सामना अग्रलेख : सह्याद्रीचा आवाज!! असा होतो भाजपचा पराभव!

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभव झाल्यावर भाजपवाले सहकारी कारखान्यांच्या निवडणुकाही ईव्हीएमवर घेण्याची मागणी करतील. ईव्हीएम जगातून हद्दपार झाले, परंतु ते फक्त आपल्या महान भारत देशात आहे. कारण भाजपला सत्य मार्गाने निवडणुका जिंकता येणार नाहीत. ‘सह्याद्री’च्या निवडणुकीतील विजयाने लोकशाहीसाठी आशेचा किरण दिसतो. ही किरणे महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांत, कानाकोपऱ्यांत जावोत. ‘आमचे मतदान भाजपला नव्हते. मग ते कसे जिंकले?’ असा प्रश्न विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर राज्यातील मतदारांच्या मनात होता. ‘सह्याद्री’च्या निकालाने त्याचे उत्तर मिळाले.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजप व त्यांचे ‘एसंशिं’, अजित पवार वगैरे चोर मंडळ विजयी झाले, मात्र त्यांचा विजय खरा नव्हता. लोकांनी त्यांना मतदान केले नव्हते हे उघड करणारे अनेक पुरावे रोज समोर येत आहेत. सातारा जिह्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भाजप पॅनलचा दारुण पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब पाटील हे दणदणीत मताधिक्याने जिंकले. विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराने याच बाळासाहेब पाटलांचा 44 हजार इतक्या मताधिक्याने पराभव केला. हे मतदान ईव्हीएमवर झाले व आता त्याच पंचक्रोशीत सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान झाले. त्यात पैशांचा पाऊस पाडूनही भाजप निम्मी मतेही मिळवू शकला नाही. फक्त चार महिन्यांत झालेला हा चमत्कार बरेच काही सांगून जातो. भाजप आमदार मनोज घोरपडे यांचे सर्वच्या सर्व म्हणजे 21 उमेदवार पराभूत झाले. सह्याद्री कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा जिह्यातील कराड, कोरेगाव, सातारा, खटाव, कडेगाव अशा पाच तालुक्यांत आहे व येथे सर्वत्र मतदारांनी भाजपला धूळ चारली. त्याचा अर्थ असा की, बॅलेट पेपरवर कोणतीही निवडणूक घेतली तर भाजपचा पराभव होतो आणि ईव्हीएमवर भाजपचा हमखास विजय होतो. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक, पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली. त्यात भाजपचा पराभव झाला. ईव्हीएम नसेल तर भाजप व त्यांचे लोक सत्ता काबीज करू शकत नाहीत. मतदार यादीतला घोटाळा व ईव्हीएम हेच भाजपला विजय मिळवून देतात हे ‘सह्याद्री’च्या निकालाने स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील निकाल धक्कादायक होता. आता चार महिन्यांनंतरही लोक हा निकाल स्वीकारायला तयार नाहीत. भाजप व त्यांच्या दोन मित्रपक्षांविषयी

