सामना अग्रलेख – मुंडे, नैतिकता व अबू आझमी, लोकांना मूर्ख समजता काय?

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे श्रेय विरोधकांना मिळू नये म्हणून सरकारने पुन्हा त्या क्रूर औरंग्याचा वापर केला व त्यासाठी भाजपच्या लाडक्या अबू आझमींना औरंग्यावर वक्तव्य करण्याची सुपारी दिली. आझमी यांनी औरंग्यावर विधान करताच भाजपने गोंधळ सुरू केला. मुंडे यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्षाने आवाज वाढवताच सत्ताधारी बाकावरून आझमींच्या औरंगजेबावरील विधानावरून घमासान सुरू झाले. त्या गोंधळात विधानसभा संपली. राष्ट्रीय पातळीवर ओवेसी व राज्यात आझमींसारखे लोक हे भाजपचे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसडर’ आहेत. भाजपच्या नैतिकतेचा फुगा मुंडे आणि आझमी प्रकरणात फुटला. आझमी यांनी गायलेले ‘औरंगजेब स्तवन’ हे सरळ सरळ सरकार पुरस्कृत होते. लोकांना मूर्ख समजलात काय?

धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. हे एक नाटक आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मुंडे यांनी पोसलेल्या गुंडांनी अत्यंत क्रूरपणे म्हणजे औरंगजेबी पद्धतीने मारले. या खुनाची नैतिक जबाबदारी घेऊन मुंडे यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता. खरे तर मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीच व्हायला हवी होती, पण मुंडे यांचे जे राजीनामापत्र प्रसिद्ध झाले, त्यानुसार या महाशयांनी देशमुख खून प्रकरणात नव्हे, तर वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला. मुंडे यांची राजीनामापत्रातील भाषा म्हणजे ‘नैतिकता’ या शब्दाची क्रूर थट्टाच म्हणावी लागेल. जणू काही मुंडे यांनी मोठा त्याग केला अशा थाटात ते म्हणतात, ‘‘काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झाले. प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तवसुद्धा मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे.’’ मुंडे यांचा राजीनामा ही धूळफेक आणि अ‍ॅडजस्टमेंट आहे! मुंडे यांनी सांगितले की, त्यांना बेल्स पाल्सी नामक गंभीर व विचित्र आजार झाला आहे. त्यामुळे त्यांना दोन मिनिटेही नीट बोलता येत नाही. राजीनाम्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या तर ते चांगलेच चुरुचुरु बोलत आहेत. त्यामुळे विश्वास कसा ठेवायचा? ‘‘हवा गरम आहे. मामला थंड होईपर्यंत आराम करा. नंतर पुन्हा मंत्रिमंडळात याल असे पाहू,’’ असे फडणवीस, मुंडे व अजित पवारांत ठरले आणि त्यानंतर हा राजीनामा झाला. राजीनाम्याचे नैतिक श्रेय फडणवीस किंवा अजित पवारांनी घ्यायचे कारण नाही. अजित पवार म्हणतात, मुंडे यांनी

