेही पोरकट विषय ब्रिटनच्या निवडणूक प्रचारात आले नाहीत. नवे गृहनिर्माण धोरण राबवून देशात मोठय़ा प्रमाणावर घर उभारणी करणे या व अशा देशहिताच्या व जनहिताच्या मुद्दय़ांवर भर देऊन मजूर पक्षाने 412 खासदार निवडून आणले व ऋषी सुनक सरकारचा दारुण पराभव केला. सुनक हे खासदार म्हणून निवडून आले असले तरी त्यांच्या मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री या

निवडणुकीत पराभूत

झाले. ब्रिटनचे नवे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे वडील एका कारखान्यात कामगार म्हणून काम करत होते, तर आई नर्स म्हणून काम करत होती. अशा सामान्य कुटुंबातील व्यक्तीला ब्रिटनच्या लोकशाहीने सर्वोच्च पदावर नेऊन बसवले. ब्रिटनपाठोपाठ इराणमध्येही सत्तांतर झाले. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यामुळे इराणमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी लागली. गेली काही वर्षे इराणमध्ये महिलांची हिजाबविरोधी चळवळ सुरू आहे. इराणच्या कट्टरपंथी सरकारने हे आंदोलन बळाचा वापर करून चिरडण्याचा प्रयत्न केला. त्याचा फटका इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांचे समर्थक असलेले राष्ट्राध्यक्षपदाचे कट्टरपंथी उमेदवार सईद जलिली यांना बसला. निवडून आल्यानंतर हिजाबवरील बंदी उठवू, अशी ग्वाही देणारे मसूद पेझेश्कियान हे सुधारणावादी नेते इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. पेशाने हृदयविकार तज्ञ असलेल्या मसूद यांनी इराणच्या महिला व तरुण वर्गाचे हृदय जिंकले. तथापि, इराणचे सुप्रीम लीडर खोमेनी यांच्याशी जुळवून घेत उदारमतवादी सरकार चालवण्याचे मोठे आव्हान मसूद यांच्यासमोर आहे. ब्रिटन व इराणमध्ये झालेल्या निवडणुका व तेथील सत्तांतर हा खऱ्याखुऱ्या लोकशाहीचा विजय आहे. हे यश निवडणूक आयोगाचा गळा दाबून मिळवलेले नाही. कुठलीही बढाई न मारता ब्रिटनमध्ये कीर स्टार्मर यांच्या मजूर पक्षाने ‘चार सौ पार’ जागा जिंकल्या. वाढलेली महागाई व जनतेचे घसरलेले राहणीमान या मुद्द्यावर ब्रिटनमध्ये पंतप्रधान सुनक यांच्या हुजूर पक्षाचे ‘ऋषीराज’ संपुष्टात आले. मात्र खरा चमत्कार घडला तो इराणमध्ये. धर्मांधता आणि धर्मवेड झुगारून इराणी जनतेने कट्टरपंथीयांचा पराभव केला व ‘नव्या इराण’चा नारा देत हिजाबविरुद्ध लढणाऱया मसूद पेझेश्कियान या सुधारणावादी नेत्याची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली. या दोन्ही निकालांचे स्वागत व्हायला हवे!