जनतेच्या मनात प्रचंड संताप

होता. तरीही या सगळ्यांना 240 च्या आसपास जागा मिळाल्या. अजित पवारांना लोकसभा निडणुकीत फक्त एक जागा मिळाली होती, पण ते विधानसभेत 40 पार गेले आणि महान गद्दार ‘एसंशिं’ यांचे हात साठीला टेकले. फडणवीस यांच्यावर तर आभाळ असे फाटले की, त्यांना 130 आमदार मिळाले. एखाद्याला वेड लावणारे हे निकाल होते व या तिघांनाही वेड लागले आहे असेच त्यांचे सत्तेत बसल्यानंतरचे वर्तन आहे. विधानसभा निवडणुकीत पैसा आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर झाला. त्याहीपेक्षा लोकांनी केलेले मतदान ‘गायब’ झाले हे सत्य आहे. म्हणजे मशाल, तुतारी वाजवणारा माणूस, हाताच्या पंजावर बटण मारले तरी ती मते जेथे जायची तेथे गेलीच नाहीत. मतांची सरळसरळ चोरी झाली व हे असले प्रकार मोदी राज्यात सर्रास घडत आहेत. भारतातील लोकशाहीला ईव्हीएममुळे ग्रहण लागले आहे. अमेरिकेसारख्या राष्ट्रानेही भारताच्या ‘ईव्हीएम’ निकालावर शंका घेतल्या. ईव्हीएम हॅक किंवा हायजॅक होऊ शकतात याचे प्रात्यक्षिक एलॉन मस्कने दाखवले. त्यामुळे ईव्हीएमच्या अंधभक्तांना धक्का बसला. नरेंद्र मोदी यांचा विजय हा सत्याला धरून नाही. त्यामागे ईव्हीएमचे कारनामे आहेत. भारतातील सर्वच प्रमुख विरोधी पक्ष निवडणूक आयोगाच्या दारात जाऊन ‘बॅलेट पेपर’वर निवडणूक घेण्याची विनवणी करीत आहेत, पण निवडणूक आयोग विरोधकांचे ऐकायला तयार नाही. लोकशाहीचे हे दुर्दैव आहे. मी केलेले मतदान नक्की कोठे गेले हे जाणून घेण्याचा हक्क मतदाराला आहे. तो हक्कच भारतात डावलला जात आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक निर्दोष नव्हती. एखाद्या बुथवर 158 मते पडल्याची नोंद असताना त्याच बुथवरील मतमोजणीत मतांचा आकडा 300 पार जातो व ही सर्व मते भाजपला किंवा त्यांच्या मित्रपक्षांना जातात. महाराष्ट्रातील बहुतेक मतदान केंद्रांवर ‘ईव्हीएम’चे सील उघडल्यावर हे असे

परस्पर विरोधी आकडे

बाहेर आले. यावर पटणारा खुलासा निवडणूक आयोग देऊ शकला नाही. हाच घोटाळा आहे. मतदानानंतर दोन-चार दिवसांनी मोजणी होते व त्यानंतर ‘ईव्हीएम’ची बॅटरी फूल चार्ज असते हे सर्वत्र आढळून आले. निवडणूक आयोग त्यावर म्हणतो, ‘‘हे तर नित्याचेच आहे. उगाच शंका कसली घेता?’’ लोकांच्या मनात विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत शंका आहेत व त्यांचे निरसन व्हायलाच हवे. मतपत्रिकेवर निवडणुका घेणे हाच शंका दूर करण्याचा व भारतातील लोकशाही वाचवण्याचा मार्ग आहे. मोदी यांनी हा मार्ग स्वीकारला तर लोकशाहीचा विजय होईल व भाजपचा पराभव होईल. मुंबईतील सिनेट, पदवीधर मतदारसंघ व आता सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक हे त्याचे उदाहरण. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभव झाल्यावर भाजपवाले सहकारी कारखान्यांच्या निवडणुकाही ईव्हीएमवर घेण्याची मागणी करतील. मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका सरकार घेत नाही. सर्वत्र प्रशासकांच्या माध्यमातून लुटमार सुरू आहे. मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका ‘बॅलेट पेपर’वर घेऊन सरकारने लोकशाही मूल्यांची बूज राखावी. लोकशाहीचा खेळखंडोबा झाला आहे तेवढा पुरे. अमेरिकेत लोकशाहीच्या रक्षणासाठी जनता रस्त्यावर उतरली व प्रे. ट्रम्प यांनाच आव्हान दिले. ईव्हीएम जगातून हद्दपार झाले, परंतु ते फक्त आपल्या महान भारत देशात आहे. कारण भाजपला सत्य मार्गाने निवडणुका जिंकता येणार नाहीत. ‘सह्याद्री’च्या निवडणुकीतील विजयाने लोकशाहीसाठी आशेचा किरण दिसतो. ही किरणे महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांत, कानाकोपऱ्यांत जावोत. ‘आमचे मतदान भाजपला नव्हते. मग ते कसे जिंकले?’ असा प्रश्न विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर राज्यातील मतदारांच्या मनात होता. ‘सह्याद्री’च्या निकालाने त्याचे उत्तर मिळाले.