नैतिकतेच्या मुद्द्यावर

राजीनामा दिला, पण मुंडे यांच्या राजीनाम्यात नैतिकतेचा कुठेच उल्लेख नाही. सिंचन घोटाळ्यापासून जरंडेश्वरपर्यंत स्वतः अजित पवारांवर आरोप झाले. पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले, पण नैतिकतेच्या मुद्द्यावर सत्तेचा ‘त्याग’ करावा असे जेथे अजित पवारांनाच वाटले नाही तेथे त्यांचे हस्तक असलेल्या मुंडे यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा कशी करावी? संतोष देशमुख यांची डिसेंबर 2024 मध्ये अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांची हत्या किती निर्घृण, अघोरी पद्धतीने केली त्याचे व्हिडीओ आणि फोटो प्रसिद्ध झाले. आरोपपत्रातही ते पुरावा म्हणून लावले गेले आहेत. मृत संतोष देशमुख यांच्या तोंडावर अत्यानंदाने लघवी करण्याचा फोटो म्हणजे राज्याच्या संस्कृतीला काळिमा आहे. महाराष्ट्राच्या मातीत ही निर्घृणता आली कोठून? या निर्घृणतेचे राजकीय पोशिंदे कोण आहेत? महाराष्ट्राच्या राजकारणात पैशांचा वापर सुरू आहे. हा पैसा ठेकेदार, कारखाने, कंपन्यांकडून खंडण्या जमा करून येतो व त्या खंडण्यांचे वाटप सर्वदूर होते. बीडमधील अवादा कंपनीकडून खंडणी उकळण्यास सरपंच देशमुखांनी विरोध केला. त्यामुळेच अत्यंत निर्घृण पद्धतीने देशमुखांचा काटा काढला गेला. खून, बलात्कार, खंडणी ही आता महाराष्ट्राची नवी ओळख झाली आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. सार्वजनिक बस स्थानकांत, गावातल्या जत्रांमध्ये मुलींवर हात टाकला जातो व सरकार लाडक्या बहिणींचा टेंभा मिरवत आहे. माणिक कोकाटे, धनंजय मुंडे, संजय राठोड, जयप्रकाश रावल अशा मंत्र्यांना संरक्षण देऊन मुख्यमंत्री कोणत्या नैतिकतेचे दिवे पाजळत आहेत? जयप्रकाश रावल यांनी एक सहकारी बँक लुटली. आपल्याच नातेवाईक व कंपन्यांच्या नावावर कर्ज घेऊन

पैशांची लूट

केली व बँक डबघाईला आणली. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन जबरदस्तीने लाटली व आता कोर्टाने रावल यांचे वाभाडे काढून निकाल प्रतिभाताई पाटलांच्या बाजूने दिला. अशा चोरांना फडणवीस यांनी मंत्रिमंडळात का ठेवावे? संतोष देशमुख यांचा खून याच राजाश्रयातून झाला. मस्साजोग प्रकरणात कोणाचे हात रक्ताने माखले आहेत व संतोष देशमुख खुनाचे शिंतोडे कोणत्या मंत्र्याच्या कपड्यावर पडले आहेत याची माहिती असतानाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांची पाठराखण केली. ‘‘कोर्ट काय ते ठरवेल’’ हे त्यांचे पालुपद. मग माणिक कोकाटे प्रकरणात कोर्टाने ‘भ्रष्ट’ शिक्का मारून दोन वर्षांची शिक्षा ठोठावूनही वरच्या कोर्टाच्या निकालाची प्रतीक्षा कसली करताय? धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे श्रेय विरोधकांना मिळू नये म्हणून सरकारने पुन्हा त्या क्रूर औरंग्याचा वापर केला व त्यासाठी भाजपच्या लाडक्या अबू आझमींना औरंग्यावर वक्तव्य करण्याची सुपारी दिली. भाजप-शिंदेंच्या सूचनेनुसार आझमींनी औरंग्या हा किती चांगला प्रशासक होता हे विधिमंडळाच्या आवारात प्रशस्तीपत्र दिले. आझमी यांनी औरंग्यावर विधान करताच भाजपने गोंधळ सुरू केला. मुंडे यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्षाने आवाज वाढवताच सत्ताधारी बाकावरून आझमींच्या औरंगजेबावरील विधानावरून घमासान सुरू झाले. त्या गोंधळात विधानसभा संपली. राष्ट्रीय पातळीवर ओवेसी व राज्यात आझमींसारखे लोक हे भाजपचे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसडर’ आहेत. भाजपच्या नैतिकतेचा फुगा मुंडे आणि आझमी प्रकरणात फुटला. मुंडे यांच्या राजीनामा प्रकरणात नैतिकता उजळून निघावी म्हणून भाजपचे ‘एकलव्य’ अबू आझमी यांनी मोठेच काम केले. आझमी यांनी गायलेले ‘औरंगजेब स्तवन’ हे सरळ सरळ सरकार पुरस्कृत होते. लोकांना मूर्ख समजलात काय?